सातारा शहरातून चित्ररथासह रॅली व उदबोधन सभेचे आयोजन
सातारा / प्रतिनिधी:
खेडोपाड्यातील वंचित, गोरगरीब, उपेक्षित बहुजन समाजाच्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यासाठी आजीवन समर्पित भावनेने कार्य करणारे रयत शिक्षण संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती रविवार दिनांक २२ सप्टेबर २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थितीत सातारा येथील कर्मवीर समाधी परिसर येथे साजरी होत असल्याची माहिती संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दिली.
दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सर्व शाखा कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करीत असतात. सातारा येथील सर्व स्थानिक शाखांच्यावतीने सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात सकाळी ७.३० वाजता कर्मवीर समाधीस अभिवादन केले जाणार असून शहरातून चित्ररथासह स्थानिक शाखेतील विद्यार्थी शिक्षक यांची रॅली यावेळी निघणार आहे. शहरातील समाज सुधारक व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. रयत शिक्षण संस्था कर्मवीरांनी साता-यास १९२४ साली आणली. त्यांनी त्याकाळी भाड्याने घेतलेल्या स्वतःच्या राहत्या घरात ४ विद्यार्थी आणून वसतिगृह सुरु केले. याच वसतिगृहाचे नामांतर पुढे २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधी यांनी ‘श्री छ.शाहू बोर्डिंग हाउस’ असे केले. १९२४ चे वसतिगृह हे रयतचे वसतिगृह म्हणजे रयतची नव्याने उभारणी होती. हीच रयत शिक्षण संस्थेची गंगोत्री होती. कर्मवीरांनी आपले कार्य इथूनच गतिमान केले आहे. सरकारी अनुदाने बंद झाल्यानंतर संस्थेने अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण चालू रहावे म्हणून हे वसतीगृह सुरु ठेवलेले आहे. अशा या वसतिगृहास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या वसतिगृहाच्या शताब्दी निमित्ताने विविध संकल्प पूर्ण करण्याचे नियोजन देखील होणार आहे. याच बरोबर संस्थेस देणगी देणारे थोर देणगीदार, राज्य पुरस्कार मिळवणारे शिक्षक, नॅक मध्ये A, A+, A++ मानांकन मिळविणारी महाविद्यालये, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक, कर्मवीर पुरस्कार मिळवणाऱ्या शाखा, यांचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जाणार आहे. जयंती समारंभाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमास सातारा येथील विद्यार्थी, शिक्षणप्रेमी व नागरिक बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment