सातारा
शेकडो वर्षे विद्येला मुकलेल्या आणि सामाजिक गुलामगिरीच्या आणि जातिभेदाच्या कर्दमात खोल रुतलेल्या बहुजन समाजाला माणुसकीचे हक्क पाप्त करून देण्याच्या उद्देशाने ४ ऑक्टोबर १९१९ सली कर्मवीर आण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर आण्णा बहुजन समाजामध्ये स्वावलंबी शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता महाराष्ट्भर वणवण हिंडले.त्यांनी जीवापाड श्रम केले.डोक्यावर टोपी नाही, पायात वाहणा नाही, हातात फक्त काठी, अशा तऱ्हेने आण्णानी समाजात शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला.आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हे रयत शिक्षण संस्थेचे माहे जून १९४७ मध्ये स्थापन झालेले पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त पहिले कॉलेज म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेजविषयी काही आण्णांचे प्रसंग प्रस्तुत लेखात चित्रित करण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
“घामाने डबडबलेले शरीर” हाच आण्णांच्या मते व्यक्तीचा सर्वोच्च अलंकार होता.कर्मवीरांना विद्यार्थ्यांनी घाम गाळून घेतलेली स्वावलंबी विद्याच आवडत होती.स्वावलंबन हे त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञानच होते. विद्यार्थ्यांना विद्यासंपन्न करून भारतात आदर्श समाजसेवक तयार करावयाचे होते.आई-वडिलांनीच मुलाला तांब्याभर पाणी द्यावे लागणे म्हणजे शिक्षणाचा पराभव आहे, हे शिक्षण नसून विष आहे. हे विष बाहेर फेकून दिले पाहिजे.निरोगी मनाचे निरोगी शरीराचे तरुण या छत्रपती शिवाजी कॉलेजमधून निर्माण झाले पाहिजेत ही आण्णांची भूमिका होती. माझ्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मुलगा स्वावलंबनाने B.A., B.Ed., M.A. झाल्यानंतर त्याने दुर्गम,लहान खेड्यातील-डोंगरातील शाळेवर काम करण्याची तयारी ठिवली पाहिजे.तसेच त्याने ओसाड रानात काम करण्याची तयारी ठेवून त्यांनी शिकले पाहिजे, त्याने निष्ठेने पवित्र्याने काम केले पाहिजे. ‘श्रम योजनेत काम करून आणि वसतिगृहात राहून’ उच्च शिक्षण पूर्ण करणारी मुलेच उद्या भावी भारताचा शैक्षणिक चेहरा मोहरा बदलू शकणार आहेत यावर आण्णांचा ठाम विश्वास होता.आणि म्हणूनच कर्मवीर आण्णांनी सर्वप्रथम बोर्डिंग काढली, वसतिगृह काढली. खऱ्या अर्थाने वसतिगृहयुक्त शिक्षण हेच कर्मवीरांचे शैक्षणिक मानसशास्त्र होते हे त्यांच्या अनेक प्रसंगावरून लक्षात येते.
हुशार, होतकरू व श्रमणारी, कष्ट करणारी मुले खेड्यांमधून आणून वसतिगृहात ठेवून आण्णांनी त्यावर संस्कार केले. कारण अशा विद्यार्थ्यांना बोर्डिंग मध्ये ज्यादा शिकवणी लावायची गरज नाही. त्यांना जात, गोत, धर्म, पंथ या भेदांना मूठ माती देण्याची प्रत्यक्ष कृती करण्याचे शिक्षण आपोआपच वस्तीगृहातून दिले जाते. स्वावलंबी व स्वाभिमानी शिक्षणाबाबत त्यांना आवड उत्पन्न करायची. एकत्र स्वयंपाक करावयाचा, एकत्र जेवायचे, एकत्र राहायचे, सहभोजन, सहजीवन, सहशिक्षण हा अभिनव क्रांतिकारी प्रयोग अखिल भारतात अण्णांनीच प्रथम केला. घामाच्या धारामधून मोत्यांचा चारा पिकविला. फलटणच्या महाराजांच्या सातारा कॅम्प मधील छोटेखानी बंगला अण्णांनी १९४० मध्ये मिळवला होता. तेथे राजर्षी शाहू महाराज यांचे जिवंत स्मारक म्हणून महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्सी हायस्कूल अण्णांनी १९४० मध्ये सुरू केले होते. पुढे १९४७ मध्ये याच बंगल्यात छत्रपती शिवाजी कॉलेज फ्री अँड रेसिडेन्सी सुरू करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील एकदा गावातून चालले होते. समोरून श्री. बाळासाहेब देसाई, त्यावेळचे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डचे प्रेसिडेंट चालत आले. दोघांची भेट झाली. आण्णा म्हणाले,काय बाळासाहेब, बोलायला गाठ पडली बघा. मी मनात जे योजीत होतो तेच घडले बघा. चला ✍️५ त्यांची सरकारकडे मागणी असे. जमिनीतील मातीत तुम्ही हात व मनगटे घासा, ती तुमची काळी आई आहे. तिची तुम्ही सेवा करा. म्हणजे ती माता तुम्हास भरपूर मोबदला देईल.
अण्णांच्या मृत्यूपूर्वी अवघे तीन तासच आण्णांचा ड्रायव्हर उद्धव त्यांना भेटला होता. त्याला अण्णा म्हणाले- “उद्धव, आता जून मध्ये शिवाजी कॉलेजला खेडोपाड्यातील गोरगरीबांची खूप मुले उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील. अद्याप आपणास होस्टेलची इमारत नाही, कल्याणी बर्याक्स सोडू नको म्हणून पी.जी. सरांना सांग व सदर बझारमध्ये मध्ये तुझ्या घराजवळ जे बंगले आहेत, त्यापैकी एक मोठा बंगला बघून ठेव. आपल्या कॉलेजच्या होस्टेलसाठी तो लागेल. ध्यानात ठेव. जा आता.” उद्धव तिथून नऊ वाजता निघाला. एसटीतून सातारला एक वाजता उतरला तर त्याला बातमी कळली की, आण्णा गेले. त्याला खरेच वाटेना. या प्रसंगावरून असे दिसते की, आण्णांना मृत्युसमयी सुद्धा मुलांच्या राहण्याबद्दल वसतिगृह असावे याची त्यांना अतीव काळजी असलेली या प्रसंगातून आपणास दिसून येते. शेवटच्या घटके पर्यंत आण्णा संस्थेची काळजी करत होते.
वस्तीगृहामध्ये मानवतेची थोर शिकवण दिली जाते व हे शिक्षण विद्यार्थ्यांनी कष्टाच्या घामाने मिळवले पाहिजे, स्वावलंबनाने मिळवले पाहिजे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण, श्रम हीच पूजा. Laboraer est Orare -Work is workship. हे तर आमच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे ब्रीद वाक्यच आहे. या कर्मवीरांच्या घोषणा मागे फार मोठे शैक्षणिक तत्त्वज्ञान व मानसशास्त्र उभे होते आणि आहे. अमेरिकेतील निग्रो समाजामध्ये बुकर टी वॉशिंग्टन या निग्रो शिक्षणतज्ञाने निग्रो लोकांसाठी कार्य केले व भारतातील बहुजन समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक दैन्यावस्था याच्यासाठी अण्णांनी कार्य केले. जे कार्य बुकर टी यांनी ज्ञातीबांधवांकरिता केले तेच कार्य कर्मवीर भाऊराव यांनी भारतातील शेतकरी, शेतकरी, कामगार, जनतेतील विद्यार्थ्यांसाठी केले म्हणूनच “From Booker T. to Bhaurao P. असे या प्रयोगाचे नामाभिधान करण्यात येते.
वसतिगृह जीवनावर भर, जातीय ऐक्य, स्वावलंबन, स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा, श्रम, पावित्र्य, भूमातेशी प्रत्यक्ष संबंध, मानवतावाद, विश्वबंधुत्व, स्वातंत्र्यचिंतन व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, त्यागी, साधेपणा, जनतेशी एकरूपता हे गुण विद्यार्थ्यांमध्ये या स्वावलंबनातून आणि वसतिगृहयुक्त शिक्षणातूनच येतात. वसतिगृहयुक्त शिक्षणावर कर्मवीरांची फार मोठी श्रद्धा होती. १९०७ पासून त्यांनी गरीब होतकरू मुलांना वस्तीगृहामध्ये नेऊन ठेवण्यास सुरुवात केली होती. पहिला विद्यार्थी श्री ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप, दुधगाव येथे १९०९ साली, काले येथे १९१९ साली, नेरले येथे १९२०-२१ साली -अशी वसतिगृहे त्यांनी काढली व सातारला तर १९२४ मध्ये स्वतःच्या राहत्या घरीच एका हरिजन मुलास घेऊन वसतिगृह सुरू केले. जात, बौद्ध, धर्म, पंथ, भेद नष्ट करण्यास वसतिगृहाइतके दुसरे प्रभावी साधन होऊच शकत नाही. एकाच खेडेगावातील जातिवंत घरंदाज पाटील घराण्यातील मुलगा, जैन, साळी, माळी, महार, मांग, ढोर इत्यादी मुले एकत्र येतात, स्वयंपाक करतात. श्रम करतात. स्वकष्टाने शिक्षण घेतात हा प्रयोगच मुळात राष्ट्रसंवर्धन मूलगामी व क्रांतिकारक मूल्यांनी भरलेला असा होता. आणि म्हणूनच वस्तीग्रहयुक्त शिक्षण आजच्या काळातील आणि पुढील काळातील विद्यार्थ्यांना देणे अत्यंत गरजेचे आहे.
या देशात शारीरिक श्रम करणाऱ्यांची उपेक्षा झाल्यामुळेच आपली अधोगती झाली आहे हे ओळखून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी श्रम करणे म्हणजेच पूजा करणे हा मंत्र कर्मवीरांनी प्रत्यक्षात उतरवला. श्रमाच्या मोबदल्या शिक्षण देण्याचे हे जे पर्व आण्णांनी निर्माण केले त्यातूनच बहुजन समाजाला मुक्ती मिळणार आहे व माणूस म्हणून स्वाभिमानी जीवन जगता येणार आहे. यातूनच एकजिनसी समाज निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीच्या कार्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाटा असेल.श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, स्वातंत्र्य ही भाऊरावांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची चतु:सुत्री होती. यावर संस्थेची सर्व मदार आहे. पोशाखी व पुस्तकी शिक्षणापेक्षा वरील प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्याला दिले गेले तर भारताचा अभ्युदय लवकर होईल असे ते म्हणत.
स्वावलंबी शिक्षणाचे भव्य व दिव्य तत्त्वज्ञान रयत संस्कृतीमध्ये, रयत शिक्षण संस्थेत आढळते. त्याची सुरुवातच छत्रपती शिवाजी कॉलेजमधून झाली आहे. कर्मवीरांच्या शिक्षणशास्त्राचा विचार करताना सर्व गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. लोळागोळा झालेल्या बहुजन समाजाला संजीवनी देणे म्हणजे त्याला शिक्षणाचा तिसरा डोळा देणेच आहे. कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे म्हणजेच जात, गोत, धर्म, पंथ, भेद यांना पद्धतशीरपणे मूठ माती देऊन सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहावयाचे. एकत्र स्वयंपाक करावयाचा. एकत्रित जेवायचे. राष्ट्र प्रेमाची प्रार्थना म्हणायची, एकत्र धनिणीच्या बागेत शरीर श्रम करून शेती करायची हा संपूर्ण जगाला दिलेला अनोखा प्रयोग आपण रयत जनतेनेच जोपासला पाहिजे. हा शिक्षणप्रसार करायचा असेल तर या गोरगरीब जनतेमधील हुशार व तत्पर मुले निवडली पाहिजेत व त्यांना वसतिगृहामध्ये आणून शिक्षण दिले पाहिजे.
१९४५ साली ‘छत्रपती शिवाजी दि ग्रेट कॉलेज’ ची कर्मवीरांनी मुंबईत घोषणा केली. त्यावेळी ते केईएम हॉस्पिटलमध्ये रक्तदाबाच्या विकाराने आजारी पडले होते. ‘रात्रंदिन आम्हां रयत शिक्षण चिंतनाचा प्रसंग’ याप्रमाणे त्यांना ह विचार स्फुरला. पण हे कॉलेज इतर कॉलेज प्रमाणे नसावे ही त्यांची मनीषा व आग्रह होता. फी देऊन शिकणाऱ्या मुलांना इतर कॉलेजचे दरवाजे उघडे आहेत. माझ्या ‘शिवाजी कॉलेजमध्ये’ मात्र निढळाचा घाम गाळून जो शिक्षण घेण्यास तयार असेल त्यांनीच यावे. आई बापांच्या पैशावर शिकणाऱ्याना येथे प्रवेश नाही. सर्वांनी वसतिगृहातच राहिले पाहिजे कारण माझे हे कॉलेज पूर्ण Free and Residential राहील निर्धार व्यक्त केला. अशा प्रकारे १७ मुलांचे हे छत्रपती शिवाजी फ्री अँड रेसिडेन्सी कॉलेज जून १९४७ मध्ये सुरू करण्यात आले. फलटणच्या श्रीमंत मालोजीराव नाईक निंबळकरांनी आपला ‘फलटण लॉज’ बंगलाच कर्मवीराना १९४०साली महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्सी हायस्कूल करता बक्षीस दिला होता. तिथेच सदर कॉलेज सुरू केले व हायस्कूल कॅम्पमधील भाड्याच्या इमारतीत हलवण्यात आले. कर्मवीरांचे शैक्षणिक प्रयोगामध्ये वसतिगृहीतील जीवनावर त्यांचा फार काटाक्ष असे. पूर्वीच्या उपनिषदकालीन गुरुकुलांची आश्रमांची त्यांच्या मनामध्ये पकड होती.
भाऊराव म्हणायचे, छत्रपती शिवाजी कॉलेज आज फ्री अँड रेसिडेन्सी कॉलेज आहे ते मला भविष्यात फ्री अँड रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी करावयाचे आहे.कर्मवीरांचे हेच स्वप्न खरे ठरले आहे. कारण आज छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारचे घटक महाविद्यालय आहे. याचा आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे. “श्रमाच्या मोबदल्यात उच्च शिक्षण मोफत” अशी जाहिरात १९४७ सालापासून पुढे जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रात झळकू लागली तेव्हा या योजनेची खरे क्रांतिकारी रूप जनतेसमोर आले. शिक्षण मोफत देऊ पण विद्यार्थ्यांनी फुकटचं खाऊ नये कारण फुकटचं खाणारांना ते मिंदे बनवते. असा माणूस भविष्यकाळात धडाडीने काही करू शकत नाही असा अण्णांचा आणखी एक सिद्धांत होता. आणि याच योजनेतून शिकणारी मुले पुढे स्वाभिमानी, स्वावलंबी होतील आणि भविष्यात खरे रयत सेवक तेच असतील. प्रामाणिक व निष्ठावंत रयत सेवक निर्माण करणारी भारतातील एकमेव संस्था म्हणजे कर्मवीरांनी हा पुढे आणलेला स्वावलंबी शिक्षणाचा महान प्रयोग होय.
छत्रपती शिवाजी कॉलेज जगावेगळे free and Residential college चार वर्षे चालवले म्हणून मुंबई सरकारने अशा अभिनव, क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या कॉलेजला आमच्या नियमात बसत नाही म्हणून सरकारने अनुदान देण्याचे बंद केले. तरीही कर्मवीरांनी कधीही तक्रार केली नाही. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या लाखो कार्यकर्त्यांनी शैक्षणिक अनुदान दिले आणि रयत शिक्षण संस्था नेटाने उभा राहिली.
खेड्यातील मुलांचे शिक्षण खेड्यासारख्या वातावरणातच झाली पाहिजे. शेतकरी शेतात घाम गाळतो त्याप्रमाणे त्याच्या मुलांनी शिक्षण संपादन करण्यासाठी काम करून घाम गाळायला पाहिजे असे भाऊराव म्हणत. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजनेचे हेच तर आजही खास वैशिष्ट्ये असलेलेल दिसून येते. ‘स्वालंबन’ भाऊरावांचे शिक्षण क्षेत्रातला मध्यबिंदू होता. स्वावलंबना बरोबरच ऐक्यही दुसरी उद्दिष्ट होते. वस्तीगृहातील मुले स्वयंपाक करीत, भांडी घाशीत , खडी फोडीत, शेतात राबत असत. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य निर्माण होते. ऐक्य आणि स्वावलंबन याच्यासारखा प्रयोग जगात दुसरा आणखीन कोणता चांगला?
जातिभेदाला मूठमाती देऊन त्यांनी स्थापिलेल्या रयत शिक्षण संस्थेची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल, कर्मवीर आण्णा देहाने गेले असले तरी रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने ते जिवंत आहेत व पुढेही जिवंत राहतील. कर्मवीर आण्णा हे एक व्यक्ती नसून एक संस्था होते. आपण सर्वांनी आण्णांचे कार्य पुढे नेण्यानेच त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. अशा या थोर शिक्षण महर्षीचा देशातील सर्व थरातील लोकांनी गौरव केला.जनतेने त्यांना कर्मवीर केले.पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट.पदवी सन्मानपूर्वक इस्पितळात जाऊन अर्पण केली व भारत सरकारने पद्मभूषण हा किताब दिला.जनता, विद्वान आणि राज्यशासन यातर्फे सन्माननीय होण्याचे भाग्य कर्मवीरांना लाभले. छत्रपती शिवजी कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूयात की, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व विचार पुढे नेऊ.
लेखन :-
^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^=^
=================================
*प्रा.डॉ. अभिमान निमसे*
सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा...✍️✅🇮🇳
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment