- अहमदनगर - प्रतिनिधि - / वार्ता -
रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, रस्ते
अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक असुन अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अपघातामध्ये तरुणांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबियांवर मोठे संकट कोसळते. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात ब्लॅकस्पॉट असणाऱ्या ठिकाणी दीर्घ तसेच अल्प मुदतीच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने स्पीडब्रेकरची उभारणी केल्यामुळेही अपघात घडतात. त्यामुळे अशा स्पीडब्रेकरची उभारणी करताना विशेष दक्षता घ्यावी. अपघातग्रस्ताला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. वैद्यकीय यंत्रणांनानीही गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना उपचार मिळतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, रस्ता सुरक्षा अभियान २०२४ मध्ये सर्वांचा सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे. वाहतुक नियमांचे पालन केल्याने अपघातापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची मनोवृत्ती समाजातील प्रत्येकात दृढ व्हावी. लोकजागृतीमधून जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियान माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.
कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विभागांच्या कार्याचा आढावा*
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध विभागांसह महसुल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला.
सर्वसामान्यांच्या हितसाठी विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अधिक गती देण्यात यावी. प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने तसेच अधिक दक्षपणे काम करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================