- श्रीरामपूर - प्रतिनिधी - प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा, असे आवाहन लोकसेवा विकास आघाडीचे समन्वयक गणेश छल्लारे यांनी केले आहे.
या योजनेचा फॉर्म भरण्याचा शुभारंभ अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील अशोक कारखाना कार्यालय येथे संपन्न झाला. या ठिकाणी सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म २६ सप्टेंबर पर्यंत मोफत भरून दिले जाणार आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणारं आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मेनरोड श्रीरामपूर कारखाना कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक यशवंत बनकर, बबनराव आसने, बाळासाहेब आसने आदींसह योजनेचे लाभार्थी बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब सोलट, योगेश शिंदे आदी लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
No comments:
Post a Comment