मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासोबत गुजरात (Gujrat) राज्यात चिंतेचा विषय ठरलेले बिपरजॉय वादळ (Biparjoy cyclone) हे गुजरातच्या किनारपट्टी भागावर धडकले आहे. या वादळाची लँडफॉलची प्रक्रिया पूर्ण झाली असून किनारपट्टीपासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या चक्रिवादळाने गुजरात राज्यात हाहाकार माजवला असून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रिवादळाने कच्छ आणि सौराष्ट्रात हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी मोबाईल टॉवर, विजेचे खांब आणि ट्रान्समिशनचे खांबही कोसळले आहे. हे तीव्र वादळ सौराष्ट्र- कच्छ प्रदेशावर घोंघावत असून शुक्रवारी ते ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून यामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे मानवी जिवीतहानी झाली नसली तरी आत्तापर्यंत २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लोक यामुळे जखमी झाले असून चक्रीवादळ धडकण्याआधीच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टी भागात ताशी १४५ किलोमीटर वेगाने धडकल्याने या राज्यात मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. वादळामुळे सुमारे १००० गावे अंधारात बुडाली आहेत.
कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागढ, वलसाड या गुजरातच्या भागांसह शेजारील दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास जखाऊ बंदरानजीक हे वादळ धडकले आणि त्याचा जमिनीवरचा प्रवास सुरु झाला. १२५ किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहू लागल्याने या वादळाने विनाशकारी स्थिती निर्माण केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे चक्रीवादळ पूर्णपणे किनारपट्टी ओलांडून पुढे सरकले. दरम्यान वादळाच्या परिस्थितीवर केंद्र सरकारही लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रत्येक घटनेचे अपडेट घेत असून उपाययोजनाच्या सूचना देत आहेत.
यादरम्यान अनेक भागात १० ते २० सेमी पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार, गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. आज आणि उद्या काही भागात वादळाचा परिणाम राहणार आहे. या दरम्यान वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.
---------------------------------------------------===================================
सह.संपादक रंजित बतरा...शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+919970331313
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment