राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, August 6, 2024

गौतम बुद्धांचे सत्य आकलन : जगात दु:ख आहे - प्रा.डॉ.सुभाष वाघमारे


सातारा...
जगातील एक महान यथार्थवादी तत्वज्ञ तथागत गौतम बुद्ध यांनी चार आर्यसत्ये सांगून त्यांचे जीवनाचे आकलन मांडलेले आहे. १ हे जग दुःखाने भरलेले आहे. २ ] दुःखास कारण तृष्णा आहे ३ ] दुःख दूर करू शकतो ४ ] दुःख दूर करण्याचा मार्ग हा अष्टांग मार्ग आहे. या चार आर्यसत्याचे सखोल आकलन करून ते लोकांना सोप्या
 भाषेत बुद्धांनी सांगितले आहे. खरे तर व्यवहारी जीवनात अनुभवाच्या आधारे आपण या सत्याचे आकलन करून घेणे आवश्यक आहे. गौतम बुद्धांचे
 पहिले आर्यसत्य या जगात दुःख आहे हे असून ते आपण प्रस्तुत लेखात समजून घेऊयात. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर शारीरिक मानसिक स्थितीचे निदान योग्य रीतीने करतो तसे या मानवी जीवनात बुद्धांनी प्रथम या जगात दुःख आहे ,आणि दुःखाचे स्वरूप काय आहे हे सांगितलेले आहे. दुःख म्हणजे काय हे समजून सांगताना ते सांगतात.
 धर्मचक्रप्रवर्तनात भगवान बुद्ध म्हणतात. ‘ भिख्खुनो , दुःख नावाचे पहिले आर्यसत्य आहे.
 जन्म,म्हातारपण,व्याधी ,मरण ,अप्रियांचा संबंध ,प्रियाचा वियोग ,इच्छा अपूर्णता दुःखदायी आहे. दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव ते प्रथम करून देतात. जीवनात अनेक प्रश्न असले तरी नेमके काय अनुभवास येते हे सांगणे हे बुद्धांचे वैशिष्ट्य आहे. जग शास्वत कि अशाश्वत ? ,पुनर्जन्म होतो कि नाही ? देव आहे की नाही ? मी कोठून आलो ,कोठे जाणार ? जग कसे निर्माण झाले ? असल्या प्रश्नांना त्यांनी महत्व दिलेले नाही .असे सांगतात की एकदा कोसंबी येथील सिंसप वनात असताना ,हातात झाडाची काही पाने घेऊन बुद्धांनी भिक्खूना विचारले की ‘ भिक्खुनो !माझ्या हातात असलेली झाडाची पाने जास्त आहेत की ह्या अरण्यातील झाडावर असलेली पाने जास्त आहेत ?’’ साहजिकच भिक्खुनी झाडावर असलेल्या पानापेक्षा हातातील पाने फारच थोडी आहेत. त्यावेळी त्यांनी भिक्खुना सांगितले की जगात अनेक गोष्टी असतील पैकी मला ज्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या तेवढ्याच मी तुम्हाला सांगितल्या. इतर गोष्टी शुद्ध जीवन जगण्यास उपयोगी नाहीत .मी सांगितलेल्या गोष्टी शांती ,ज्ञान प्राप्ती आणि निर्वाणाकडे नेतात म्हणून तेवढ्याच गोष्टी मी सांगितल्या असे म्हणून त्यांनी निरर्थक गोष्टीना आपल्या विवेचनात देखील घेतले नाही. म्हणून मी ज्या सांगितल्याच नाहीत त्या गोष्टी मला तुम्ही विचारू नका असे ते म्हणतात. जगातील सर्व प्राणीमात्र यांना एकाच आयुष्यात येणारा सार्वत्रिक अनुभव काय आहे ? तर दुःख आहे हाच अनुभव सत्य आहे. जगातील सर्व प्राणीमात्रांना दुःख प्रत्यक्षात अनुभवावे लागते.आणि प्रत्येक जण दुःखापासून मुक्त होऊन सुख कसे मिळवावे या साठी प्रयत्न करीत असतो. 
बुद्ध धम्मात दुःख हा शब्द व्यथा ,भोग ,ताप ,त्रास ,कष्ट ,क्लेश ,त्रागा ,पिडा ,कारुण्य ,अशांतता ,असमाधान ,शोषण ,चिंता ,निराशा,शोक इत्यादी भावना दाखवतो. जन्म होणे दुःख आहे ,म्हातारपण दुःख आहे, मरण दुख आहे ,शोक करणे दुःख आहे,रडणे ओरडणे दुःख आहे,पिडीत होणे दुःख आहे,चिंतीत होणे दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा विरह दुःख आहे, इच्छेची पूर्तता न होणे दुःख आहे ,जन्म होण्याने माणसाला आनंद वाटतो , पण जन्म हे दुःख कसे हा प्रश्न आपल्याला पडतो. प्राणी उगम पावण्यापासून ते जन्म होण्यापर्यंतची अवस्था ही त्रासदायक आहे का ? वृद्धपणी मिळालेले शरीराचे अवयव ,इंद्रिये दुर्बल होतात त्यामुळे दुःखी अवस्थेत लोक असतात. ज्याचा जन्म झाला तो नष्ट होतो. याचे दुःख अनेकांना होते. विविध आपत्ती आयुष्यात येतात त्यामुळे माणसे दुःखी असतात. चिंता करतात . व्याकूळ होतात .अनेक प्रकारच्या पीडेने वेदनेने लोक रडतात ,ओरडतात ,त्रागा करतात ,अस्वस्थ असतात हे दुःख आहे. शारीरिक पिडा ,वेदना यामुळे देखील दुःख होत असते. मानसिक दुःख चिंता आणि काळजीतून निर्माण होत असते. जगात अनेक माणसे मनाने दुःखी आहेत. वेदना घेऊन रोज ती जगत असतात .उरात ती फाटलेली असतात. दुःखाने हैराण होऊन अनेक जण चिडत असतात.वैताग करतात हेच तर सारे दुःख आहे. अप्रिय गोष्टी घडल्याने ,अप्रिय व्यक्तीचा सहवासात आल्याने दुःख होते. मनाविरुद्ध गोष्टी घडतात रूप ,शब्द ,गंध ,रस ,स्पर्श मनाचे विषय जर मनाला हवे तसे अनुकूल नाहीत तर मग तडफड वाढत जाते. प्रिय व्यक्ती निघून जाणे ,नातलग सोडून जाणे ,हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या ,त्या मिळत नाहीत त्यांची खंत काळीज पोखरून टाकत असते. कधी कधी असे अगतिक होते की मी जन्माला आलो नसतो तर बरे झाले असते.इच्छा पूर्ण न झालेल्याचे दुःख तर सतत ह्रदयात उड्या मारत असते. म्हाताऱ्याला जगावे वाटते पण लोक मरणाची वाट पाहत असतात.मरणाकडे गेलेला असतो त्याला मरावे वाटत नाही, शोक करणाऱ्यास वाटते आपल्याला दुःख नको, चिंतामुक्त जीवन सर्वाना हवे आहे पण चिंता तर पाचवीला पुजल्या आहेत. जन्म होणे ,म्हातारपण आणि मरण हे शारीरिक दुःख आहे.इच्छेची पूर्तता न होणे हे मानसिक दुःख तर पाच उपादान स्कंध हे आध्यात्मिक दुःख आहे. शारीरिक दुःख हे पहिल्या स्तरातील दुःख आहे. शरीर हे नाशवंत आहे . मानसिक दुःख हे त्यापेक्षा गहन शारीरिक दुःखापेक्षा वरची पायरी आहे. इच्छा अनंत असल्याने आणि सर्वच इच्छा पूर्ण होत नसल्याने मानसिक दुःख होते. तर तिसरे दुःख , विश्वाच्या या पसाऱ्यात स्वतःला अति महत्व दिल्याने अहंपणा वाढत गेला आहे. अहंला अति महत्व दिल्याने मन स्थिर राहत नाही. मी पणाच्या मुळे होणारे हे दुःख आहे. सर्व साधारण तीन प्रकारचे दुःख बुद्धांनी सांगितले .हे अगदीच प्रत्येक व्यक्तीस काटेकोर असत नाही.प्रत्येकाच्या दुःखाचे स्वरूप वेगवेगळे आहे. जगातील कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही पंथ व धर्मातील व्यक्ती दुःख होते हे मान्य करीलच. दुःख आहे म्हणजे सुख मिळतच नाही असेही नाही. कारण आपल्या इंद्रियाने सुख मिळत असते .उदा .डोळा ,कान ,नाक ,जीभ ,आणि त्वचा ही पाच इंद्रिये आहेत. डोळ्याने वेगवेगळे रंग रूप पाहण्याचा आनंद मिळतो . कानाने वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्याचा आनंद मिळतो ,नाकाने विविध प्रकारचे वास ,सुवास आपल्याला अनुभवता येतात. त्वचेमुळे स्पर्श ज्ञान मिळते. जीभेमुळे आपल्याला चव कळते . ज्ञान देणारी ही इंद्रिये जन्मापासून मरेपर्यंत आपली सोबत करतात .या पंच इंद्रियाबरोबर सहावे इंद्रिय हे मन मानलेले आहे .ते दिसत नाही पण जाणवते. अनेक प्रकारचे विचार , कल्पना मन करत असते. या इंद्रियाच्या सहायाने जग समजून घेत असताना विविध आनंद आपण घेत असतो .ही इंद्रिये आस्वाद घेत असतात. पण इंद्रीयापासून मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. कारण माणसाचे मन चंचल आहे. ते सतत भटकत असते. नव्याच्या शोधात असते. अनेक इच्छा ,आकांक्षा , कल्पना सतत मनात निर्माण होतात. त्या मागे ते पळत सुटते पण सर्वच इच्छा पूर्ण होत नाही. एक इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद घेत असताना दुसऱ्या अनेक इच्छा जन्म घेतात .त्या अजून पूर्ण होत नाहीत म्हणून पुन्हा माणूस दुःखी होतो. मनात अनेक इच्छा दाबून ठेवतो. त्यामुळे त्याचे दमन देखील होते. अनेक स्वप्ने साकार होत नाहीत म्हणून पुन्हा दुःख होते. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे हे संतानी सांगितले त्याचा प्रत्यय प्रत्येक माणसाला येतो. त्याला कारण इच्छां अनंत आणि जीवन थोडे ,माणूस त्यामुळे अनेक अपेक्षाभंगाने निराश होतो. त्यामुळे तात्पुरता एका गोष्टीने आनंद झाला की ती स्थिती कायम न राहता पुन्हा दुःख येते. प्रत्येक सुखाच्या मागे दुःख आणि पुढेही काही क्षण आनंदाचे , आणि पुन्हा दुःख अशी परिस्थिती निर्माण होत असते. मिळणारी प्रत्येक भौतिक गोष्ट शास्वत नाही ती अनित्य आहे. हव्या त्या गोष्टी काही काळ मिळतात पुन्हा नष्ट होतात. सुख निघून गेले की पुन्हा दुःख ,त्यामुळे माणसे सतत मनोरुग्ण झालेली दिसतात. पंचेद्रीयांच्या सुखामुळे तात्पुरता आनंद मिळत असला तरी कायम आनद राहत नाही. मानसिक आणि शारीरिक दुःखे ही सर्वांच्या जीवनात अनुभवास येणारी सामान्य दुःखे आहेत. बुद्ध धम्मात संस्कारदुःख हा एक भाग मानलेला आहे. जगातील सर्व संस्कारित वस्तू नेहमीच बदलत जातात ,त्या अस्तित्वात येतात आणि नष्ट होतात. अगदी आपले नाम म्हणजे चित्तशक्ती व रूप म्हणजे शरीर हे देखील नष्ट होतात. रूप ,वेदना ,संज्ञा ,संस्कार आणि विज्ञान या पाच गोष्टीनी, प्राणी बनतो .जे निर्माण होते ते नष्ट होते ,हे चक्र सुरु आहे. त्यामुळेच सुखापेक्षा असमाधान अनेकांच्याकडे आहे. सतत परिवर्तन होत असल्याने सुखाचे अनुभव देखील धूसर होत जातात आणि लोप पावतात .उगम होणे आणि नष्ट होणे हे या जगात आणि देहात देखील चालू असते. 
 प्रथम आपण रूप स्कंध समजून घेऊ .जो सजीव प्राणी म्हणतो तो शरीर आणि चित्त मिळून बनलेला असतो पण तो सतत बदलत असतो. पृथ्वी ,आप ,तेज ,वायू या चार म्हाभूताने रूप म्हणजे शरीर तयार होते. पृथ्वी जशी जड असून ती सतत फिरते तसेच हे शरीर देखील विस्तार पावते .वस्तू किंवा शरीराचा जडपणा ,मऊपणा ,हलके पणा ,कठीण पणा हे सगळे पृथ्वी धातूत असतात. आप म्हणजे द्रवता ,द्रवतेमुळे सलग्नता राहते .घन पदार्थ हे द्रवतेमुळे आकार प्राप्त करतात. तेज म्हणजे उष्णता .प्राणी किंवा वनस्पती यांच्यामध्ये उष्णतेने उर्जेने जीवनशक्ती असते .वायु म्हणजे गती .या चार भूताच्या एकतरी करणातून गुणधर्म तयार होतात. डोळे ,कान ,नाक .जीभ व त्वचा या इंद्रियांच्या क्षमता तयार होतात ,तसेच पंच इंद्रियांचे विषय अनुक्रमे रूप ,आवाज,वास ,चव ,स्पर्श हे कळणे सुरु होते. 
  दुसरा स्कंध म्हणजे वेदना ..वेदना म्हणजे संवेदना.सहा इंद्रिय विषयाशी संपर्क आला कि कोणतीतरी अनुभूती जाणवत असते .या संवेदना तीन प्रकारच्या असतात. सुख अनुभूती संवेदना ,दुःख अनुभूती संवेदना ,व असूखमय व अ दुःखमय अनुभूती .प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्थितीनुसार संवेदना उत्पन्न होतात. त्यामुळे सर्वाना एकाच प्रकारची अनुभूती येणार नाही. 
 तिसरा स्कंध संज्ञा आहे. इंद्रिय विषयांना ओळखणे ,जाणणे त्त्यांचे काम आहे. कोणती संवेदना निर्माण झाली आणि विषय काय आहे हे विज्ञानामुळे कळते. चौथ्या संस्कार स्कंधात ‘कार्य करण्याची इच्छा’ येते. आणि पाचव्या विज्ञान स्कंधमुले आपल्याला विषयाचे ज्ञान मिळते. पाच इंद्रिये आणि सहावे मन यांच्या द्वारे चेतविले जाण्याने विज्ञान जागृत होते. अनेक विषयाचे एकत्रीकरण रूप ,वेदना ,संज्ञा ,संस्कार ,विज्ञान या पंच स्कंधात आहेत. पंच स्कंध देखील शास्वत नाहीत. प्रत्येक संस्कारित गोष्ट अनित्य आहे.जे अनित्य आहे तेच दुःख आहे. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य ,व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य ,आणि प्रतीती समुत्प्न्न आत्मतत्व अनित्य . सर्व वस्तू हेतू आणि प्रत्यय यामुळे बनतात. या वस्तूला स्वतःचे अस्तित्व नसते. तो आहे ..आणि तो होत आहे ...यात परिवर्तनशील आणि संवर्धनशील असा प्राणी आहे. प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. सतत उत्क्रांती होत राहते आहे. सजीव प्राण्याचा विकास चालू आहे. मग मी म्हणजे कोण ? आत्मा अस्तित्वात कसा असू शकेल ? प्राणी परिवर्तनशील आहे. उदा .रथ हे केवळ नाव ..आपल्यातील अणुरेणु बदलतो आहे, मन बदलते आहे ,विचार बदलत आहेत. आत्म्याच्या एक नव्हे तर अनेक कल्पना आहेत .शरीर राख झाल्यावर आत्मा कसा पुन्हा येणार ? एकच आत्मा सर्व प्राणीमात्रात आहे का ? अर्थातच नाही म्हणूनच निरर्थक चर्चा करून उपयोग तरी काय ? जे आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच दुःख आहे ,दुःखाला कारण तृष्णा आहे. आपण दुःख दूर करू शकतो .आणि दुःख दूर करण्याचा मार्ग अष्टांग मार्ग आहे हे बुद्धांनी सांगितले. दुःख मुक्त झाल्यावर मनाला शांती मिळते . व्यक्ती प्रज्ञावान होते. मन स्थिर होते. माणूस शीलाचे महत्व जाणतो. दुःख नष्ट होऊन यथार्थ ज्ञान मिळते .मंगल होते . माणूस सुख आणि दुःख संवेदनेकडे तटस्थपणे पाहता येते. आसक्तीच्या जाळ्यातून माणूस मुक्त होतो. मैत्री ,करुणा निर्माण होऊन सर्वांना दुःखापासून मुक्त करण्याचे काम चालू होते. जगण्याचे सार्थक होते.


=================================
-----------------------------------------------

लेखन : - ✍️✅🇮🇳...प्रा.डॉ.सुभाष वाघमारे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा +९१९८९०७२६४४० 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




No comments:

Post a Comment