- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ भाषा मंडळ तसेच छ. शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग व मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 'पालीभाषा मूलभूत ज्ञान परिचय' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले.
यावेळी मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूटचे पाली भाषेचे अभ्यासक अरविंद भंडारे आणि विलास ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. अनिल वावरे म्हणाले की," भगवान बुद्धाने सत्ता, संपत्तीचा त्याग करून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य खर्च केले. त्यांचे अनमोल असे ज्ञान पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात काही प्राचीन भाषा लुप्त होऊ पाहत आहेत. पालीसारख्या भाषेचे महत्त्व ओळखून ह्या भाषा संवर्धित करून त्यातील ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे." असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, " छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. ह्या महाविद्यालयाने घडवलेले काही विद्यार्थी आज महाराष्ट्रात, देशात आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहे. पाली भाषेच्या अभ्यासातून भगवान बुद्धाचे मानवी कल्याणाचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल म्हणून विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ह्या भाषेचा सखोल अभ्यास करावा."असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले तर प्रा.डॉ.विद्या नावाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमासाठी प्र. प्राचार्य डॉ.बी. एस.चव्हाण, उपप्राचार्या प्रा.डॉ.रोशनआरा शेख, उपप्राचार्य प्रा.डॉ. रामराजे माने-देशमुख,प्रा. डॉ .शिवाजी पाटील,प्रा.डॉ. राज चव्हाण प्रा. डॉ.केशव पवार, प्रा. डॉ. प्रदीप शिंदे विविध अधीविभागातील प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पाली भाषेचे संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, विद्यार्थिनी , साहित्यिक, बुद्ध तत्वज्ञान अभ्यासक,आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment