💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
आईवडील होणे हॆ आज सोपे नाही, ज्या मुलामुलींना आपण वंशाचे दिवे मानतो, तेच अंधार निर्माण करतात,जीवन हॆ समस्यांनी भरलेले आहे. आज भौतिक समृद्धी आली पण संस्कृती हरवत चालली आहे, अशा काळात निराधार, दीनदुबळ्यांची सेवा करतो तोच परमेश्वर बनतो, असे भावपूर्ण उदगार महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी काढले.
येथील माऊली वृद्धाश्रमात कविसंमेलन, पुस्तक परिसंवाद, मुले आणि आईबाप, सन्मानसोहळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते, माजी प्राचार्य टी. ई. शेळके हे अध्यक्षस्थानी होते. माऊली वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन सांगून प्रास्ताविक केले.माजी प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील, पत्रकार प्रकाश कुलथे, कवी आनंदा साळवे यांच्या सेवाभावी जीवनकार्याबद्दल त्यांचा शाल, फेटे, बुके, पुस्तके,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. माऊली वृद्धाश्रम, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आदिंनी सन्मानसोहळा आयोजित केला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलताना पुढे म्हणाले,माऊली वृद्धाश्रम हे भारतीय संस्कृती आणि सेवाभावाचे ऊर्जाकेंद्र आहे. वाढदिवस हे औक्षण करणे, पुस्तके देऊन वाचन संस्कृती वाढवणे, परिसंवाद घेणे, दिवे विझविण्यापेक्षा दीपप्रज्ज्वलन करणे, फेटा, उपरणे, टोपी प्रदान करणे अशा संस्कृतीला बळ आणि प्रतिष्ठा देण्याचे संस्कार येथे मिळतात.मला व कवी आनंदा साळवे यांना सत्तावन्न वर्षात बरेच अनुभव आले, प्राचार्य भाऊसाहेब भवार यांनी साठ वर्षात शैक्षणिक सेवा करून आता ते कारेगावसारख्या खेड्यात नवनिर्मिती करीत आहेत.याविषयीं आमचा सन्मान केला हे आम्हाला प्रेरणादायी असल्याचे कुलथे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी असलेले माजी प्राचार्य टी. ई. शेळके म्हणाले, आईवडिलांनी मुलामुलींना समजून घेतले पाहिजे, या नव्या पिढीची काही स्वप्ने आणि जीवनधारणा असतात,त्यांनाच दोष देऊन आपण राग व्यक्त न करता सुखसंवाद साधावा. विवाहाच्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य असावे. खरे तर आता लग्नात अंतरपाटाची गरज नाही, कारण वधू -वर एकमेकांना जाणून असतात,चेहरे पाहिलेले असतात, आज त्यांच्या स्वतंत्रतेला महत्व दिले तर कुटुंबसंघर्ष कमी होतील.घरातील जाणकाराने इतरांचा विचार करून संवाद साधून सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे असे सांगून वृद्धाश्रमातील कार्याचे कौतुक केले. प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अनिताताई भवार, अश्विनी सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र देसाई, कु. मृणाली देसाई, दत्तात्रय खिलारी, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील आदिंनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केल्या. प्रा. रायभान दवंगे लिखित 'दप्तर 'या कथासंग्रहावर परिसंवाद झाला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाचे सर्वांना वितरण करून दप्तर चे महत्व सांगितले.सुभाष वाघुंडे,राजेंद्र देसाई, कु. मृणाली देसाई,शुभम नामेकर आदिंनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))