अखेर रात्री उशिरा ती दु:खद बातमी समजलीच.बहुतांशी भारतीयांच्या दैनंदिन जीवनात आणि मनामनात आदर स्थानी राहिलेले टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे आता शरीराने कधीच समक्ष पाहता येणार नाहीत.आयुष्यात कधीतरी अशा असामान्य व्यक्तिमत्वांना समक्ष भेटता येईल का,त्यांच्याशी बोलता येईल का, हस्तांदोलन करता येईल का असे अनेकांना वाटते,मलाही वाटायचे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आमचे मार्गदर्शक, पद्मविभूषण डॉ. माशेलकर सर आणि आमचे कौटुंबिक स्नेही होते असे आणखी एक मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार सर या दोघांकडून रतन टाटा यांच्याविषयीच्या आठवणी अनेकदा ऐकल्या. माशेलकर सरांवरील मी लिहिलेल्या *दुर्दम्य आशावादी* या चरित्रग्रंथात त्यातील काही आल्या आहेत.
त्या आठवणी ऐकून तर रतन टाटा सरांची भेट झालीच पाहिजे असं खूप मनापासून वाटू लागलं. विशेष म्हणजे असा योग हुबळी इथं एकदा तर मुंबईत एकाच ठिकाणी सलग तीन वर्षे असा चार पाच वेळा आला,तोही माशेलकर सर आणि इनामदार सरांमुळेच.
हुबळी येथील एका कार्यक्रमासाठी माशेलकर सरांबरोबर प्रवास होता. हुबळी इथं तर माशेलकर सर, रतन टाटा, इन्फोसिसचे डॉ. नारायण मूर्ती,सौ. सुधा मूर्ती, गुरुराज देश देशपांडे यांच्या सहवासात पूर्ण एक दिवस होतो, त्यांच्या गप्पा, हास्य विनोद,त्यांची प्रेरणादायी व्याख्याने,काही संस्थांना भेटी हे सर्व जवळून अनुभवता आलं.
अरविंद इनामदार फाऊंडेशनचा एक विश्वस्त या नात्याने तर मुंबईत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात खास पोलिसांसाठी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा आयोजनात मला सहभागी होता आले. इनामदार सर प्रास्ताविक करायचे आणि आभार मानायची जबाबदारी माझ्यावर.
यानिमित्ताने रतन टाटा यांचे स्वागत करण्यापासून ते चहापान,बोलणे आणि सहभोजनाचाही आनंद लाभला.पहिल्या वर्षी इनामदार फाऊंडेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेले पुरस्कार रतन टाटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, पुढील वर्षी माशेलकर सरांच्या हस्ते आणि टाटा सर प्रेक्षकांत बसलेले. नंतर माशेलकर सरांमुळे डॉ. नारायण मूर्ती आले आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा सुरू असताना टाटा आणि माशेलकर सर दोघेही प्रेक्षकांत बसून आनंद घेत होते.
या सगळ्या आठवणी स्वतंत्र लेखातूनच सविस्तर लिहाव्या लागतील इतक्या त्या ह्रद्य आहेत.
हे सारं त्यावेळी अनुभवताना, आठवताना आजही,मनात एकच भावना दाटून येते,ती कृतार्थतेची.
रतन टाटा सरांना भावपूर्ण आदरांजली
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*डॉ. सागर देशपांडे*✍️✅🇮🇳...
मुख्य संपादक
मासिक जडण - घडण, पुणे
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment