- सौ.आरती दळवी
जन्माला घालते ती आई आणि हाताला धरून शिकवते ती बाई. आज दोघींची अवस्था एक सारखीच आहे. पूर्वी आपल्या आई- वडिलांना घरात देवाप्रमाणे पुजले जायचे तेवढी शिस्त आणि दरारा होता. आई वडील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर होत नव्हते त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्याच बरोबर शाळेतील बाई, सर यांचा खूप मोठा सन्मान होत होता. शिक्षक रस्त्याने जरी निघाले तरी मुले लपून घरात पळून जायचे त्यांचा तेवढा धाक त्या मुलांवर असायचा.खरेच ! ज्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त दोन रंग आहेत एक काळा आणि दुसरा पांढरा आणि जो व्यक्ती एका हातात खडू आणि दुसऱ्या हातात छडी एवढ्या दोनच वस्तू वापरून जे दगड घडवून त्यात देवपण आणतात अशी व्यक्ती म्हणजे शिक्षक. आजची परिस्थिती बघता शिक्षक आणि शिक्षण पद्धती दोन्हीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे .जग खूप पुढे निघाले आहे पण या २२ व्या शतकात आपल्या वेळीचां तो छडी वाला मास्तर संपुष्टात आला आहे...याचे दुष्परिणाम या आजच्या पिढीला समजतंच नाहीत. शिस्त आणि समज या दोन गोष्टी असल्याशिवाय विद्यार्थी घडत नाही. देवाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपला विद्यार्थी घडवायचा असेल तर त्याला शिक्षकाने कठोर शासन करणे हे अत्यावश्यक आहे. आमचे शिक्षक हे एवढे कडक होते त्यांची फक्त नजर पडली तरी आमच्या अंगाचे पाणी पाणी व्हायचे. मग आज आपण आपल्या मुलांना संस्कार देताना वळण लावताना शिक्षकांना एवढी बंधन का घालतो याचा कधी विचार केलात का ? मुलांना शिक्षा करायची नाही,त्यांच्यावर ओरडायचे नाही,मारायचे नाही.. आजची पिढी या असल्या कारणाने आपणच बिघडवत चाललो आहोत. मुलांना शिस्त लागायची असेल तर त्यांना साम दाम दंड भेद या सगळ्या प्रकारांचा वापर करून त्यांच्यावर बंधन घालणं गरजेचं आहे तरच ते उद्याचे उज्ज्वल भविष्य ठरतील. आजच्या शिक्षकांना एवढी बंधने घालून ठेवलेत त्यामुळे ते स्वतः खूप हतबल आणि निराश आहेत. हातात आणि मनात असून ही ते या पिढीच्या मुलांना संस्कार करताना त्यांनी स्वतःला एक चौकटीत बंद करून ठेवले आहे.
छडी लागे छमछम विद्या येई घमघम...... यातली छडीच काढून टाकली आहे मग आपण आजच्या शिक्षण पद्धतीला आणि शिक्षकांना नावे ठेवून तरी काय उपयोग? मुलांना शिस्त लागणार कशी? आपला मुलगा हा घरात कमी वर्गात जास्त वेळ असतो. आपण मुलांना वयाच्या अवघ्या पाच वर्षपर्यंत संपूर्ण जबाबदारी पार पाडतो. एकदा का मुलगा पाहिलीत गेला की आईचं निम्मं ओझ कमी होत. मग आपण पाच वर्षात आपल्या मुलावर एकदाही हात उचलला नाही कि त्याच्यावर रागावलो नाही. का शिस्त लावण्यासाठी त्याला काही शासन केले नाही. मग जेव्हा एक शिक्षक मुलाच्या हितासाठी काही शासन करत असेल तर लगेच त्या शिक्षकावर कारवाई केली जाते त्यांना डायरेक्ट सस्पेंड केलं जातं. गावातील चार प्रतिष्ठीत लोक येवून त्या शिक्षकांनाच सुनावलं जात ...काहीही शासन न करता आमच्या मुलांना शिकवा ....हे कितपत योग्य आहे?
मुळात मला हेच कळत नाही की आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे? आपल्या मुलांनी एक चांगला माणूस म्हणून घडण की एक बेशिस्त बेजबाबदार व्यक्ती?चांगला माणूस घडवायचा असेल तर त्याला छडीचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. आजची परिस्थिती खूप भयंकर होत चालली आहे. आपण मुलासाठी कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही मुलगा स्वतःच ठरवून मोकळा होतो की त्याला काय पाहिजे ते. काय चांगले, काय वाईट याची कसलीही पर्वा नसलेली ही आजची ९०% मुले अशीच भरतकटत चालली आहेत. त्यात त्यांचा स्वतःचा दोष म्हणता येत नाही खरतर आजची परिस्थितीच अशी आहे की मुलांना मुक्त स्वातंत्र्य आहे.हे अनिर्बंध स्वातंत्र्य स्वैराचार करायला उद्युक्त होतेय. मन मोकाट मोकाट,त्याले चार वाटा तशी गत झाली आहे आणि शिक्षक पालक वर्ग मात्र हात बांधून ठेवला आहे. आपण आपली मत मुलांवर लादू शकत नाही. खरेच मुलांना संस्कारित करण्याची जबाबदारी पेलावी कशी यावर मार्गदर्शनाची गरज आहे. खरंच अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी मुले आज आपल्या आई वडील आणि शिक्षक याचा सन्मान करतात आणि त्यांच्या मनात आपल्या या तीन व्यक्ती बद्दल मनापासून प्रेम असते.
पूर्वीची शिक्षण पद्धती खूप साधी होती पण त्यात सन्मान होता. भीती युक्त आदर होता. प्रेम होत आणि आहे ते खूप गरजेचं होतं आणि आजची आहे . कुणाची तरी आदर युक्त भीती वाटणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये चांगला बदल होऊ शकणार नाही. आणि ती भीती फक्त आपल्याला आपले तीन आधार स्तंभ म्हणजे आई वडील आणि शिक्षक यांचीच असली पाहिजेत तेव्हा खरा माणूस घडतो.जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा आणि ज्ञान या दोन गोष्टी महत्वाच्या नाहीत त्यासोबत शिस्त आणि भीती हे पण अत्यंत महत्वाची बाब आहे. माझ्याच वर्गातील अतिशय हुशार विद्यार्थी जो नेहमी वर्गात पहिला नंबर कधीच सोडायचा नाही,अगदी पहिली पासून दहावी पर्यंत त्याते खूप चांगला अभ्यास केला.पण त्याच्या मध्ये खूप मोठा इगो होता एवढा की त्याला वडील नसताना स्वतःची काबाड कष्ट करणारी आई आणि शाळेतील शिक्षक यांच्याविषयी काहीच आदर नव्हता. तो मुलगा पुढे व्यसनाधीन झाला. नको त्या गोष्टीच्या आहारी गेला. आज वयाच्या चाळिशीमध्ये पण त्याचे भविष्य काहीच नाही. असे का झाले?तर दुसरीकडे वैजनाथ परळी येथील एक ताई जिच्या आईला ९६.०५ % म्हणजे किती मार्क्स हे पण समजत नव्हते, अशी मुलगी तिला संस्कार करायला आणि चांगली परस्थिती बनवायला तिच्या आई वडिलांकडे तेवढी चांगली व्यवस्था नव्हती ते दोघे स्मशानात काम करीत होते. या मुलीला आपल्या अशिक्षित आई वडिलांचा सत्कार करताना आणि त्यांच्या विषयी बोलताना कणभर ही लाज वाटली नाही अशी मुले उपजायला भाग्य लागतं.माझा मानस पुत्र बालाजी पण असाच एक विदयार्थी आहे. जो दहावीत असतात भर परीक्षेच्या दिवसात अचानक त्याचे वडील गेले...एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये त्याने संपूर्ण जबाबदारी सांभाळून आपल्या आईला सावरून स्वतःचा अभ्यास पूर्ण केला शाळेत पहिला नंबर काढला ... वयाच्या १६ व्या वर्षी घराची जबाबदारी सांभाळत सगळ्यांची मन जपणारा हा मुलगा. ज्याचे शिक्षक हेच त्याचे मित्र झाले..आईवर आणि शिक्षकांवर प्रेम करणारी ही अशी मुले खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. जबाबदारीची जाणीव झाली की मुलं आपोआप मोठी होतात ...शिक्षक आणि पालक हे आपल्यासाठी एक निसर्गाची खूप मोठी देणगी आहे आणि हे जर आजच्या पिढीला समजतं नसेल तर आपले भविष्य काय असेल हे काहीच सांगू शकत नाही. आपण आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे त्यांना चांगले आयुष्य जगता यावे म्हणून आपण आपल्या जीवाची पराकाष्ठा करून मुलांना घडवतो पण या सगळ्यात आपणच आपल्या मुलांना परावलंबी बनवत चाललो आहे ही बाब आपल्या लक्षात पण येत नाही.जेव्हा आपण लहान होतो घरात खायला अन्न नसायचे कपडे नसायचे तेव्हा आहे या परिस्थिती मध्ये आपण वाढलो मोठे झालो. तेव्हा आपल्याकडे कसलीच अपेक्षा नसायची. आहे त्या परिस्थिती मध्ये खूप समाधानी आणि आनंदी आयुष्य आपण जगत होतो. पण आजची मुले ही अतिशय तापट अग्रेसिव आणि स्वयंप्रेमी झाली आहेत.त्यांना जे पाहिजे आहे ते मिळालं नाही तर ते कोणत्याची थराला जाऊ शकतात आणि त्यांना या गोष्टीत कसलीच भीती वाटत नाही. याला जबाबदार हा आपल्या शिक्षण पद्धती मध्ये झालेला बदल आणि आपल्या पालकाची आपल्या मुलांविषयी असलेले निरर्थक प्रेम.
पालकांनो ! खरंच आपण खूप मोठी चूक करतोय अस मला वाटते, तुम्ही स्वतःचा शैक्षणिक काळ आठवा. बघा तेव्हाची तुमची परिस्थिती काय होती म्हणून तुम्ही आज घडलात एक चांगला माणूस म्हणून जगत आहात. तसेच आपल्या मुलांना पण एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी त्यांना या सगळ्या परिस्थिती मधून जाउ द्या.त्यांना परिस्थितीची जाणिव होण खूप गरजेचं आहे.आपल्या घरात भाकरी कशी तयार होते, त्यासाठी आपले आई वडील काय करतात याचं भान यांना येऊ द्या .सगळ्या गोष्टी मागताक्षणी त्यांना देऊ नका. पुन्हा हीच सवय उद्या हीच मुले आपल्यावर हक्क अधिकार गाजवून नको त्या गोष्टीची अपेक्षा करत बसतात आणि आपण हतबल होऊन जातो. काहीच करू शकत नाही.आज जपान सारख्या प्रगत देशांत लहान लहान मुलांना टॉयलेट साफ करायला लावतात, वेळेची किंमत शिकवतात तिथे जर मुलगा शाळेत उशिरा गेला तर त्याने सलग आठ दिवस टॉयलेट साफ करायचे असे शासन केले जाते. आणि मुलांना मोठ्या व्यक्तींना वाकून नमस्कार करण्याचे संस्कार दिले जातात असे का करत असतील? जगातील सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी असलेल्या या देशातील मुलामध्ये लहानपणापासूनच मनातील गर्व इगो काढून टाकला जातो आणि मोठ्या माणसांचा आदर करण्याचे संस्कार केले जातात. त्यामुळे ही मुले खूप मोठे झाली तरी आपल्या मातीशी आणि आपल्या मातेशी खूप प्रामाणिक राहतात आणि सर्वांचा आदर करतात. आपण विदेशातील अनेक चांगल्या वाईट गोष्टीचे लगेच अनुकरण करतो मग या गोष्टीचे अनुकरण का करू शकत नाही. आपल्या पण मुलांना असे संस्कार जर मिळाले तर आपली मुले खूप समाधानी आयुष्य जगतील आणि एकमेकांचा आदर करणारी ही पिढी जर तयार झाली तर आत्ताच्या घटना घडायचं तर सोडा एक खूप मोठा आणि आदर्श देश म्हणून संपूर्ण जगात आपल्या भारताला सन्मानित केले जाईल. पण हे सगळं स्वप्नात नाही सत्यात उतरण गरजेचं आहे. शिक्षक म्हणजे पैसे फेकून विकत घेण्याची वस्तू नाही तिथे संस्कार पेरले जातात आणि त्यातूनच आपले भविष्य घडते.अशा कोणत्याच शिक्षकांना आपला विद्यार्थी खुनी, दरोडेखोर चोर व्हावा, मग्रूर माणूस व्हावा असे कधीच वाटू शकत नाही .आपला मुलगा जसा आपला प्राण असतो तसाच तो त्याच्या शिक्षकांच्या हृदयातील आरसा असतो. शिक्षक जेवढं प्रयत्नशील शाळा तेवढीच जास्त क्रियाशील होत जाते.अतिरिक्त फीस भरून मी माझ्या मुलीला वाईच्या एका नामांकित शाळेत पहिलेच ऍडमिशन घेतले होते आणि त्याच वेळी माझ्याच गावातील प्राथमिक शाळेचे सर माझ्या घरी तीच ऍडमिशन मिळविण्यासाठी आले होते पण सर्वांप्रमाणे मी सुध्दा मोठ्या उंची शाळेच्या प्रेमात असलेली मी तीच वाईची शाळा पसंत केली त्यानंतर दोन वर्षांनी मला कामानिमित्त गावात असलेल्या प्राथमिक शाळेत जाण्याचा योग आला. तिथली शिक्षण प्रणाली बघून बघितल्या नंतर मी केलेली घोडचूक माझ्या चांगलीच लक्षात आली आणि त्याच क्षणी मी निर्णय घेतला माझी मुलीचे पुढील शिक्षण मी याच शाळेत करीन.आणि तसे मी केले. कारण माझ्या गावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश रासकर सर हे खरंच एक ध्येयवेडे शिक्षक आहेत. शाळेसाठी आणि मुलासाठी कोणतीही गोष्ट करायला ते कायम तत्पर असतात्. वाई जवळ माझं एक छोटंसं खेडं आहे कडेगांव नावाचं. आमच्या गावात गोपाळ आणि गोसावी समाज मोठ्या संख्येने आहेत. आमचे हे मुख्याध्यापक या वस्तीतील मुलांना रोज स्वतःच्या गाडीतून शाळेत ने आण करीत असत. एवढंच नव्हे तर त्या मुलांची स्वच्छता,त्यांची कपडे याही गोष्टीची ते व्यवस्थित काळजी घेत असत. मोठ्या खाजगी शाळेत घातलेली मुले ही एक बोलकी पोपट होतील ही आणि ते आपल्याला ऐकायला पण खूप छान वाटत पण आपल्या मुलांना स्वतः लिहिलेलं वाचता येत का?याच निरीक्षण केलं जात का?
आपल्या देशातील एक नामांकित शाळा जिला आंतरराष्ट्रीय पुरस्कृत केले आहे ..एक शिक्षकांच्या स्वप्नातील शाळा ... श्री.वारेसरांची वाबळेवाडी जि. पुणे ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.पाच सात मुलांनी चालू झालेली ही शाळा आज इथे ऍडमिशनला वेटींग आहे . मुलासाठी अत्यंत पोषक वातावरण सुंदर संकुल असून इथे खेळते वातावरण असून क्रियाशील मुले घडवली जातात अगदी शेती पासून ते अंतराळपर्यंत सर्वच स्तरातील प्रशिक्षण येथे घेतले जाते.हे संकुल तयार होण्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर येथील ग्रामस्थांचा देखील खूप मोठा सहभाग लाभला आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी भूमिका निभावली तर याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. म्हणूनच आपल्या मुलांना चांगले सदाचारी माणूसपण देऊयात !
=================================
-----------------------------------------------
*लेखन:*✍️✅🇮🇳...
सौ.आरती दळवी
रामनगर वर्ये, जि.सातारा
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment