राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, February 12, 2024

संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थिती निवारणासाठी उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
 जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले,आमदार लहू कानडे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते हे उपस्थित होते तर सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की,संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये याची खबरदारी घेत जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, वस्त्यांमध्ये पाणी मिळेल यादृष्टीने पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठ्यासाठी पाणी उद्भवाचा सर्व्हे करून ते निश्चित करण्यात यावेत. उदभवातून पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता ठेवा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गतीने राबवून ती अंतिम करण्यात यावी. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या ठिकाणी पाच हजार लिटरच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करत कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील ती कामे प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यात यावेत. विंधन विहिरींच्या प्रस्तावांवर शासन नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून ठेवण्यात यावीत. संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीत पाणी पुरवठा योजनांची विजजोडणी खंडित करण्यात येऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment