अहमदनगर - प्रतिनिधि - विशेष - समाचार -
गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या जिल्ह्यातील सुमारे 83 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार आहे. तसेच चौघांवर ‘एमपीडीए' कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अधीक्षक ओला यांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अलिकडच्या काळात जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लुटमार, जबरी चोरीच्या घटना होत आहे. सराईत गुन्हेगार शस्त्राच्या धाकाने आपआपल्या परिसरात दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करत आहे. त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिक्षक ओला यांनी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना दिले होते. पोलिसांनी अशा सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन अधिक्षक ओला यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत. सुमारे 83 गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे.
अधिक्षक ओला यांनी पडताळणी करून प्रस्ताव त्या त्या प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. प्रांतधिकारी यावर निर्णय घेणार आहे. चार जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले अधिनियम 1981 (एमपीडीए) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहे.
दरम्यान, सराईत गुन्हेगारांवर यापुढे देखील अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येणार आहे. आणखी 50 हद्दपार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही अधिक्षक ओला यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment