*ईद - ऊल - फित्र अर्थात रमजान ईद*
*✍️✅️🇮🇳सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
गेले महिनाभर अत्यंत भक्तिभावाने पालन केल्या गेलेल्या रमजान महिन्याची सांगता आज शव्वाल महिन्याच्या एक तारखेस रमजान ईद साजरी करून होत आहे.जगभरातील मुस्लीम बांधव त्यांचा सर्वात मोठा सण ईद ऊल फित्र किंवा रमजान ईद आज साजरी करीत आहेत.भौगोलिक कारणामुळे जगाच्या काही भागात ती कालही साजरी करण्यात आली.रमजान महिन्यात अल्लाहच्या आदेशाने व प्रेषित हजरत पैगंबर यांच्या सांगण्यानुसार महिनाभर प्रार्थना,रोजा, नमाज,तरावीह,जकात, सदका आदिचं पालन करुन सर्वांनी अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व आदेशांची पूर्ति म्हणून अल्लाह कडून मिळणाऱ्या ईनाम प्राप्तीचा दिवस म्हणून ईद साजरी केली जाते. ईद म्हणजे आनंद किंवा खुशी.आजच्या दिवशी सर्वजण सकाळी नवे कपडे परिधान करून ईदगाह मध्ये जातात. तेथे खुल्या आकाशात प्रार्थना करून अल्लाह
तआलाचे आभार व्यक्त करतात.मोठया शहरातून मशिदीमध्ये ईदची नमाज आदा केली जाते.समस्त मानवांच्या कल्याणासाठी दुआ मागतात. नमाज आदा केल्यानंतर
एकमेकांना शुभेच्छा देतात.घरी येऊन क्षिरखुर्मा खातात. लहान मुलांचा आनंद तर विचारायला नको.ईदी च्या मिळालेल्या रकमेतून त्यांचा आनंद ओसंडत असतो.
ईदचा सण हा आनंदाचा असल्याने सर्व धर्मिय बांधव शुभेच्छा देऊन या आनंदात सहभागी होतात.
आज ईदचा आनंद साजरा करतांना परमेश्वराकडे एवढेच मागणे आहे कि*या अल्लाह* आमच्या देशात व राज्यात सुख, समृद्धी,शांतता,प्रगती व एकता नांदू दे, सर्वांची प्रगती होऊ दे. अन्याय, अत्याचार,जुलूम, जबरदस्तीचा खातमा होऊ दे.न्याय,समता, बंधुता यांची भरभराट होऊ दे. बेकारी, बेरोजगारी नष्ट करून रोजी रोटीचे प्रश्न सुटू दे. आमीन.
ज्यांनी अत्यंत कडक उन्हाळयामध्ये उष्णतेचा त्रास सहन करून केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार महिनाभराचे रोजे पूर्ण केले त्यांना ईद मुबारक. तरावीहची नमाज नियमितपणे आदा केली त्यांना ईद मुबारक. रमजान महिन्याचे पालन करताना हजरत पैगंबरांनी प्रत्यक्ष आचरणातून घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण महिना इबादत रोजा,नमाज,तिलावत यामध्ये व्यतीत केला अशा सर्वांना ईद मुबारक.लहान लहान बालकांनी सुद्धा अत्यंत श्रद्धेने रोजे केले त्यांनाही ईद मुबारक.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे.मागील दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपण ईद साजरी करू शकलो नव्हतो. अल्लाहच्या कृपेने यावर्षी ते संकट कमी झालं.सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली आणि म्हणून प्रथमत: त्या परम पवित्र परमेश्वराचे आभार. ज्याने यावर्षी आपल्याला ईद ची खुशी प्रदान केली. आजचा दिवस हा मागचे सर्व काही विसरून नव्या आनंदाने नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. झालेल्या चुका माफ करुन पुन्हा त्या न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन प्रत्येकाला आनंद कसा उपभोगता येईल यासाठी उपाययोजना करून सर्वांना आनंदात सहभागी करून घेण्याचा हा दिवस आहे. ईद साजरी करताना आपल्या देशातील सर्व देश बांधवांना रमजान ईद पवित्र पर्वाच्या शुभेच्छा .
आज ईदगाह आणि मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करतांना जगातील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी दुआ मागितली जाणार आहे.सर्वांना मुबारकबाद देतांना क्षीरखुर्मा चा आस्वाद घेतला जाणार आहे. हा आस्वाद घेताना आपापसातील बंधुभाव आणि स्नेह वृद्धिंगत होणार आहे. हाताची पाच बोटे सारखी नाहीत. त्यामुळे सर्वांचे सुविचार एक सारखे नाहीत. परंतु आज सर्व काही विसरून एकमेकांना अत्यंत प्रेमाने दिलखुलासपणे आपण ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक !
गेली सवीस वर्षे दैनिक सार्वमतसह राज्यातील विविध वर्तमान पत्रातून रमजान महिन्यात माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत.या लेखमालेचे सर्व स्तरातील वाचकांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले.नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला. बहुमोल प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांना धन्यवाद.यावर्षी सोशल माध्यमातून राज्य, देश नव्हे तर जगभरामध्ये ही लेखमाला पोहोचली. अनेक वाचकांनी स्वयंस्फूर्तीने हे लेख आपल्या मित्रांना फॉरवर्ड केले. सर्वांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार.
पुढील काळामध्ये मागील सव्वीस वर्षातील सर्व लेखांचे पुस्तक तयार करावं अशी अनेक मित्रांनी इच्छा व्यक्त केली आहे.पुस्तक रुपाने वाचकांशी संवाद कायम राहील.आज पर्यंत वाचकांनी दिलेल्या बहुमोल प्रतिसादामुळे ही लेखमाला रौप्यमहोत्सवी वर्ष गाठू शकली याबद्दल निश्चित मला आनंद आहे. एखाद्या वर्तमान पत्रातील लेखमालेने रौप्य महोत्सव साजरा करावा ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. हे भाग्य मला प्राप्त झाले. त्याबद्दल सर्व वाचकांचे व ही लेखमाला प्रसिद्ध होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत, बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो हीच अल्लाहकडे प्रार्थना. मनापासून आभार. शुक्रिया .. शुक्रिया .. अलविदा .. अलविदा ..
*(समाप्त)*🌹🥀🌺🌷🌸 ♥️
-----------------------------------