ऑनलाईन सुविधेचा वापर करत युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
*जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय*
*मतदार दिवस उत्साहात साजरा*
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १४ व्या राष्ट्रीय
मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर
जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, दिव्यांग मतदार अलका, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, देशात साजरा होत
असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प आपण सर्व मिळून यानिमित्ताने करूयात. मतदार यादीत समानता असली पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व घटकांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी बी. एल. ओ. पासून ते वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी जागरूकपणे काम केल्यामुळे मतदारांची नोंदणी वाढली आहे. या प्रक्रियेत शिक्षक,विविध विभागांचे कर्मचारी, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मतदान जागृती मोहिमेत १ लाख २५ हजारापेक्षा अधिक नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात मतदान नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान कार्डचे
वाटपही करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,
सहायक मतदार नोंदणी अधिकारी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे तर मतदार जागृतीच्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार संजय शिंदे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील यांनी केले.
यावेळी नवमतदारांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदान जागृतीसाठी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्त्यांनी पथनाट्यही सादर केले. शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल व लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी नवमतदारांना प्रतिज्ञाही देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्राध्यापक यांच्यासह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment