आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागल्याचे आढळते. प्रत्येक वयातील व्यक्तींचे मोबाईल वेड हे वाढतच असल्याचे दिसून येत आहे .हल्ली लहान मुलांना तर मोबाईल फोन सोडवतच नाही. मोबाईल मुळे जरी ज्ञानात भर पडत असली तरी ती कशाप्रकारे योग्य आहे हे पालकांनी अभ्यासणे महत्त्वाचे आहे .
सध्या विभक्त कुटुंब असल्याचे आढळते. त्यामुळे घरात मोजून चार-पाच माणसे आणि तेही आपापल्या कामात गुंतलेले. काहीवेळा असेही आढळून येते की; मुलांना अभ्यासात काही प्रश्न निर्माण झाले किंवा काही समस्या आल्या तर पालक स्वतःहूनच मुलांकडे मोबाईल देतात आणि मोबाईलवर गुगल वरून शोधण्यास सांगतात आणि स्वतः टीव्ही पाहण्यात दंग राहतात. अशा वेळी मुले बरोबर संधीचा फायदा उठवतात.त्यांना अभ्यासातील एखादीच गोष्ट पाहिजे असते मात्र त्यानंतर मुले मोबाईलवर रिल्स पाहत बसतात किंवा एखादी गेम खेळत बसतात .अशावेळी पालकांनी आवर्जून लक्ष दिले पाहिजे.मोबाईलचे वाढते व्यसन व त्यामुळे होणारे परिणाम हे आपल्या मुलांसाठी किती धोकादायक आहेत हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
बऱ्याच वेळा असं होतं की मुलांच्या हातात सतत मोबाईल पाहिला की पालक त्यांना ओरडतात, प्रसंगी एखादी गालात देखील देतात. परंतु; हे योग्य आहे का?
काही ठिकाणी तर असे पहावयास मिळते की मुलांनी मोबाईल वरील रिल्स पाहून त्यातील काही डायलॉग म्हणून दाखवले तर पालकांना कौतुक वाटते.काही शब्द असे असतात की ते लज्जास्पद,अर्वाच्च असे असतात.परंतु ; लहान मुले अगदी मोठ्या दिमाखात ते शब्द उच्चारतात आणि पालक त्यावर एन्जॉय करतात. हे कितपत योग्य आहे ?
काही पालक सुशिक्षित व सुसंस्कृत असले तरी दोघेही जॉब करत असल्यामुळे पाल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि म्हणून ऑनलाइन संस्कार वर्ग वगैरे चे क्लासेस लावतात.पण ; या पद्धतीने आपले मूल वागते का? संस्कारक्षम गोष्टी आत्मसात करते की नाही? हे पाहिले पाहिजे. जॉब वरून आल्यानंतर स्वतः मोबाईल कामाव्यतिरिक्त न पाहता मुलांसाठी वेळ दिला पाहिजे.
त्यांना संस्कारक्षम गोष्टी शिकविल्या पाहिजेत .मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांच्या शाळेतील दिवसभरातील घडामोडींविषयी विचारपूस करायला हवी .त्यांच्या मित्र-मैत्रिणींविषयी चर्चा करावी. तसेच शाळेतील शिक्षक, आपल्या कुटुंबातील सदस्य ,नातेवाईक,आपला परिसर इत्यादी सारख्यांविषयी हितगुज केले पाहिजे.म्हणजे मुले देखील विचारांची देवाण-घेवाण करण्यास सज्ज होतील.
तसेच त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मित्र - मैत्रिणींबरोबर खेळायला पाठवले पाहिजे. त्यांचे नवनवीन छंद जोपासता आले पाहिजेत. नवनवीन गोष्टी सांगायला हव्यात. तसेच आपल्या मुलांनी इतरांशी बोलताना नम्रपणा, सहनशीलता पाळून आदरातिथ्याने बोलले पाहिजे, याची काळजी घ्यावी. वागण्याबरोबरच खाण्याच्या सवयी याविषयी देखील काळजी घेतली पाहिजे.
सध्या पिझ्झा,बर्गर, सँडविच आणि हॉटेलचे इतर पदार्थ खाणे म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. आणि असे खाणे म्हणजे चांगले खाणे होय असा एक गैरसमज झाला आहे. बेकरी फूड व जंक फूड याकडे सर्वांचाच कल वाढलेला आहे .त्यामुळे सर्वांनाच आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. परंतु; लहान मुलांसाठी हे अतिशय घातक आहे .कोवळ्या वयातच जर आरोग्य समस्या वाढू लागल्या तर मोठेपणीच्या आरोग्य समस्यांचे काय? अनेक समस्या उभ्या राहतील.
या सर्व समस्यांमधून वेळीच सुटका हवी असेल तर; प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे स्वतः जातीने लक्ष दिले पाहिजे .त्यांना लहान मुलांच्या गोष्टी मोबाईलवर न दाखवता गोष्टींची पुस्तके आणून प्रसंगी स्वतः वाचून दाखवली पाहिजेत. वर्गातील गृहपाठ करत असताना मोबाईलवर उत्तर न शोधता पुस्तक वाचन करून चर्चेतून उत्तर शोधण्यास मदत केली पाहिजे. त्यांचा कल पाहून त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. प्रत्येक वेळी आपलेच खरे असे व्हायला नको.त्यांना समजून घेतले पाहिजे. तसेच स्वतः काही वेळा लहान होऊन त्यांच्याबरोबर काही वेळ खेळले पाहिजे. स्वतः घरातील थोर व्यक्तींना आदर द्या, लहान मुले आपोआपच आदर देतील.त्यांना वेगळे सांगण्याची गरजच पडणार नाही कारण; लहान मुले अनुकरणप्रिय असतात.
या सर्व गोष्टी जुळवून आणायच्या असतील तर;फक्त आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या व्यापातून थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे. मग बघा नावाजलेल्या व्यक्तींमध्ये आपला पाल्य आणि त्याबरोबर आपण असणार हे नक्की.
=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ.मिनल अमोल उनउने
(सुकन्या) सातारा
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment