जमात ए इस्लामी तर्फे सर्वधर्मीयांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न
बकरीदचा वैश्विक संदेश
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जमाअते इस्लामी हिंद,नगर तर्फे नगर शहरातील कासमखानी मशीद याठिकाणी सर्वधर्मीय बांधवांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक करताना डॉ. इक्राम खान यांनी सर्वधर्मीयांना बकरीदची पार्श्वभूमी व संदेश समजाऊन सांगितले व गैरसमज दूर करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. सय्यद रफीक यांनी बकरीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) माता हाजरा (अ.) व पुत्र इस्माईल (अ.) यांच्या महान त्याग व बलिदाना प्रित्यर्थ साजरी केली जाते हे विषद केले. इब्राहीम (अ.) यांनी तत्कालीन अंधश्रध्दा, अनीष्ठ रूढी-परंपरा व देवा-धर्माच्या नावावर होणा-या जनसामान्यांच्या शोषणा विरूध्द सर्वस्वाने संघर्ष केल्याचे विषद केले. नियतीने त्यांना देवाधर्माच्या नावावर प्रचंड शोषणाचे केंद्र असणा-या श्रीमंत देवस्थानाचे सर्वेसर्वा असणा-या पिता आजर यांच्याच पोटी जन्माला घातले.
इब्राहीम (अ.) यांचा संघर्ष घरातूनच सुरू झाला. त्यांचे उभे जीवन त्यागाचे, कुर्बानीचे प्रतीक आहे. या संघर्षात त्यांना पत्नी सारा (अ.) हाजरा (अ.) पुतण्या लूत (अ.) व मुले अनुक्रमे इस्माईल (अ.) व इसहाक (अ.) यांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. इसहाक (अ.) यांच्या वंशातच याकूब (इस्राइल) (अ.), यूसूफ (अ.), मूसा (अ.), मरियम (अ.) व इसा (येशू) (अ.) इ. अनेक प्रेषित जन्मले आणि इस्माईल (अ.) यांच्या वंशात २५०० वर्षांनंतर मक्का येथेच शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला असे नमूद केले.
प्रमुख पाहुणे इंजिनिअर वाजीद अलीखान यांनी आपल्या प्रमुख भाषणात बकरीदचा ४००० वर्षांपूर्वीचा इतिहास विषद केला. प्रेषित इब्राहीम (अ.) व इतर तमाम प्रेषितांचाच वारसा शेवटचे प्रेषित पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विशूध्दपणे पून्हा जोमाने चालविला व एक आदर्श नागरिक, आदर्श कुटूंब, आदर्श समाज व आदर्श राज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवल्याचे त्यांनी सप्रमाण दाखले देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले. मक्का मशीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) व इस्माईल (अ.) यांनी ४००० वर्षांपूर्वी मक्का येथे बांधली. जे आजही एकेश्वरवादाचे, समतेचे, विश्वबंधुत्वाचे व शांतीचे केंद्र आहे हे स्पष्ट करून हज्ज यात्रेसाठी त्यांच्याच स्मरणार्थ दरवर्षी जगाच्या कानाकोप-यातून मुस्लिम बांधव एकत्र येऊन समता व बंधूत्वाचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात इ. अनमोल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी सावित्री फातेमा सद्भावना मंचाचे अध्यक्ष ॲड. संभाजी बोरुडे, मराठा सेवा संघाचे विठ्ठलराव गुंजाळ, अशोक सब्बन, नवेद बिजापुरे, मुश्ताक सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, फिरोज शेख व इतर सर्वधर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुबीन खान यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रश्नोत्तरासाठी ही संधी दिल्याने अनेक शंका-कुशंकांचे निरसन झाले. शेवटी जमाअतचे स्थानिक अध्यक्ष सय्यद नईम यांनी सर्वांचे आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष म्हणजे* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment