राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 9, 2024

मराठी साहित्यातील चमकता तारा डॉ. तारा भवाळकर


(आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश)

दिल्ली येथे संपन्न होणारे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक साहित्याच्या अभ्यासक ज्येष्ठ लेखिका समीक्षक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याची बातमी कानावर आली. साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदाची निवड ही सार्थ ठरावी अशी. लोकसाहित्यावर विपुल प्रमाणात संशोधन आणि लेखन करणाऱ्या ताराबाईंचा जन्म मूळचा विद्यानगरी पुण्यातला. वडिलांच्या नोकरीतील सततच्या बदल्यामुळे शिक्षणातील त्यांचे बदल कायमच होत राहिले. १९६७ सालच्या एम. ए. च्या त्या जुन्या विद्यार्थिनी. 'मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण' (प्रारंभ ते १९२०) हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय त्याकाळी या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचे पारितोषिकही मिळाले. ज्ञानदानाच्या क्षेत्रात निस्पृह, निस्वार्थी भावनेने त्यांनी शिक्षकी पेशा निवडला. बारा वर्षे माध्यमिक शाळेत शिक्षिका तर पुढे २९ वर्ष त्यांनी सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून उत्कृष्ट ज्ञानदानाची काम केले. पुणे, मुंबई, कोल्हापूर या विद्यापीठातील त्यांची व्याख्याने लक्ष स्रीवादी दृष्टिकोनातून मूल्यसंदर्भांनीयुक्त असे त्यांचे 'मायवाटेचा मागवा' हे पुस्तक नवसंशोधकांना प्रेरक ठेवणारे आहे. स्त्री जीवनाविषयीची आस्था, लोकसंस्कृती, लोकसाहित्याच्या संशोधनाची आणि लेखनाची आवड, लोककलेचे सखोल व्यापक दर्शन त्यांनी आपले लेखन प्रपंचातून घडविले. लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि नाटक हा त्यांचा लेखनाचा आवडता. प्रांत डॉ. रा. चि. ढेरे, दुर्गा भागवत, धर्मानंद कोसंबी, वि.का. राजवाडे, डॉ. श्रीधर केतकर या लोकसाहित्याच्या अभ्यासकांचा त्यांच्या विचार व लेखनावर प्रचंड प्रभाव आहे. लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा हा त्यांचा लेखनाचा आवडता. पुरुषांच्या तुलनेत ओथंबलेली स्त्री त्यापेक्षा त्या साहित्यातून विद्रोह करणारी स्त्री भेटते, या विद्रोही स्त्रीचे दर्शन त्यांच्या ओव्यांमधून आणि कथागीतातून वाचकांना होते. 
लोकसाहित्याच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक नाट्य लेखनावर तेवढेच प्रेम. त्यांच्या नाट्य लेखनाची जडणघडण होताना पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, यक्षगान, त्यांच्यावरची नाटके, कथकली या नाटकांच्या माध्यमातून त्यांचा दक्षिण भारतातही प्रवास झाला. नाट्य क्षेत्रात लेखनाबरोबर अभिनय, नाट्य, दिग्दर्शन त्या कामातही त्यांनी आपल्या कलेचा ठसा उठविला. लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा हा त्यांचा सैद्धांतिक अभ्यासाचा पुरावा. स्वर्गीय ओम लाड यांच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आकाशवाणीवर त्यांची व्याख्याने खूपच गाजली. मराठी साहित्याचा आधार म्हणजे मराठी विश्वकोश, मराठी वांग्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची योगदान महत्वाचे आहे. १९९१ साली अमेरिकेतील अरिझोना स्टेट विद्यापीठात आयोजित भारतीय समाज संस्कृती आणि स्त्री याविषयावरील चर्चासत्रातील त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या उत्कृष्ट लेखन व साहित्य लेखन कार्याची पावती आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, 'मराठी नाटक नव्या वाटा, नवी वळणे' या पुस्तकाविषयी मिळालेला वांग्मय समीक्षक पुरस्कार, कै. मालतीबाई दांडेकर जीवन गौरव पुरस्कार ही त्यांच्या यशोकीर्तीमध्ये भर घालतात. 
त्यांचा जन्म १ एप्रिल १९३९ सालचा. त्यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्य नाट्य लेखननाट्य, संशोधन, संत साहित्य एकांकिका, ललित लेखन, लोककला याविषयी तसेच श्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे. लोकसहित्य व लोककला विषयक अनेक परिसंवाद, चर्चा, संमेलनामधून त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सकदृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचं वस्तू पाठच आहे. विद्यार्थी तसेच अनेक नाट्य एकांकिका स्पर्धासाठी त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. शिक्षण संपताच स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली
 या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाटके बसून दिली. एकांकिकासाठी तयारी करून दिली. विष्णुदास भावे आणि 'मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण' (प्रारंभ ते १९२०) च्या प्रबंध लेखनासाठी सांगली, केरळ, गोवा, कारवार, कर्नाटक, कोकणात जाऊन माहिती संकलित केली. नमन, दशावतार मंडळे यासाठी माहिती गोळा केली. माध्यमिक शिक्षक ते प्राध्यापक असा त्यांचा नोकरीचा प्रवास विलोभनीय आहे. सेवानिवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाच्या ललित कला अकॅडमीच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमीच्या अतिथी प्राध्यापक म्हणून त्यांचा अनुभव मोलाचा होता. वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्याच्या अतिथी संपादक म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिले. मराठी कोश, मराठी ग्रंथकोश, मराठी विश्वकोश यासाठी त्यांनी अनमोल योगदान दिले. टाटा इन्स्टिट्यूटने स्त्रियांच्या मराठी ओव्या या विषयावर त्यांची व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरील 'संत कवयित्रींची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्री मुक्ती यांचा अनुबंध' या विषयावर त्यांचे व्याख्यान खूपच गाजले. त्यांचा लेखन प्रपंच खूपच मोठा आहे. आकलन आणि आस्वाद (साहित्यिक), तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक), निरघट सुरघट (लेखसंग्रह), प्रियतमा, स्त्रीप्रतिमा, बोरी बाभळी (प्रस्तावना) मधुशाळा (मराठी भाषांतर), मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह), मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे, मराठी नाट्य परंपरा : शोध आणि आस्वाद, महामाया माझे जातीच्या, मातीची रूपे (ललित), माय वाटेवर वाटेचा मागवा, मिथक आणि नाटक, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकजागर रंगभूमी, लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा, लोकपरंपरेतील सीता, लोकसंचित, लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह, लोकसाहित्याच्या अभ्यासाची दिशा, लोकांजन, लोकसंस्कृती शोधयात्रा, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, स्नेहरंग आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्व विषयांवर विविध प्रकार व दलित साहित्य प्रकारांमध्ये केलेल्या लेखन कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानही मिळालेले आहेत. मिरज, आवास (अलिबाग, इस्लामपूर, बेळगाव, जळगाव या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविलेले आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्य पुरस्कार, लोकसंचित महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार, पुणे येथील पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि २०२५ चे दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्या यशात मोलाची भर घालत आहे. 

=================================
-----------------------------------------------


*डॉ. शरद दुधाट* 
जिल्हाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर,+919561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment