- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
गेल्या काही दिवसात आपल्या देशात अतिशय दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर, कोल्हापूर आणि अनेक ठिकाणी मुलीवर झालेल्या अत्याचाराने प्रत्येक महिलेच्या मनात एक विचित्र प्रकारची भीती निर्माण झाली आहे.खरंच आपण आपल्याच घरात आपल्या परिसरात सुरक्षित आहोत का ? आपली घरातून बाहेर गेलेली मुलगी,पत्नी ,बहीण, आई घरी सुखरूप परत येईल का ? ही भीती आता प्रत्येक व्यक्तीच्या काळजात व्याकुळता निर्माण करीत आहे.
मैत्रिणींनो ! मी पण एका मुलीची आई आहे रोज एक नवीन घटना ऐकून बघून माझ्याही मनावर एक खूप मोठा आघात झाला आहे. स्त्रियांच्या मनात भीती निर्माण करणारी ही परिस्थिती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वीर जवानांच्या पावन भूमीत निर्माण व्हावी यापेक्षा लांच्छनास्पद अजून काय आहे?
शौर्य आणि धैर्य असलेले निर्भय नीतिमान महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान केला. नीतिमान राजाच्या या महाराष्ट्रात या वाईट घटना घडलेल्या आपण पाहिल्या. स्त्रियांचे हक्क आणि अधिकार ,स्त्रियांचे शिक्षण, या विषयी ज्यांनी निर्धाराने सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे बुध्दिमान धाडसी नेतृत्व या भूमीतून निर्माण झाले. जिथे जिजाऊ माऊलीनी शिवराय घडवले आणि महात्मा ज्योतिबा फुले नी आपल्या पत्नीला माणूस म्हणून सर्व हक्क दिले,तिला साक्षर केले .ज्या राज्यात शूर वीर जन्मले ..आणि ज्या भूमीत. परस्त्री ही मातेसमान अशी शिकवण संतानी दिली ती हीच पावन भूमी मानली जाते तो महाराष्ट्र. हाच तो देश जो स्त्रियांचे रक्षण करत होता..त्याच भूमीत वासनांध मुले कशी निपजली ? असे प्रश्न पडतच चालले आहेत.
स्वप्नातही असे दिवस येतील असे वाटले नाही.भीतीच्या छायेत काळजीने पोखरलेली स्त्री मने इथे दिसतात.मग एवढ्या सुंदरतेने नटलेल्या आणि कौटुंबिक ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या पावन पवित्र देशाला कुणाची नजर लागली का? आज भारत देश प्रगतीच्या दिशेने प्रवास करतोय पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली स्त्री २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आता कुठे वेग घेऊ लागली..आता कुठे तिच्या पंखात शिक्षणाची शक्ती येऊन ती देश प्रदेश परदेश मुक्त बुद्धिमत्तेने अनेक अवकाशात उड्डाण घेऊ लागली . प्रत्येक कामात तेवढ्याच धडाडीने ताकतीने पुढे जात आहे मग एवढं सगळं असून आज ही वेळ का ?नक्की या समाजात ही अस्वस्थता का पसरली आहे ?आज आपल भविष्य कुठेतरी भीतीच्या खाईत तर संपुष्टात येत नाही ना ..जे पक्षी आता कुठेतरी आपल्या घरट्यातून बाहेर उंच झेप घेण्याचा प्रयत्न करतात त्याचे पंख जर कोण कापून टाकत असतील तर आयुष्य भराची जखम कधी भरून निघेल का ? हा सगळा विचार आज माझ्यासारखे अनेक पालक स्त्री.पुरुष करीत आहेत..ही अस्वस्थता दूर करण्याची आणि धीराने पुढे जाण्याची गरज आहे
यासाठी आपण आपल्या स्वतः पासूनच बदलाची सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. एक पालक म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण घर आपलं कुटुंब जोपासायला आणि सांभाळून ठेवायला शिकणं खूप गरजेचं आहे. मान,पैसा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपण कमवतच राहणार आहोत, पण या सगळ्यामध्ये जिथे आपली सगळ्यात पहिली आणि महत्वाची जबाबदारी आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत ती म्हणजे आपली घडणारी पुढची पिढी...आपली मुलं .कामाच्या विविध प्रकारच्या व्यापामध्ये आपण वेगवेगळ्या ताणात आपण एवढे बुडून गेलोय आपली मुले आपल्या पासून खूप लांब चालली आहेत हे आपल्या लक्षात पण येत नाही. आणि जेंव्हा या गोष्टीची जाणीव होते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. अनेक प्रलोभनाने भरलेल्या या दुनियेत आपण आपल्याला हरवून जाणे योग्य नाही. आपली मुले या संसार चक्रात मनाने शरीराने बदलत चालली आहेत.. भोवताल गढूळ होत आहे.. निर्मळ आदर्श असण्यापेक्षा आज मुलांच्या पुढे कितीतरी नवनवी आकर्षणे त्यांची मने खेचून घेत आहेत. या भुलभुलय्याची ,समाजात येणाऱ्या अनुभवाची,चर्चा घरात मुक्तपणे होऊन त्यातून अलिप्त कसे राहायचे, स्व संरक्षण कसे करायचे या बाबी सांगण्याची नितांत गरज वाटत असे. कधी कधी विविध जंजाळात अडकलेली आपली मने जवळ असलेल्या आपल्या मुलाच्या मनात नक्की काय चालू आहे हे देखील पाहत नाहीत. ती लहान असली तरी त्याच्या पण मनात भावना आहेत ..आणि त्यात सतत बदल होत आहेत..त्यांना मन आहे,मत आहे हे आपण कधी लक्षातच घेत नाही आणि त्यामुळे आज समाजात जे काही घडते आहे त्याची बळी निष्पाप मुली ठरत आहेत. मुलगा असो वा मुलगी त्यांच्या मनावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे.. त्यांचे मित्र ,मैत्रिणी कोण आहेत त्यांचे विषय काय आहेत ते विषय असेच का आहेत..याचा अप्रत्यक्ष शोध घेऊन आपण मुलांना विश्वासात घेऊन जागरूक करीत गेले पाहिजे. म्हणूनच मला मुलासोबतचा सहवास आणि संवाद अतिशय महत्वाचा वाटतो..प्रत्येकाला खाजगी जीवन असले तरी आपले घरटे सुरक्षित राहायचे असेल तर घरातील प्रत्येक जीवाला सुरक्षित राहण्याचे शिकवले पाहिजे तसेच संकटे काय येऊ शकतील व त्या पासून कसे सुरक्षित राहायचे हे घरात,शालेय जीवनात शिकवले गेले पाहिजे.घरात मोकळीक तेने चर्चा करून विषय समजून घेतले पाहिजेत.
सध्याची परिस्थिती बघता आपण आपल्या मुलींना घाबरून घरात बसवून ठेवू शकत नाही .
यावर घाबरून न जाता आपल्या मुलींना बळ देणं त्यांना उभ करणं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.सतत सावधान मन असणारी मुले ,चिकित्सक मुले शोधक मुले,निर्भय मुले,सतर्क राहणारी मुले घडवण्यासाठी आपल्याला संवाद करण्याची खूप गरज आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे आपली मुलं आपल्या सोबत किती मोकळे पणाने बोलतात? मुलांचा इतर कोणाही पेक्षा आपल्या आई वडिलांवर विश्वास आहे का ? असे आरोग्यदायी वातावरण आपण तयार केले आहे का ? माझी मम्मी मला योग्य मार्गदर्शन करेल ,माझे वडील माझ्या भविष्याची योग्य दिशा ठरवतील हे जोपर्यंत मुलांना समजणार नाही तो पर्यंत या समाजात अशा घटना घडत राहणार.म्हणूनच
आई ही मुलीची मैत्रीण असलीच पाहिजे. मुलगी शाळेतून घरी आल्यावर आपल्या आई सोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगते का हे बघा आणि सांगत नसेल तर आपण कुठे तरी कमी पडतोय आपण त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे हे समजून घ्या.
वडील हे मित्र पाहिजेत.पप्पा मला आज फिरायला जायचं आहे .चला आपण जाऊया हे जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांना हक्काने बोलते तेव्हा ती मुलगी खूप सुरक्षित आणि सुखरूप आयुष्य जगत असते कारण वडीलांसारखा सगळ्यात काळजी आणि निस्वार्थी प्रेम करणारा माणूस या जगात दुसरा कोणीच असू शकतं नाही हे जेव्हा आपल्या लाडक्या मुलीला समजेल तेव्हा तिची पावले चुकीच्या वाईट मार्गाला जाणारच नाही . घरात जर मुलांना पोषक आणि सुसंस्कारित वातावरण मिळाले तर त्याबरोबर त्याच्या सोबत मोकळे पणाने समाजात होणाऱ्या घटनेबद्दल बोलता येते. त्याच्या मनात भीती न पसरवता त्यातून कसे बाहेर पडता येईल या बद्दल बोलणं गरजेचं आहे. घरा घरातून असा संवाद वाढत नाही तोपर्यंत आपली मुले ही कुठेतरी भरकटत जाणार. त्यामुळे माझ्या माता पालक मैत्रिणीना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही बोलते व्हा. आणि आपल्या मुलांना मुलींना समजून घ्या. रागावून चिडून ओरडून काहीही होणार नाही. कधी मन भटकण्याने चूक झाली म्हणून ओरडत बसण्यापेक्षा बाहेर कसे पडायचे यासाठी त्यांना मदत करा. मुलांना कोणतीही चुकीची गोष्ट घडली की ती पालकांना सांगण्याची भीती वाटते आणि या भीती पोटी ते आणखी चार गोष्टी चुकीच्या करून बसतात. म्हणून आपण पालकांनी आपल्या मुलांना एवढं प्रेम दिलं पाहिजेत की त्यांना आपल्या पासून कोणतीच गोष्ट लपवायची वेळ येऊ नये... संस्कार आणि शिस्त लावण्याचा नादात आपल्यापासून ती दुरावली तर हीच मुले उद्या व्यसनाच्या,हिंसक प्रवूत्तीच्या आहारी जातात. हे थांबणं खूप गरजेचं आहे.
आज माझी मुलगी जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये शाळेत शिकते .ही शाळा म्हणजे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे . शाळेबद्दल आदर असणं.शिक्षकाविषयी प्रेम असणं हे मुलांना त्यांच्या अंतर्मनातून जाणवलं पाहिजेत. हे त्या शाळेच्या वातावरणातून निर्माण होते. आणि माझ्या मुलीच्या शाळेतील सर्व शिक्षक हे खरंच खूपच चांगले आहेत.
खूप काळजपूर्वक आणि स्वतःची मुले आहेत हेच समजून ते मुलांना घडवतात ,शिकवतात .आणि माझ्या मुलीचं भाग्य चांगले म्हणून या शाळेत ती शिकत आहे .मुख्याध्यापिका सौ. सुनिता वाघमारे मॅडम म्हणजे या शाळेतील माई आहेत. त्यांच्या छत्र छायेखाली ही मोठी झालेली मुले कधीच वाया जाणार नाहीत. हे मी खात्रीशीर सांगू शकते.
पालकांनो खरंच जागरूक व्हा .आपल भविष्य हे आपल्याच हातात आहे त्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षक हे जिवाच्या आकांताने मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतच असतात पण त्याला पालकांची पण तेवढीच साथ पाहिजे. तेव्हा कुठे याची सांगड लागून आपली मुले एक स्वच्छंदी आणि सुसंस्कारी नागरिक म्हणून आत्मसन्मानाने उभी राहतील. कर्मवीर भाऊराव अण्णा याना हेच अपेक्षित होते..
मुलामुलींनो! आपले आई वडील आणि आपले शिक्षक हे कायम आपल्या हिताचा विचार करत असतात .तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या आई वडिलांचे मत विचारात घेऊन करा. कोण तुम्हाला काही त्रास देत असेल तर सगळ्यात आधी आपल्या पालकांशी मोकळे पणाने बोला. आम्ही कायम तुमच्या साठी तत्पर आहोत. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याला मार्ग च नाही. Good टच bad टच ओळखायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसं ओळखायला शिका. मुलगा फिरायला नेतो , खाऊ देतो ,गिफ्ट देतो ,तू खूप छान दिसते म्हणतो म्हणून त्याला भुरळून जाऊ नका.आपण आपलीच दिशाभूल करून घेतो.पुन्हा पश्चाताप शिवाय दुसरं हातात काही राहत नाही. आत्ता आपले शिकण्याचे वय आहे. एकदा वेळ निघून गेली तर आयुष्यभर रडत बसावे लागेल म्हणून वेळीच जागे व्हा. आयुष्य खूप सुंदर आहे.त्याचा आनंद घ्या हे जीवन पुन्हा नाही. पालकांनी पण आपल्या मुलांना वेळ द्या. त्यांना डोळसपणे आणि उघडपणे सगळ्या गोष्टींची माहिती करून द्या. कसे सांगू कसे बोलू हे करत बसलात तर उद्या मुले बाहेर भरकटत राहतील .म्हणून सजग आणि सावध व्हा.दहशत कितीही असू दे धैर्य हवे,सोबत हवी,निर्भयता हवी,ज्ञान हवे, ताकद हवी,पालकांची साथ हवी.मग भीती पळून जाईल, स्वयंप्रकाशित सूर्य उगवून वर येईल.
=================================
-----------------------------------------------
*लेखन*
सौ.आरती दळवी ✍️✅🇮🇳...
रामनगर,वर्य - सातारा
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment