राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, February 26, 2025

दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.वंदनाताई मुरकुटेंचा सहभाग


दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.वंदनाताई मुरकुटेंचा सहभाग 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व साहित्यिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सहभागी होऊन श्रीरामपूरचा ठसा साहित्य संमेलनातही उमटविला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना भेटून त्यांनी ‘योगीराज गंगागिरी ते सद्गुगुरु नारायणगिरी’ महाराज हे स्वलिखित पुस्तक त्यांना भेट दिले.
   डॉ. वंदनाताई यांना साहित्य संमेलनात ‘विशेष निमंत्रित’ म्हणून निमंत्रित केले होते. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंतचे चर्चासत्र, कवी संमेलन, परिसंवाद आदी उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःच्या कर्तुत्वाची झलक दाखवून श्रीरामपूरचे नाव शतगुणित केले.
   देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उषा तांबे, सूत्रसंचालक समीरा गुजर, बीव्हीजे ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, पश्चिम बंगालच्या खासदार सागरीका घोष, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, निर्भीड पत्रकार संजय आवटे, रविंद्र शोभणे, गायिका मधुरा वेलणकर, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत , संजय नहार व अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन साहित्य संवाद केला.
   संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.ताराबाई भवाळकर यांनी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक करून तरुणांनी लेखन व संशोधनात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* ✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, February 23, 2025

सुफी साधू - संतांमुळे समता बंधू भावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागवला - ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज सावित्री फातेमा सद्भावना मंचचे नगरमध्ये सर्वधर्मीय संमेलन संपन्न

सुफी साधू - संतांमुळे समता बंधू भावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागवला - ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज 

सावित्री फातेमा सद्भावना मंचचे 
नगरमध्ये सर्वधर्मीय संमेलन संपन्न
   
- अह,नगर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
भारताची अडीच तीन हजार वर्षाची समतेची, एकोपाची, बंधू - भावाची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही या देशातील संतांनी प्रथम कोणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यामुळे समता, बंधुभावाचा विचार सर्व धर्मीयांच्या मनात जागविला असे विचार परभणी येथील हभप धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले.                                                                        अहिल्यानगर येथील सावित्री फातिमा सदभावना मंच आयोजित सर्वधर्मीय संमेलनात हभप धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू करून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले त्या विषयावर परखड प्रभावीपणे आपल्या खास शैलीत समाचार घेतला. 
सावित्री फातेमा सद्भावना मंचाच्या वतीने सर्व धर्मीय सदभावना संमेलनाचे सैनिक लोन नगर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, ज्येष्ठ कीर्तनकार पारनेर येथील ह.भ.प. सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील ह.भ. प. धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे, जळगांव येथील मौलाना समी, प्रा. सौ.स्मिताताई पानसरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बाळासाहेब मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे अध्यक्ष एडवोकेट संभाजी बोरुडे होते. 
सदर प्रसंगी सत्यपाल महाराज यांना राज्यपातळीच्या सद्भावना पुरस्काराने शाल सन्मानचिन्ह व ११ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
हभप धर्मकीर्ती महाराज पुढे म्हणाले सुफींने अस्पृश्यांना जवळ केले, वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था यावर प्रकाश टाकीत सर्व धर्मीयांना सामाजिक एकतेचा संदेश दिला.भागवत भक्ती धर्मा अगोदर सुफींचे आगमन होते. प्रचंड जातिवाद अस्पृश्यता परिस्थिती होती. अशावेळी सुफी साधुसतांनी  समता बंधू भावनेचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत केला. जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज हे विठ्ठलाला मानतात तुकोबाराया हे सुफींना मानतात त्यांचे अभंगातून त्यांनी एक ओळ सांगितली त्याची लोककथा सांगून तुकाराम महाराजांची दिंडी एका मस्जिद मधे थांबली असता तेथील मुस्लिमांनी तुकाराम महाराजांना मस्जिदी मधे कीर्तन करण्यास सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले. अल्ला देवे, अल्ला दिलाये , अल्ला खिलाये अशी ओवी सांगितली हे एकेश्वर सांगणारे महत्त्व त्यांनी विशद केले.  
यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की समाजामध्ये  द्वेशाचे प्रमाण दिवसा दिवस वाढत चालले आहे.आजच्या परिस्थितीत सदभावनेच्या कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. छत्रपतींच्या हिंदुत्वाची आज खरी गरज आहे. आज सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या संमेलनाची वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या संमेलनाचे हेतू सर्वदूर घराघरात पोहोचायला हवे. त्यासाठी त्यांनीही असे संमेलन भविष्यात आयोजित करण्याचे माणस केले.
प्रास्ताविक करताना डॉ. रफिक सय्यद म्हणाले की भारतीय समाज अठरापगड जाती धर्मांचा समाज आहे. अर्थातच या समाजामध्ये परस्पर सदभावना सलोखा बंधुभाव अनिवार्य व परम महत्त्वाचा आहे. त्याशिवाय देशात शांती सुख-समृद्धी नांदणार नाही. सुदैवाने भारतासह महाराष्ट्राला व अहिल्यानगर (अहमदनगर)
 जिल्ह्याला सदभावनेचा महान वारसा लाभला आहे. येथील सुफी हजरत शाह शरीफ बाबां विषयी मालोजीराजे भोसले यांना परम आदर होता. म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफ जी अशी ठेवली होती. आजही  शाहशरीफ बाब हे भोसले घराण्याचे श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदाचे सुफी शेख मोहम्मद (रह.) संत शेख महंमद महाराज व संत तुकाराम महाराजांचे घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा आणि पंचकोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख या शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत. हाच परस्पर सदभावनेचा बंधुत्वाचा व प्रेमाचा वारसा जोपासण्यासाठी व आणखी वृद्धींगत करण्यासाठी सर्व धर्मीय सद्भावना संमेलन आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले की आज प्रत्येकाला जागरूक व्हावे लागेल. समाजातील सदभावनेसाठी काम करणारे लोकांनवर हल्ले होतात. कारण सदभावनेसाठी काम करणाऱ्यांच्या विचारांना त्यांना मारायचे आहे. पण विचार मरत नाही, ते अशा सद्भावना कार्यक्रमाद्वारे इतरांमध्ये पसरत असतात. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाद्वारे तयार होत आहे असे सांगितले.
जळगांवहून आलेले मौलाना समी म्हणाले की युवा पिढीला दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्या युवा पिढीला आपल्याला सत्यमार्ग दाखवावा लागेल. धर्म व इतिहासाचे विकृतीकरण पण थांबविण्याची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले सदभावना मंच हे सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. अस्वस्थ वर्तमान काळात राजरोसपणे धर्माचा आणि सत्तेचा वापर करून दहशत निर्माण करून जाती जाती तेढ निर्माण केली जात आहे. अशा वातावरणात न घाबरता हे संमेलन ठेवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत त्या म्हणाल्या प्रश्न संकटे आव्हानांची माहिती आहे, ती परतून लावण्यासाठी संघर्ष करून प्रश्न काय आहे त्याची वेळीच उत्तरे दिली तर ते सुटतात,त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.सावित्री फातेमा सदभावना मंच यामधील एका शब्दाला अनेक जण विरोध करताना दिसतात सावित्रीच्या पुढे जर बहिणाबाई जनाबाई असे असते तर गजारावर झाला नसता, फातेमाला कथोकल्पित पात्र आहे हे कोणीतरी आणल आहे असा कांगावा केला जातो. बहुजनांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. धर्मसत्ता राजसत्ता हे काम करताना दिसत आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या माणसाच्या वतीने सर्वांचे आहे. फातिमा ही होतीच त्याचा इतिहास आहे, पुरावा आहे. सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांना लिहिलेले पत्र आहे ते आजही पुरावा म्हणुन आहे. सावित्रीबाई या आजारी असताना शाळेची जबाबदारी फातेमा यांच्यावर सोपवण्यासाठी महात्मा फुलेंना पत्र लिहिले होते. ती जबाबदारी फातेमा यांनी पार पाडली असे असताना त्यांचें नाव कथाकल्पित आहे असे म्हणणे चुकीचे आहे. असे सांगितले. 
भंते बाळासाहेब पातोरे म्हणाले की राज्यघटना उध्वस्त करण्याचा काम सध्या होत आहे. त्याला वाचविण्याची गरज असून संविधानाने दिलेल्या अधिकाराची लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लोक सरकारला जवाब विचारू शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ऍड. संभाजी बोरुडे म्हणाले की संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भारताच्या निर्माण साठी सदभावना मंच प्रयत्नशील आहे. सदभावना असणारा हा जिल्हा असून येथे  शाहशरीफ दर्गा आहे. सावित्री फातिमाची शाळा आहे.अशा जिल्ह्यात सदभावनेसाठी काम करण्याची वेळ का आली, यावर विचार मंथन करावे लागेल. मानवता धर्म आज खतरयात आहे. जातीला महत्त्व दिले जात आहे. मूठभर लोक हे कार्य करत आहे व अडाणी व इतिहास भुगोल माहिती नसणारी माणसं त्यांच्या मागे जात आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे. आजच्या या शिक्षित समाजात अशा भेदभाव करणारी प्रवृत्ती फोपावत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. व भविष्यात आम्ही सतत या मंचाद्वारे सद्भावनेचे कार्य चालू ठेवु अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे एडवोकेट संभाजी बोरुडे, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ,प्रतिक बारसे, फिरोज शेख, राजूभाई शेख, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, कादीर सर, जहीर सय्यद पत्रकार, मेजर रफीक, अश्फाक शेख, मुनाफ भाई, एड.आरिफ भाई, नदीम भाई, मुश्ताक भाई आदिंनी भरपूर परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी केले. तर आभार प्रतिक बारसे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बेलापूरात ५६८ घरकुलांना मंजुरीआणी पहिल्या हप्त्याचे वितरण घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

बेलापूरात ५६८ घरकुलांना मंजुरी
आणी पहिल्या हप्त्याचे वितरण  
                                                                       घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा
 मोठ्या उत्साहात संपन्न

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून घरकुलासाठी शेती महामंडळाची ३४ एकर जागा विनामूल्य मिळाल्याने प्रति घरकूल आर्धा गुंठा जागा मिळणार 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता...
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत तालुक्यातील बेलापूर बु - ऐनतपूर येथील ५६८ घरकुल लाभधारकांचा मेळावा बेलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
या मेळाव्यास देशाचे गृहमंञी नाम.अमित शहा, राज्याचे मुख्यमंञी नाम. देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी व्हिडीओ संबोधित केले. याप्रसंगी बोलताना श्री.शरद नवले म्हणाले की,जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचेमुळे बेघरांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे.नामदार श्री.विखे यांनी घरकुलासाठी शेती महामंडळाची एकर ३४ जमिन विनामूल्य दिली. तेथेच आता सदर लाभार्थींचे पुनर्वसन होवून त्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकारणार आहे. रामगड येथील घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व गायकवाड वस्ती येथील घरकुल वसाहतीचे सुजयनगर असे नामकरण करणार असल्याचे श्री.नवले म्हणाले. कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावकरी मंडळाने कारभार हाती घेताना जी आश्वासने दिली ती यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचेमुळे बेलापूरला १२६ कोटींची पाणी पुरवठा योजना, ४३ एकर शेती महामंडळाची जागा मोफत मिळाली. त्यामुळेच ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
या घरकुल लाभार्थींना अर्धा गुंठा जागा दिली जाणार असून तेथे प्लॕन करुन रस्ते, पाणी,वीज अशा अद्ययावत सुविधा पुरविण्यात येवून सदरची घरकुल योजना राज्यात आदर्श ठरेल अशी असेल असे श्री.खंडागळे म्हणाले याप्रसंगी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कु-हे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे,भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख,भास्करराव खंडागळे, विष्णुपंत डावरे, ज्ञानेश गवले,शफिक बागवान, बाळासाहेब दाणी, प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार,तस्वर बागवान, दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, शफिक शेख,गोपी दाणी, श्रीराम मोरे यांच्या सह घरकुल लाभार्थीं उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, February 22, 2025

मराठी भाषा गौरवदिनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बॅरिस्टर पी.जी पाटील सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समारंभात मान्यवर लेखकाचे व्याख्यान आयोजित केले असून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अग्रणी व घटक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व भाषिक कौशल्याचा आविष्कार करण्यास संधी मिळण्यासाठी मराठी वक्तृत्व,रांगोळी,कविता रसग्रहण,पुस्तक परीक्षण, निबंध इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतील. या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे,विद्यापीठाचे पदाधिकारी, प्रमुख अतिथी वक्ते यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून भाषा मंडळ व मराठी विभागाने सातारा जिल्ह्यातील साहित्यिक यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरविलेले आहे. तरी जे या समारंभास उपस्थित राहणार आहेत, अशा लेखक ,कवी यांनी भाषा मंडळाचे प्रभारी संचालक,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे मोबाईल नंबर ९८ ९० ७२ ६४ ४० यांचेकडे आपली नावे नोंदवावीत. तसेच आपल्या प्रकाशित ग्रंथ , कलाकृती यांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी तसेच प्रकाशित ग्रंथ छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात देण्यात यावे. मराठी भाषेतून ज्यांनी साहित्य ग्रंथ प्रकाशित केले त्याची नोंद मराठी विभागात ठेवली जाणार आहे. हे ग्रंथ विद्यार्थी व अभ्यासक यांना हे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या साहित्यिक यांनाच मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. भाषा मंडळ व मराठी विभाग यांनी मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी कोणकोणते उपक्रम व कार्यक्रम घ्यावेत यासाठी या साहित्यिकानी आपल्या सूचना लेखी स्वरुपात मराठी विभागात द्याव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Friday, February 21, 2025

भारतीय संविधान हेच राष्ट्रधर्माचा धर्मग्रंथ आहे - प्रा. डॉ.बाबासाहेब पवार


भारतीय संविधान हेच राष्ट्रधर्माचा धर्मग्रंथ आहे - प्रा. डॉ.बाबासाहेब पवार

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य म्हणून स्थापित केले आहे. भारताच्या या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान हा संविधानाचा गौरव आहे असे विचार प्रा.डॉ.बाबासाहेब पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित संविधान गौरव महोत्सवात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या सदर प्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ. किशोर गटकळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर, प्रा.रुपाली उंडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.संजय नवाळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाले की भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्वज्ञान सांगितले असून राज्यघटना हाच सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ आहे त्यामुळे या धर्मग्रंथाची ओळख सामान्यातल्या सामान्य माणसाला झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच समता आणि स्वातंत्र्य यांची जपणूक केली तरच राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी बंधुता आपण निर्माण करु व आपण या भारत देशात स्वाभिमानाने व निर्भयपणे जीवन जगू शकू म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यावेळी प्रा. डॉ. किशोर गटकळ यांनी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून महत्त्वाच्या कलमांवर चर्चा केली.
         सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व कायद्याचे अधिराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये संविधान रॅली काढली, बेलापूर येथील झेंडा चौकामध्ये उद्देश पत्रिकेला माजी विद्यार्थी विशाल मेहत्रे यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले. या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवण्याचे आव्हान प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली उंडे यांनी केले तर आभार प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी मानले.रॅली आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, February 20, 2025

दे.राजा समर्थ कृषी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा........


दे.राजा समर्थ कृषी महाविद्यालयात
 शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

सौ.किरण वाघ - प्रतिनिधी - वार्ता. देऊळगांव राजा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, अनंत देशमुख, शिव व्याख्याते, सुखदेव बुरकुल, दिलीप वाघ, नंदू शिंगणे, दिपक दंदाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी किरण ठाकरे यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करत शिवजन्म उत्साहास सुरुवात केली. या जन्मोत्सवास छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून अभिशेक चांदणे व समीक्षा गिरी यांना विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर सलामी देत महाविद्यालयात मावळ्यांसह प्रवेश केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र एकदा तरी वाचावे जेणेकरून आयुष्य जगत असताना आलेल्या कठीण प्रसंगांना कशाप्रकारे सामोरे जावे याचे ज्ञान मिळेल असे विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेवर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवव्याख्याते अनंत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कशाप्रकारे कठीण प्रसंगातून उभे राहिले याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन भवर यांनी केले यांनी. यावेळी प्रा अश्विनी जाधव, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी, प्रा योगेश जगदाळे, प्रा विकास मस्के, प्रा अरुण शेळके, प्रा सचिन सोळंकी, प्रा श्वेता धांडे, प्रा अनिता सानप, प्रा सोनाली इंगळे, प्रा प्रणाली पानेरकर, प्रा वैभव देशमुख, प्रा किशोर कवर, बद्रीनारायण काळे, सुवर्णा उमाळे, अर्चना जत्ती, कल्पना मुख्यदल, गबाजी लाड, संजय लाड, श्रीहरी काळुसे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित
 होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता 
-----------------------------------------------
=================================
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शेतीचे आवर्तन सुटले; तीस दिवस चालणार आवर्तन - आमदार हेमंत ओगले


शेतीचे आवर्तन सुटले; तीस दिवस चालणार आवर्तन - आमदार हेमंत ओगले

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
भंडारदारा धरणातून रब्बी हंगामातील शेतीचे आवर्तन सुटले असल्याची माहिती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिली.
   सुरू झालेले आवर्तन हे रब्बी हंगामातील शेतीचे शेवटचे आवर्तन असून आवर्तनाचा कालावधी ३० दिवसांचा आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले भरणे काळजीपूर्वक भरून घ्यावे, सर्व शेतकऱ्यांचे भरणे व्यवस्थितरित्या पूर्ण होईल अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार ओगले म्हणाले.  
   कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तन निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्यरीतीने नियोजन करावे जेणेकरून पाणीटंचाई टाळता येणे शक्य होईल असे देखील ओगले म्हणाले.
      सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून शेतकऱ्यांनी आपले भरणे भरून घ्यावेत याबाबत काही अडचण असल्यास आमदार कार्यालय अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कोट्यवधींच्या निधी, लाभार्थ्यांचा आयुक्तालयात नाही हिशोब....बालसंगोपन योजना: ३६ जिल्ह्यात माहिती मागणी अर्जाचा प्रवास

कोट्यवधींच्या निधी, लाभार्थ्यांचा आयुक्तालयात नाही हिशोब....

बालसंगोपन योजना: ३६ जिल्ह्यात 
माहिती मागणी अर्जाचा प्रवास

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" अडीच कोटी महिलांसाठी सुपरफास्ट तुफान वेगाने झटपट राबविणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या पुणे येथील आयुक्तालयास राज्यातील एकल भगिनींच्या फक्त सव्वा लाख लेकरांना मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा दरमहा तर सोडाच, पण सहा-सहा महिन्यानंतरही लाभ देणे अशक्य झाले आहे. अंदाजे वार्षिक साडेचारशे कोटींचा निधी लागणाऱ्या या योजनेचे लाभार्थी व निधीची जिल्हानिहाय माहितीच आयुक्तालयात उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. 

मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व एकल महिलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे (श्रीरामपूर) यांनी माहिती अधिकारांतर्गत महिला व बालविकास आयुक्तालयाकडून माहिती मागवली होती. शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या आई अथला वडील गमावलेल्या बालकांना दरमहा २ हजार २५० रू. लाभ देणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना तसेच कोविडमध्ये पालक गमावून एकल अथवा अनाथ झालेल्या बालकांना दरमहा ४ हजार रू. लाभ देणाऱ्या केंद्र सरकारच्या मिशन वात्सल्य (स्पॉन्सरशीप) योजनेच्या सन २०२२-२३ सन २०२३-२४, सन २०२४-२५ या तीन वर्षातील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या, मंत्रालयाकडे, केंद्राकडे मागणी केलेला निधी, तरतूद, प्राप्त निधी, वितरित निधी, बँक रिजेक्ट पेमेंट, गेल्या तीन वर्षात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा बालकल्याण समिती यांच्याकडे बालसंगोपन लाभार्थ्यांच्या प्राप्त प्रस्तावांची जिल्हानिहाय पात्र, अपात्र वर्गवारीप्रमाणे संख्या अशाप्रकारची माहिती मागवली होती. 
आयुक्तालयातील जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (बालविकास) योगेश जवादे यांनी तीस दिवसात माहिती देण्याऐवजी ही मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर साळवे यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६ (३) अन्वये आपला अर्ज संबंधितांना हस्तांतरित केला आहे. त्यामुळे यापुढील पत्रव्यवहार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (सर्व) या कार्यालयाशी करावा, असे कळविले आहे. त्यामुळे यातून मागितलेली माहिती आयुक्तालयात उपलब्ध नसल्याचा अर्थबोध होतो.
बालसंगोपन योजनेचे राज्यस्तरीय संनियंत्रण, पर्यवेक्षण, देखरेख, वितरण, निधी मागणी, आर्थिक हिशोब, लेखापरीक्षण करणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयात लाभार्थी व निधीबाबत मागितलेली माहिती उपलब्ध नाही, तर गेल्या तीन वर्षांमध्ये आयुक्तालयाने अंदाजे वार्षिक चारशे ते साडे चारशे कोटी रूपयांची मागणी, खर्च, डीबीटीद्वारे निधी हस्तांतरित कशाच्या आधारे केला?, या निधीची उपयोगिता खर्च प्रमाणपत्रे ( युटिलायझेशन सर्टिफिकेट) केंद्र व राज्य सरकारला कशाच्या आधारावर सादर केली? की माहिती उपलब्ध नसताना बोगस उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करून या निधीचा अपहार, गैरव्यवहार केला ?, माहिती उपलब्ध, प्राप्त असताना ती आयुक्तालयाने का लपविली? अशा अनेक प्रश्नांसोबतच आयुक्तालयाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मागितलेली माहिती ईमेल, ई ऑफिस, ऑनलाईन अशा संणकीय प्रणालीतून आयुक्तालयास वेळोवेळी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार तीन ते चार पानांमध्ये देऊन सरकार व अर्जदाराचा वेळ व पैसा वाचविणे शक्य होते. पण माहितीची लपवालपवी, टाळाटाळ, दिरंगाई करण्याच्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे राज्यभरातील ३६ जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पन्नास ते शंभर रू. सरकारी तिजोरीतून खर्च करीत साळवे यांना रजिस्टर पोस्टाने माहिती पाठवावी लागत आहे. 
याबाबत आयुक्तालयाची बाजू जाणून घेण्यासाठी प्रभारी महिला व बालविकास आयुक्त राहूल मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जनमाहिती अधिकाऱ्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे अडीच ते तीन हजार रूपये टपाल खर्चाचा भुर्दंड विनाकारण सरकारला सोसावा लागत आहे. आयुक्तालयातून तीन-चार पानांमध्ये मिळू शकणारी माहिती आता ३६ जिल्ह्यातून दररोज घरी रजिस्टर पोस्टाने येत आहे. हा खर्च दंडासह वसूल करून माहिती अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई आवश्यक आहे.
मिलिंदकुमार साळवे, माहिती अधिकार अर्जदार.
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला अर्ज माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६ (३) अन्वये संबंधितांना हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील पत्रव्यवहार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, (सर्व ) यांच्या कार्यालयाशी करावा.
योगेश जवादे, शासकीय जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (बालविकास), महिला व बालविकास आयुक्तालय,पुणे.
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सुजाता पुरी यांच्या कवितेची सलग चौथ्यांदा निवड


अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सुजाता पुरी यांच्या कवितेची सलग चौथ्यांदा निवड

- अहिल्यानगर - प्रतिनिधी - वार्ता -
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात येथील प्रथित यश लेखिका व कवयित्री सुजाता नवनाथ पुरी यांच्या कवितेची कवी कट्टा या कार्यक्रमासाठी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सलग चौथ्यांदा कविता निवडीचा मान मिळविणाऱ्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कवयित्री आहेत.
यापूर्वी उदगीर येथे झालेल्या ९५ व्या साहित्य संमेलनात त्यांची आठवण ही कविता तर वर्धा येथे झालेल्या ९६ व्या साहित्य संमेलनात पानगळ ही कविता तसेच अंमळनेर येथे गेल्या वर्षी झालेल्या ९७ व्या साहित्य संमेलनात ज्योत या कवितेची निवड झाली होती. यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी वेडी प्रित या कवितेची निवड झाली आहे.
सुजाता पुरी यांचा ऋतू अंतरीचे हा कवितासंग्रह व वाटेवरच्या मशाली हा लेख संग्रह प्रसिद्ध झालेले आहे. या दोन्ही पुस्तकांना आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत.
दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित त्यांच्या कविता व लेख हे वाचकाच्या अंतर्मनाचा ठाव घेतात.
सलग चौथ्यांदा त्यांच्या कवितेची अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवर लेखक कवी व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १९ तारखेला पुण्यातून निघणाऱ्या विशेष रेल्वेने त्या नवी दिल्लीला रवाना होत आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳..
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, February 16, 2025

मोडिफाय सायलेन्सर दुचाक्या ठरत आहेत शहरवासियांची डोकाफोड ! पोलिसांनी बंदोबस्त करावात्रस्त नागरीकांची मागणी !


मोडिफाय सायलेन्सर दुचाक्या ठरत 
आहेत शहरवासियांची डोकाफोड !

पोलिसांनी बंदोबस्त करावा
त्रस्त नागरीकांची मागणी !

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हल्ली मोडिफाय केलेल्या सायलेन्सरच्या दुचाक्या श्रीरामपूर शहरात नागरीकांची प्रचंड डोकाफोड ठरत आहे,
जरासा अंधार पडला रे पडला की हिरोगीरी करण्यासाठी काही शिदाडं या दुचाक्या घेवून बाहेर पडतात,या दुचाक्यांचा वेगही प्रचंड असतो,जीवाची पर्वा न करता ही शिदाडं भरधाव वेगाने आपल्या दुचाक्या चालवतात, यामुळे अनेकांना धक्का,धडक लागुन गंभीर दुखापती होत आहेत, यासोबतच भांडणाचे प्रमाणही वाढत आहेत. करीता शहर पोलिसांनी याविरुद्ध मोहिम उघडून या शिदडांना जरासा सुंदरी प्रसाद दिल्यास असे प्रकार कमी होतील शिवाय त्रस्त शहरवासी देखील पोलिसांना आशिर्वाद देतील, करीता शहरातील समस्त त्रस्त नागरीकांकडून पोलिस प्रशासनास नम्रतेची विनंती आहे की अशा शिदडांची तक्रार करण्यासाठी पोलिस खात्यातर्फे एखादा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात यावा तथा प्रत्यक्ष शहनिशा करुन या शिदाडांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणीही जोर धरु लागली आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Saturday, February 15, 2025

सरकारी जमिनीवर असलेलेअतिक्रमण आणि पुनर्वसन यांची धोरणे, योजना आणि वास्तव


सरकारी जमिनीवर असलेले
अतिक्रमण आणि पुनर्वसन

यांची धोरणे, योजना आणि वास्तव

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हा देशभरातील महत्त्वाचा सामाजिक आणि प्रशासनिक विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि राहण्याच्या मर्यादित पर्यायांमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून राहण्यास भाग पडतात. अशा परिस्थितीत शासनाच्या अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हजारो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, अतिक्रमणे हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची सोय केली जाणार आहे का ? आणि सरकारकडून कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो? 

*परंतु अतिक्रमण म्हणजे काय?*
सरकारी किंवा खासगी जमिनीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणे किंवा त्या जमिनीचा विनापरवाना वापर करणे यास अतिक्रमण म्हणतात. भारतात शहरे आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.

*अतिक्रमणाचे प्रकार*

*१) निवासी अतिक्रमण:* वर्षानूवर्ष गरीब कुटुंबे झोपडपट्ट्या किंवा छोट्या घरांद्वारे सरकारी जमिनींवर वास्तव्य करतात.

*२) व्यावसायिक अतिक्रमण:*
 रस्ते, फुटपाथ किंवा इतर जागांवर वर्षानूवर्ष दुकाने, हातगाड्या इत्यादींचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतात.

*३) कृषी अतिक्रमण:*
काही शेतकरी शासकीय किंवा वन विभागाच्या जमिनींवर बेकायदेशीर शेती करतात.

*शासनाच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे धोरण*
सरकार वेळोवेळी अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर धोरणे आखते. परंतु, अतिक्रमण हटवल्यानंतर त्या लोकांचे पुनर्वसन करणे ही मोठी जबाबदारी आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने दोन प्रकारचे धोरण अवलंबले जाते:

*१) पहिले पुनर्वसन आणि नंतर अतिक्रमण हटविणे*

या माध्यमातून पुनर्वसनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटवले जाते.
यामध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) किंवा अन्य पुनर्वसन योजनां अंतर्गत पात्र लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात येते.

*२) आधी अतिक्रमण हटवून नंतर पुनर्वसन:*

तातडीच्या कारवाईसाठी अतिक्रमणे प्रथम हटवली जातात आणि त्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होते.तथा अनेक वेळा अशा लोकांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था केली जाते.

*अतिक्रमण धारकांसाठी*
 *शासनाच्या पुनर्वसन योजना*
भारत सरकार आणि राज्य सरकारे विविध पुनर्वसन योजना राबवतात, ज्या अतिक्रमणग्रस्त नागरिकांना पर्यायी निवासस्थाने किंवा आर्थिक सहाय्य प्रदान करतात.

*१) पंतप्रधान आवास योजना (PMAY)*

या योजनेअंतर्गत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय लोकांसाठी घरे बांधली जातात. या योजना शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र योजना आहेत.त्यात पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि कर्ज सवलती मिळतात.

*२) राज्य सरकारच्या*
 *पुनर्वसन योजना*

महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवतात या योजनांतर्गत झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसन गृहे दिली जातात,

*३) इतर योजनांद्वारे अनुदान आणि मदत*

घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य (अनुदान) दिले जाते,तथा तात्पुरत्या निवासासाठी शिबिरे उभारली जातात.

*कायदेशीर अडचणी*
*आणि लोकांचे हक्क*

*१) संविधानिक व कायदेशीर हक्क:*

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान करते,कोणत्याही व्यक्तीला बेघर करण्यापूर्वी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा अतिक्रमण काढताना पुनर्वसनाची सोय करण्याचा आदेश दिला आहे.

*२) अतिक्रमण हटवताना प्रशासनाला येणाऱ्या अडचणी:*

अतिक्रमणधारकांचा मोठा विरोध होतो,राजकीय हस्तक्षेपामुळे काही वेळा कारवाई लांबते. पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करणे ही मोठी समस्या असते.

*अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसन करणे का आवश्यक आहे?*

*१) मानवी हक्कांचे संरक्षण:* 
कोणत्याही व्यक्तीला राहण्याचा हक्क आहे. अचानक अतिक्रमण हटविल्यास कुटुंबे बेघर होतात.

*२) सामाजिक असंतोष टाळण्यासाठी:*
जर पुनर्वसन नसेल, तर नागरिक आंदोलन करू शकतात.

*३) आर्थिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी:*
बेघर लोकांना नोकरी आणि शिक्षणाच्या संधी गमवाव्या लागतात.करीता सरकारने अतिक्रमण हटविण्यापूर्वी निश्चित योजना आखून त्या नागरिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. पुनर्वसन धोरणात खालील उपाय आवश्यक आहेत:

१) अतिक्रमण झालेल्या भागातील नागरिकांची नोंदणी करून त्यांना पर्यायी घरे देणे.

२) पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांचा योग्य वापर करून लोकांना घरकुल सुविधा देणे.

३) अतिक्रमण हटविण्यापूर्वी नागरिकांना पुरेशी पूर्वसूचना आणि मदतीसाठी वेळ देणे.

४) स्थानीय प्रशासनाने नागरिकांसोबत संवाद साधून योग्य पुनर्वसन धोरण अवलंबणे.अशा योजनांमुळे प्रशासनाची कर्तव्ये पार पडतील आणि नागरिकांचे हक्कही अबाधित राहतील.


=================================
-----------------------------------------------

*शौकतभाई शेख* - 9561174111
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

सरकारी जमिनीवर असलेलेअतिक्रमण आणि पुनर्वसनयांची धोरणे, योजना आणि वास्तव



सरकारी जमिनीवर असलेले
अतिक्रमण आणि पुनर्वसन

यांची धोरणे, योजना आणि वास्तव

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हा देशभरातील महत्त्वाचा सामाजिक आणि प्रशासनिक विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि राहण्याच्या मर्यादित पर्यायांमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून राहण्यास भाग पडतात. अशा परिस्थितीत शासनाच्या अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हजारो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, अतिक्रमणे हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची सोय केली जाणार आहे का ? आणि सरकारकडून कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो? 

*परंतु अतिक्रमण म्हणजे काय?*
सरकारी किंवा खासगी जमिनीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणे किंवा त्या जमिनीचा विनापरवाना वापर करणे यास अतिक्रमण म्हणतात. भारतात शहरे आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.

*अतिक्रमणाचे प्रकार*

*१) निवासी अतिक्रमण:* वर्षानूवर्ष गरीब कुटुंबे झोपडपट्ट्या किंवा छोट्या घरांद्वारे सरकारी जमिनींवर वास्तव्य करतात.

*२) व्यावसायिक अतिक्रमण:*
 रस्ते, फुटपाथ किंवा इतर जागांवर वर्षानूवर्ष दुकाने, हातगाड्या इत्यादींचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतात.

*३) कृषी अतिक्रमण:*
काही शेतकरी शासकीय किंवा वन विभागाच्या जमिनींवर बेकायदेशीर शेती करतात.

*शासनाच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे धोरण*
सरकार वेळोवेळी अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर धोरणे आखते. परंतु, अतिक्रमण हटवल्यानंतर त्या लोकांचे पुनर्वसन करणे ही मोठी जबाबदारी आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने दोन प्रकारचे धोरण अवलंबले जाते:

*१) पहिले पुनर्वसन आणि नंतर अतिक्रमण हटविणे*

या माध्यमातून पुनर्वसनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटवले जाते.
यामध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) किंवा अन्य पुनर्वसन योजनां अंतर्गत पात्र लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात येते.

*२) आधी अतिक्रमण हटवून नंतर पुनर्वसन:*

तातडीच्या कारवाईसाठी अतिक्रमणे प्रथम हटवली जातात आणि त्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होते.तथा अनेक वेळा अशा लोकांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था केली जाते.

*अतिक्रमण धारकांसाठी*
 *शासनाच्या पुनर्वसन योजना*
भारत सरकार आणि राज्य सरकारे विविध पुनर्वसन योजना राबवतात, ज्या अतिक्रमणग्रस्त नागरिकांना पर्यायी निवासस्थाने किंवा आर्थिक सहाय्य प्रदान करतात.

*१) पंतप्रधान आवास योजना (PMAY)*

या योजनेअंतर्गत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय लोकांसाठी घरे बांधली जातात. या योजना शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र योजना आहेत.त्यात पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि कर्ज सवलती मिळतात.

*२) राज्य सरकारच्या*
 *पुनर्वसन योजना*

महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवतात या योजनांतर्गत झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसन गृहे दिली जातात,

*३) इतर योजनांद्वारे अनुदान आणि मदत*

घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य (अनुदान) दिले जाते,तथा तात्पुरत्या निवासासाठी शिबिरे उभारली जातात.

*कायदेशीर अडचणी*
*आणि लोकांचे हक्क*

*१) संविधानिक व कायदेशीर हक्क:*

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान करते,कोणत्याही व्यक्तीला बेघर करण्यापूर्वी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा अतिक्रमण काढताना पुनर्वसनाची सोय करण्याचा आदेश दिला आहे.

*२) अतिक्रमण हटवताना प्रशासनाला येणाऱ्या अडचणी:*

अतिक्रमणधारकांचा मोठा विरोध होतो,राजकीय हस्तक्षेपामुळे काही वेळा कारवाई लांबते. पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करणे ही मोठी समस्या असते.

*अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसन करणे का आवश्यक आहे?*

*१) मानवी हक्कांचे संरक्षण:* 
कोणत्याही व्यक्तीला राहण्याचा हक्क आहे. अचानक अतिक्रमण हटविल्यास कुटुंबे बेघर होतात.

*२) सामाजिक असंतोष टाळण्यासाठी:*
जर पुनर्वसन नसेल, तर नागरिक आंदोलन करू शकतात.

*३) आर्थिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी:*
बेघर लोकांना नोकरी आणि शिक्षणाच्या संधी गमवाव्या लागतात.करीता सरकारने अतिक्रमण हटविण्यापूर्वी निश्चित योजना आखून त्या नागरिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. पुनर्वसन धोरणात खालील उपाय आवश्यक आहेत:

१) अतिक्रमण झालेल्या भागातील नागरिकांची नोंदणी करून त्यांना पर्यायी घरे देणे.

२) पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांचा योग्य वापर करून लोकांना घरकुल सुविधा देणे.

३) अतिक्रमण हटविण्यापूर्वी नागरिकांना पुरेशी पूर्वसूचना आणि मदतीसाठी वेळ देणे.

४) स्थानीय प्रशासनाने नागरिकांसोबत संवाद साधून योग्य पुनर्वसन धोरण अवलंबणे.अशा योजनांमुळे प्रशासनाची कर्तव्ये पार पडतील आणि नागरिकांचे हक्कही अबाधित राहतील.


=================================
-----------------------------------------------


*शौकतभाई शेख* - 9561174111
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================