माळवडगाव :-
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर केटीवेअर बंधार्यावरून शेतमजुरीची कामे आटोपून मोटारसायकलवरून घराकडे जात असताना एका वृध्द महिलेसह चौघे जण बंधार्यावरून पाण्यात पडून बुडाले. एकास वाचविण्यात मासेमारी करणार्या तरुणांना यश आले असून वृध्द महिलेचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी दसरा सणाच्या दिवशीही पावसाच्या शक्यतेमुळे शेती कामे सुरूच होती. दिवसभर मोलमजुरीची शेतातील कामे आटोपून हे आदिवासी समाजातील मजूर सायंकाळी सुर्यास्तासमयी नदीकाठावरील घराकडे निघालेे होते.
मात्र कमालपूर बंधार्यावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे म्हणजे मोठी कसरत असते. बंधार्यालरील काँक्रिट खड्ड्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सणाचा दिवस असल्याने घराकडे जाण्यासाठी उशीर झाल्याने घाईगडबडीत खड्ड्यांमुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. बंधार्यास लोखंडी कठडे नसल्याने मोटारसायकलसह चौघेजण बंधार्यातील पाण्यात भामाठाणच्या बाजूने पडले. सायंकाळच्या वेळी बंधार्यावरून तुरळक वर्दळ सुरू होती. आरडा-ओरड झाल्यावर स्थानिक लोक मदतीला धावले. श्रीरामपूर हद्दीतील बंधार्यावर पाटबंधारे कर्मचारी सोमनाथ शिरसाठ जवळच राहतात. ते घटनास्थळी मदतीला धावून आले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सुरू झालेल्या मदतीने या चौघांपैकी मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे (वय 25) याला वाचविण्यात यश आले. तर वेणुबाई मनोहर बर्डे (वय 70) या वृध्द महिलेचा मृतदेह सापडला. मात्र दिलीप सोमनाथ बर्डे (वय 30) व रवी सोमनाथ मोरे (वय 25) या दोघांचा रात्री 11 वाजेपर्यत शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागलेले नव्हता.
यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधार्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधार्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे बंधार्यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान रात्री उशिरा ही शोध मोहिम थांबविण्यात आली. आज रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील आपत्ती निवारण पथक येणार असून त्यानंतर दोघांचा शोध पुन्हा सुरु होणार आहे. बंधार्यात बुडालेले हे सर्व आदिवासी समाजाचे व कमालपूर गावातील असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांवर शोककळा पसरली आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment