💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
‘’महायुद्धानंतर माणसाची जागा कचराकुंडीतल्या कचऱ्यासारखी झालेली आहे,माणसाचे अवमूल्यन झालेले आहे त्यासाठी आता महायुद्धे थांबली पाहिजेत. शांतता निर्माण होण्यासाठी साहित्यिक,तत्वज्ञ कलावंत यांनी भूमिका घेतली पाहिजे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी ते वास्तव नसते. या प्रतिबिंबाच्या तळाशी काय चिकटून बसले आहे ते शोधले पाहिजे. आरसा बळकट तेंव्हा असतो जेंव्हा त्याचा पारा चांगला असतो.साहित्यिकांनी जगभरात माणसे बदलली आहेत. गॉर्कीच्या मदर कादंबरीने पृथ्वीचा तीन चतुर्थांश राजकीय भाग बदलला. ही साहित्याची ताकद आहे. कचऱ्यातील माणूस वाचवायचा असेल तर महायुद्धे थांबवली पाहिजेत त्यासाठी साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे शांतता व अशांतता म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. युद्धाचे कारण देखील तृष्णा आहे. वस्तू खपवण्यासाठी आज युद्धे केली जात आहेत. युद्धात आता नियम पाळले जात नाहीत. ही ठोकाठोकी थांबवली पाहिजे. त्यासाठीच आता बोधीवृक्षाचे रोपटे लावले पाहिजे. बोधिवृक्ष दीर्घायुषी असतो.तो प्राणवायू देतो.त्याच्यावर अनेक जीव मुक्कामाला असतात.कोणत्याही वादळात तो तुटून पडत नाही. बोधीवृक्ष दीर्घायुषी आहे. त्याची मुळे खूप खोल गेलेली पृथ्वीच्या प्रदूषित झालेल्या गर्भाशयातील विष त्याच्या मुळ्या ओढून घेतात. अन अन्नातले प्रोटीन पृथ्वीच्या पोटात सोडतात.पृथ्वीचे गर्भाशय स्वच्छ होते.पुन्हा मग माणसे उगवतात ,संस्कृती उगवत राहतात. प्रदुषणाचा. अशांततेचा, युद्धजन्य परिस्थितीचा पट्टा दूर करायचा असेल,तर प्रत्येकाने साहित्यरुपी ,कलारुपी विचाररुपी,संस्कृतीरुपी बोधीवृक्षाचे एकेक तरी रोपटे आपल्या परिसरात लावावे युद्धाचे ढग पळून जातील’’असे मत ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘ जागतिक शांतता व प्रगतीसाठी भाषासाहित्य व संस्कृतीचे योगदान ‘ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कर्मवीर अण्णांच्या संस्थेत या प्रकारची चर्चासत्र आयोजित करावीत. तसेच जागतिक शांततेवर अजून दोन दिवस पुढे चर्चासत्र आयोजित केल्यास सखोल समज येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. महाविद्यालयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत,अर्धमागधी विभागांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते.
प्रारंभी विषय विवेचन करताना उत्तम कांबळे म्हणाले की,’माणूस निसर्गातून बाहेर पडला तसा तो अशांत होत गेला. सुरवातीला शेतीचा शोध लागला त्या काळात शेती करून घेणारा , आणि शेतीसाठी राबणारा असे दोन वर्ग तयार झाले. पुढे शेती करून घेणारऱ्याची तृष्णा वाढली, त्यातूनच साम्राज्यवाद वाढला. ज्ञान ,सत्ता ,धर्म या क्षेत्रात साम्राज्यवाद वाढला . या सगळ्यात धर्माचा साम्राज्यवाद धोकादायक आहे. माणसाचे मन शांतता आणि अशांतता या दोन्हीनी भरलेले आहे. शांती अंतर्मनात असायला पाहिजे.पण कितीदिवस शांत राहायचे असेही त्याला वाटते. शांतता हे एक मूल्य आहे तर अशांतता ही विकृती आहे. माणसाचा इतिहास पाहता माणसाने दर एक दिवसाला तेरा लढाया केल्याचे आढळते. आतली लढाई जिंकतो तो शांतता मिळवतो .सिद्धार्थ मरतो बुद्ध जन्मतो.माणसाने युद्धे केलीत हेच प्रत्येक प्राचीन धर्म ग्रंथात देखील दिसते. या लढाया सत्य, सत्ता ,न्यायासाठी करतात आणि माणसे मारून ,युद्ध करून शांतता मिळवतात.अणुबॉम्ब शांततेसाठी आहे हे सांगितले. जपान बेचिराख केला.पोखरण करून बुद्ध हसला म्हणून कुचेष्टा करण्यात आली. हिंसेतून शांतता येईल कशी ? अहिंसेतून शांतता येते. जगण्याच्या स्पर्धेत शांतता खलास झाली. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारत साहित्य जन्म घेऊ लागले. प्रश्न विचारले जातात तेंव्हा इथली व्यवस्था प्रश्न चिरडून टाकण्याचे ,माणसे मारण्याचे प्रयत्न करते. विचारी माणूस व्यवस्थेला धोकादायक वाटतो कारण तो प्रश्न विचारतो. हि व्यवस्था त्याच्या विचाराला कोंडून ठेवते,बाजूला टाकते. धर्माच्या आणि जातीच्या नावाने माणसे मारली जातात. माणूस क्रूर होत गेला आहे त्याचे कारण त्याची तृष्णा आहे. म्हणूनच साहित्यिकांनी ,संस्कृतींनी या अशांततेचा विरोध करायला पाहिजे आणि शांततेचे स्वागत करायला पाहिजे शांतता निर्माण करण्यासाठी रोल करावा लागतो. येशूखिस्त शांततेसाठी जगावर प्रेम करा सांगतो. शांती पाहिजे असेल तर बियाणे शोधा. मनातले युद्ध संपवा. शांततेसाठी पोवाडे लिहा .जातिवंत साहित्यिकाच्या काळजात ब्युटी पार्लर असते. त्याच्याकडे दोन गोष्टी असतात त्याची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी असते तर त्याच्या मनातली वेदना इतरांचे दुःख समजावून घेत असते. माणूस आज संकटात जगतोय.त्याला सुरक्षितता नाही. त्यामुळे त्याला न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. सौंदर्य संघर्षातून जन्मते. जगात शांती निर्माण होण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे प्रास्तविक प्रा.डॉ.केशव पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी या विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल कॉलेजचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आभार प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी मानले. यावेळी चीनच्या सुझाऊ विद्यापीठातील प्राध्यापक फरझान हरत्यान यांनी बीजभाषण केले. डॉ,अर्जुन चव्हाण,डॉ.मुग्धा गाडगीळ, डॉ.राजश्री मोहाडीकर,राजू केंद्रे इत्यादी मान्यवर वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.अनेक मान्यवर चर्चासत्रास उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनानुसार मुख्य समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, समन्वयक डॉ.केशव पवार, डॉ. प्रदीप शिंदे ,प्रा.ऋषिकेश काळे, प्रा.विजया गणमुखी व भाषा विभागातील प्राध्यापक यांनी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले.
===================================
--------------------------------------------------
*वृत्तविशेष सहाय्य*
डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment