राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, April 17, 2025

ख्रिस्त - नाकारलेलादगड कोनशिला झाला


एखादी गोष्ट सत्य आहे, शाश्वत आहे हे माहीत असताना सुद्धा ती जाणीवपूर्वक न स्वीकारणे म्हणजे नाकारणे होय. शीर्षकातील जो दुसरा शब्द आपल्याला खुणावतो तो म्हणजे "कोनशिला".
प्रत्येक दगडाच्या नशिबी कोनशिला होण्याचं भाग्य नसतं. मग असा कोणता दगड असतो की, ज्याला कोनशिला असे संबोधले जाते. पूर्वीच्या काळी दगडी बांधकाम जास्त प्रमाणात केले जायचे. बांधकामासाठी भरीव आणि आकारबद्ध दगड वापरला जात असे. एखाद्या इमारतीचे बांधकाम करीत असताना हजारो दगडं लागत असली तरी, बांधकामाच्या सुरुवातीला जो दगड प्रथम ठेवला जायचा त्याला मानाचे स्थान असायचे. हा तोच दगड जो बांधकामाची संरचना निश्चित करतो म्हणून त्याला कोनशिला असे संबोधले जाते.
कोनशिला हा शब्द इतरही काही संदर्भांसाठी वापरला जातो. पूर्वी ऐतिहासिक बांधकाम पूर्ण झाल्यावर ते काम कोणाच्या राजवटीत व केव्हा पूर्ण झाले त्याची संक्षिप्त माहिती एका भरीव दगडावरती कोरीत असत त्याला कोनशिला म्हणून ओळखले जाई. तो शब्द आजही प्रचलित आहे. आजही घर वजा शासकीय व इतर बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची तारीख, वास्तूविशारद, उद्घाटक यांसह इतर माहिती ज्या दगडावरती कोरली जाते त्याला कोनशिला अथवा बहुधा चर्चिला जाणारा शब्द "शिलालेख" या नावाने ओळखले जाते.
बांधणाऱ्या गवंड्याने जर एखादा दगड नाकारला असेल आणि तोच दगड जर वास्तुविशारदाने प्राधान्य क्रमाने निवडला असेल तर हा नाकारलेला दगडच कोनशिला ठरतो. नाकारलेल्या दगडाने कोनशिला ठरावं यासारखी अद्वितीय गोष्ट नाही.
अगदी या उदाहरणाप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडल्याचे आपल्याला पवित्र शास्त्रात पहावयास मिळते.
शास्त्रात (१ पेत्र - ०२:०४) मध्ये सांगितल्याप्रमाणे मानव मुक्तीसाठी स्वर्गीय पित्याने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठविला ज्याला जिवंत धोंडा असे संबोधले आहे. देवाची ही यथार्थ व बहुमोल निवड मात्र जगाला समजली नाही आणि कळत नकळत ख्रिस्त या जगाकडून नाकारला गेला. 
ख्रिस्ताच्या बाबतीत लोक अनभिज्ञ होते असे नाही कारण ; त्याच्या जन्मावेळी रानातील मेंढपाळ आणि मार्गस्थ तीन राजांना (ज्ञानी लोकांना) "तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे" ही शुभवार्ता कळविण्यात आली होती. याच ज्ञानी लोकांकडून हेरोद राजाला देखील ही माहिती मिळाली होती. 
मत्तयकृत शुभवर्तमान (०३:१७) नुसार आकाशातून वाणी झाली होती की, “हा माझा पुत्र आहे, ज्याच्यावर मी प्रेम करतो; त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा (मत्तय - ०३:११) अन्वये सांगितले होते की, "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा ; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही ; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे." ख्रिस्त आगमनाचे असे एक ना अनेक दाखले आपणांस नव्या व जुन्या करारात सुद्धा पहावयास मिळतात.
ख्रिस्ताचे मानवरूप धारण करून येणे केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर ती दैवी योजना होती. त्याचे येणे म्हणजे एक मिशन होते. मानव मुक्तीचे उद्दिष्ट उरी बाळगून तो आला होता. 
ख्रिस्त जन्माच्या अगोदरचा शास्त्रभाग म्हणजे जुना करार अभ्यासल्यास आपल्या लक्षात येते की, परमेश्वर पित्याने निर्मिलेल्या प्रथम स्त्री आणि पुरुष अर्थात आदाम व हवा यांनी केलेल्या पापामुळे मूळ पापाचा डाग मानवाला मिळाला आणि मानवजात मृत्यूची धनी झाली होती.
अशातच ख्रिस्त येण्याअगोदर स्वैराचार, कर्मकांड, धर्मपंडिताद्वारे समाजाची दिशाभूल तसेच देवाचे अस्तित्व नाकारून तत्कालीन राजांद्वारे स्वामीत्व प्रस्थापित करणारी भूमिका अशी एकूण सामाजिक परिस्थिती होती. या देवराज्याच्या संकल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी होत्या. यापासून मानवाला दूर करणे आवश्यक होते. सन्मार्ग सन्मती व सत्संगाचा अवलंब होणे गरजेचे होते. प्रेम, दया, क्षमा, शांती या मनुष्य जन्मास स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या गोष्टींची मानवाच्या अंत:करणात पेरणी करणे महत्त्वाचे होते. 
यासाठीच की काय, स्वतःच्या पापांचे स्मरण करणे, पश्चातापी अंत:करणाने देवापुढे ती पापे कबूल करून, पापमुक्तीची याचना करणे व पुन्हा तेच ते पाप न करण्याचा निर्धार करणे, हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी मानवाच्या अंधकारमय आयुष्यात ख्रिस्त नावाचा तेजस्वी तारा अवतरला. आपल्या साडे तेहतीस वर्षाच्या आयुष्यात तो लोककल्याणासाठी झटला. त्याने जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. तो उत्तम गुरु असल्याने त्याने लोकांना दाखले देऊन सत्य समजावून सांगितले. देवराज्याची घोषणा केली. लोक माझ्याकडे येतील ही आशा न बाळगता तो लोकांपर्यंत पोहोचला. लोक भेटतील तिथे अगदी नदीच्या किनाऱ्यावर, डोंगराच्या माथ्यावर, बाजारात, मंदिराच्या ओट्यावर जमेल तिथे त्याने लोकांना उपदेश केला. पित्याचा अचूक संदेश या माध्यमातून त्याने जगापर्यंत पोहचवला. त्याच्या येण्यापूर्वी लोक मोशेच्या नियमशास्त्रानुसार जीवन जगत होते. यहूदी लोकांना आणि धर्मपंडितांना असे वाटले की, हा मोशेचे नियमशास्त्र बदलायला आला आहे. पण ख्रिस्त म्हणतो " मी मोशेचे नियमशास्त्र बदलण्यास नव्हे तर ते पूर्ण करण्यास आलो आहे." परंतू हे लोकांच्या ध्यानी आले नाही. त्यांनी सोयीस्करपणे ख्रिस्त नाकारला. 
तत्कालीन राज व्यवस्थेला, धर्मपंडितांना, शास्त्री-पुरुषींना देखील ख्रिस्ताची ही गोष्ट खटकली. ख्रिस्ताच्या सत्य सांगण्याने आपले अस्तित्व धोक्यात येईल ही भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी त्याच्यावर दोषारोपपत्र ठेवून कपटाने त्याला पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. ज्या राजाच्या दरबारात हा खटला सुरू होता त्या पिलात राजाला ख्रिस्तात काहीच दोष दिसेना.
मग तो हात धुवून मोकळा झाला आणि ख्रिस्ताला त्याने लोकांच्या हवाली केले. जनसमुदायाने त्याला क्रूसावर खिळा ही मागणी लावून धरली. वाढत्या जनसमुदायाच्या दबावाने जी शिक्षा चोर लुटारूंना दिली जायची ती वधस्तंभाची शिक्षा त्याला देण्यात आली. त्याच्या शिरावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. तो रक्तबंबाळ झाला. त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले. लोक त्याच्या तोंडावर थुंकले. शक्तीहीन झालेला ख्रिस्त खांद्यावरती क्रूस घेऊन कालवारी टेकडीचा मार्ग चालला. तो कन्हला, विव्हळला पण कुणाला त्याची दया आली नाही. हातीपायी खिळे ठोकून त्याला क्रुसावर टांगण्यात आले.
त्याचे येणे होईपर्यंत लोक पापमुक्तीसाठी परंपरेनुसार कोंकराचा बळी देत असत मात्र ; स्वर्गीय पित्याचे निष्पाप कोंकरू मानवाचे तारण व्हावे म्हणून कर्तव्याची जाणीव ठेवून, पित्याच्या आदेशान्वये वधस्तंभी निपचित पडले होते. 
थोड्यावेळासाठी असत्य सत्यावर हसलेही असेल पण ; असत्याचा हा असुरी आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण तिसऱ्या दिवशी मृत्युंजयी ख्रिस्त मरणातून उठणार होता नव्हे; तो पुनरुत्थित प्रभू उठला. पुनरुत्थानानंतर ४० दिवसांच्या जगीक यात्रेदरम्यान तो मारिया मग्दालिन व आपल्या १२ शिष्यांसह अनेकांना भेटला. चाळीसाव्या दिवशी तो सर्वांसमक्ष स्वर्गात घेतला गेला. 
त्याच्या पुनरुत्थानाने मृत्यूनंतरही जीवन आहे हे जगाला कळाले. ख्रिस्त सांगत आलेल्या सार्वकालिक जीवनाची प्रचिती आली. त्याच्या निष्पाप रक्ताने आपली पापातून मुक्तता झाली हे जगाला समजले. त्याच्या निरपराध रक्ताचे मोल कळाले. चोर - दरोडेखोरांना शिक्षा देण्यासाठी वापरला जाणारा शापित क्रूस (वधस्तंभ) ख्रिस्ताच्या स्पर्शाने पावन झाला. क्रूस विजयाचे निशाण ठरले.
दरम्यान त्या निरपराध कोंकराला आरोप प्रत्यारोप, न्याय निवाडा, अवहेलना व निर्दोष मरण यातून जाणे भाग पडले. जगाने त्याला नाकारले परंतू स्वर्गीय पित्याचा हा प्रिय पुत्र स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसला आहे. तो न्यायाच्या दिनी मेघारूढ होऊन पुन्हा येईल. त्याने दिलेल्या पुनरुत्थनाच्या आशेने उभ्या जगाने ख्रिस्त स्वीकारला.
 अशा तऱ्हेने जगाने नाकारलेला पण देवाने निवडलेला तारणदुर्गाचा दगड (ख्रिस्त) कोनशिला झाला.
प्रसंगानुरूप या गीताच्या
 ओळी मला प्रकर्षाने आठवतात...
"हरेक धोंडा घडवू ऐसा,
 कोनशिला तो व्हावा !
बांधणारा हा जरी नाकारी, 
मान्य प्रभुला व्हावा !
विश्वासाचा घालून पाया,
 करू मंदिर महान !
धोंडे शोधू चला रे, छान छान छान !!!

=================================
-----------------------------------------------
*लेखन*
रवि त्रिभूवन (सर) ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9623280978 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
  *प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment