मुंबई - उत्त - सेवा - समाचार -
महराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांचा समावेश आहे.
अजित पवारांच्या या शपथविधीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
तसेच ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असे राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
==================================
-------------------------------------------------
उप,संपादक अनिकेत सुंदर तिवारी - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment