शिवाजी राऊत यांच्या ‘सत्यशोधक विचारधारा", आणि दिलीप महादार यांच्या ‘आसूड’ या ग्रंथांचे प्रकाशन
- सातारा - प्रतिनिधि - / वार्ता -
‘सावित्रीबाई यांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे परंतु अजूनही समाजातील अनेक स्तरातल्या लोकानी सावित्रीचे दुःख समजून घेतले नाही. आपल्या समाजातील बहुजन आणि अभिजन
यांच्यातील अंधश्रद्धा अजूनही निघून गेलेली नाही. दिलीप महादार यांच्या आसूड कवितासंग्रहातील कविता
या अंधश्रद्धा निर्मुलन जनजागृतीच्या कविता आहेत.
समाजाला डोळस करण्याचे काम त्या करीत आहेत.
यादृष्टीने तो आपला कवी आहे. काल्पनिक प्रतिमांच्या
भानगडीत ते पडलेले नाहीत. मला एक गोष्ट जाणवते
अलीकडच्या काळात मराठी कवितेत अनिसच्या विचारांचा प्रवाह निर्माण झाला आहे. अशा कविता मराठीत विपुल प्रमाणात असून त्या सर्व संकलित केल्या पाहिजेत, त्यांचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे’ असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने आयोजित केलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी कार्यक्रम व शिवाजी राऊत यांच्या सत्यशोधक विचारधारा व दिलीप महादार याच्या ‘आसूड’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.हमीद दाभोलकर,प्रमोदिनी मंडपे, शिवाजी राऊत,दिलीप महादार प्रकाशक अनिकेत फरांदे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, कुमार मंडपे सर,प्रशांत पोतदार, तुषार बोकेफोडे, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महादार यांच्या कवितेबद्दल बोलत असताना ते म्हणाले ‘’ आज लेकी सुना नोकरीला लागल्या पण शिकूनही सावित्रीबाई यांची जाणीव त्यांच्यात आली नाही .आपले शिक्षण आपले वर्तन याकडे आपले लक्ष नाही. वटवृक्षाला फेऱ्या मारताना आपण विचार करायला पाहिजे .दिलीप महादार यांची कविता प्रश्न विचारणारी कविता आहे, ती वर्णनपर आहे.’
सत्यशोधक विचारधारा या ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणाले ‘ शिवाजी राऊत वाचनाचा नाद आहे. सतत ज्ञानार्जनाच्या मागे असणारा समाजशिक्षक म्हणजे शिवाजी राऊत आहेत. त्यांचा पिंड तत्वचिंतनाचा पिंड आहे. १९ व्या शतकातील महाराष्ट्र त्यांच्या सत्यशोधक विचारधारा पुस्तकात आहे. सत्यशोधक ते गांधीजीपर्यंतचे तत्वचिंतन त्यांचे आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .
सत्यशोधकाचे ब्राह्मणेतर कसे झाले याचेही विश्लेषण त्यांनी केले आहे. सत्यशोधक चळवळ आज संपली आज तिचे अवशेष फक्त आपल्याला दिसतात. कर्मवीर
भाऊराव यांनी जलशातून भाषण करून प्रबोधन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राजकीय चरित्र अद्यापि
कोणीही लिहिलेले नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. १९१९ नंतर आरक्षणाच्यानंतर सत्यशोधक चळवळ सत्तेकडे गेली. शेतकरी असल्याशिवाय काँग्रेस, पुढे जाणार नाही अशी भूमिका महर्षींची होती असेही ते म्हणाले
सत्यशोधक विचारधारेच्या संदर्भात बोलताना किशोर बेडकिहाळ म्हणाले’ १८८५ ते १९३८ या काळात कॉंग्रेसमध्ये ब्राह्मणेतर नेतृत्व नव्हते.१९३८ नंतर केशवराव जेधे हे नेतृत्व मिळाले त्यानंतर कॉंग्रेस शेतकरीमय झालेली दिसते. शेतकरी कॉंग्रेसमय झालेली दिसते. महाराष्ट्राचे प्रबोधन हे सामाजिक सुधारणांच्या अंगाने होते ते राजकारणाच्या अंगाने नव्हते.पुढे राजकारणाचे अंग आले.महर्षी शिंदे उपेक्षित महात्मा होते. ‘आमचे समाजसुधारक धर्म विन्मुख आहेत ते धर्म सन्मुख व्हायला हवेत. समाजातील आरोग्य व इतर सुधारणा याकडे समाज सुधारकांनी लक्ष द्यायला पाहिजे असे विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते. आजचा बहुजन म्हणजे बहुजन नव्हे. बहुजन म्हणजे नुसत्या जाती नव्हेत, बहुजन राजकारणाची संकल्पना महर्षी यांची वेगळी होती, सत्ता,संपत्ती,आणि शिक्षण या पासून जे वंचित आहेत ते बहुजन अशी संकल्पना त्यांनी सांगितली होती...महर्षी यांनी जनपद पक्ष असे नाव दिले होते. वंचित घटक म्हणजे बहुजन अशी ती संकल्पना होती. वर्गीय राजकारणाचे एक रूप त्यांनी ठेवले होते. डॉ.आंबेडकर यांच्या अगोदर आणि फुल्यांच्या नंतर महर्षी शिंदे हेच बहुजनाचे पुढारी होते. सुधारणा म्हणजे सामाजिक सुधारणा ,धर्म सुधारणा असे त्यांचे मत होते. आज मोठ्या प्रमाणात जातीच्या अस्मिता राजकारणात आलेल्या आहेत.महाराष्टाला विचाराचा प्रांत म्हणवला जातो,पण आपण अधिक संकुचित होत चालल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे राजकारण खुरटलेले आहे. महापुरुषांना जातीच्या चौकटीत ठेवले जात आहे.जनतेच्या प्रश्नांची जाणीव त्यांना नाही.कोणीतरी फितवत राहते,बहुजन फितत राहतात. त्यामुळे बहुजन समाजाची आज फरफट होत आहे. सत्यशोधक भूमिका आपण पुन्हा अभ्यासली पाहिजे .सत्यशोधक प्रवाहाचे आपण घटक आहोत म्हणून आपण मोकळेपणाने सांगायला पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की ‘दिलीप महादार हे कर्ते सुधारक आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून त्यांच्या विचाराला दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला होता. पण त्यांचे विचार संपलेले नाहीत हे अशा पुस्तकातून कळते. संत आणि समाज सुधारक यांचा वारसा शिवाजीराव राऊत व दिलीप महादार यांचे लेखनात आहे. आपण सत्यशोधनवादी आहोत .गांधीजीनी सुरवातीस ईश्वर हे सत्य मानत होते पण नंतर सत्य हेच ईश्वर आहे असे मत त्यांनी मानले. सत्यशोधनाचा विचार पुढे नेण्याचा लढा आपण सोडलेला नाही तो पुढे नेऊया ’असे ते म्हणाले.
ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या‘डॉ.एन.डी.पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विचार पोहचवले. महर्षी शिंदे अस्पृश्यता दूर व्हावी म्हणून ते महारवाड्यात कुटुंबासहित राहिलेले आहेत. त्यांना महार शिंदे म्हणून टिंगल केली पण त्यांनी अस्पृश्यांचे कल्याण करण्याचे काम केले. ते उपेक्षित राहिलेले दिसतात. अस्तित्वात नसलेल्या सरस्वतीला महत्व दिले जाते ,पण सावित्रीबाई यांनी खरी शिक्षणाची पाटी आपल्या हातात दिली त्यांचे कार्य माहित असूनही आपण त्यांच्या सारखी कृती करत नाही हि खंत त्यांनी व्यक्त केली.
फुलेंच्या लेखनाचे परिशीलन करणारे विचार राऊत व महादार यांच्या लेखनात दिसतात. अंधश्रद्धेवर उगारलेला आसूड म्हणजे महादार यांची कविता आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. तुषार बोकेफोडे ,दिलीप महादार, प्रशांत पोतदार ,शिवाजी राऊत, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास डॉ.शिवाजी पाटील ,सुर्यकांत गायकवाड, अमितकुमार शेलार,प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे मराठी विभाग ,विवेक वाहिनी विभागातील विद्यार्थी ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते,उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.विद्या नावडकर यांनी मानले.
*फोटो ओळी*
आसूड कवितासंग्रह व सत्यशोधक विचारधारा या ग्रंथाचे प्रकाशन करताना –
डावीकडून प्रकाशक अनिकेत फरांदे .डॉ.हमीद दाभोलकर , प्रमोदिनी मंडपे .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,किशोर बेडकीहाळ,शिवाजी राऊत ,दिलीप महादार, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
==================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
==================================
No comments:
Post a Comment