समाजसेवा, वैद्यकीय योगदान
व लेखनकार्याचा केला गौरव
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहराच्या वैद्यकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करून प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलेले बैतुशशिफा हॉस्पिटल व फाउंडेशन आणि विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख यांचा समाजोपयोगी कारभार पुन्हा एकदा राज्यपातळीवर चर्चेत आला आहे.
पुणे येथील गुरुकुल विश्वपीठ, वडगांव शेरी या नामांकित संस्थेने २०२५ या वर्षाचा ‘गुरुकुल सेवा भूषण’ पुरस्कार जाहीर करताना या मानासाठी डॉ. शेख यांची निवड केली आहे.
गुरुकुल विश्वपीठाचे प्रमुख डॉ.भागवत गुरुजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
समाजमनाला भिडणाऱ्या सेवाकार्यात सातत्य आणि जनहिताचा दृढ संकल्प या गुणांच्या आधारे हा बहुमान डॉ. शेख यांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळापासून डॉ. सलीम शेख यांनी समाजातील साध्या-सरळ नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देण्याचे काम सातत्याने केले आहे. आपत्तीच्या काळात पीडितांना मदत करणे, वैद्यकीय मदत शिबिरे घेणे, गरीबांच्या आरोग्य उपचारासाठी विनामूल्य साहाय्य उपलब्ध करून देणे, तसेच सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे—या सर्व बाबींमुळे ते जनतेमध्ये विश्वासाचं प्रतिक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या नेतृत्वाखाली ‘बैतुशशिफा फाउंडेशन’ने अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेली आर्थिक व वैद्यकीय मदत उल्लेखनीय आहे.
डॉ. शेख हे केवळ डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर प्रखर लेखणीचे धनी आहेत. सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य आणि मानवी हक्क यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या लेखांमुळे अनेक प्रश्न समाजाच्या चर्चेत आले व नागरिकांमध्ये जागरूकता वाढली. त्यांच्या लिखाणात समाजातील दुर्लक्षित प्रश्नांचा वेध घेत बदलाची जाणीव घडविण्याची ताकद दिसते.
‘अल् आफक फाउंडेशन’मार्फत डॉ. शेख यांनी गरजूंना शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग, शैक्षणिक साहित्याचे वाटप, करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आयोजित केल्या. अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने त्यांनी घेतलेली वृक्षारोपण मोहिमही शहरात विशेष चर्चेचा विषय ठरली. दरवर्षी विविध थोर संत- महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ते सामाजिक उपक्रम, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आयोजित करीत असतात.
भाषाविकास आणि साहित्य वृद्धीसाठी त्यांनी व्याख्यानमाला, मुशायरे, कवि-संमेलनं आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. शहरातील भाषिक–सांस्कृतिक चैतन्यात त्यांच्या उपक्रमांनी मोठी भर घातली आहे.
आपल्या वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक न्यायासाठी लढा,
लेखणीद्वारे सत्य मांडण्याची क्षमता,सांस्कृतिक व भाषिक क्षेत्रातील योगदान, युवकांसाठी मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम,रक्तदान प्रोत्साहन,
या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधणारे ते शहरातील दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
गुरुकुल विश्वपीठ यांनी समाजसेवेतील उल्लेखनीय योगदान, नीतिमूल्यांप्रती निष्ठा आणि जनतेसाठी सातत्याने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार’ डॉ. सलीम शेख यांना प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही समजते.
अभिनंदनाचा वर्षाव
पुरस्काराची घोषणा होताच श्रीरामपूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार तसेच शहरातील विविध संघटनांनी डॉ. शेख यांचे हार्दिक अभिनंदन केले. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तथा सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा व्यक्त केली.
डॉ. सलीम शेख यांना मिळणारा हा पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाची, लेखणीची आणि निस्वार्थ समाजसेवेची राज्यभरात झालेली दखल मानली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात नवा आत्मविश्वास निर्माण होत असून, आगामी काळातही ते अशाच प्रकारे समाजाभिमुख काम करत राहतील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment