भाषा समृद्धीच्या प्रवाहात राहुरी तालुका अग्रभागी - माजी खासदार प्रसाद तनपुरे
रिप्लेसमेंट "' नाट्य कलाकृतीचे प्रकाशन
- राहुरी - प्रतिनिधी -/ वार्ता -
साहित्य माणसाचे जीवन समृद्ध करते आणि साहित्य निर्मितीतून भाषा समृद्ध होते,साहित्य समृद्धीच्या या प्रवासात राहुरी तालुका अग्रभागी असून अनेक थोर संत, महंत, विचारवंत, साहित्यिक, कलावंत या भूमीने घडवलेले आहेत, या प्रवासात प्रशांत सूर्यवंशी यांनी लिहिलेले रिप्लेसमेंट हे नाट्य कलाकृतीचे पुस्तक निश्चितच या प्रवाहाचा मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका शाखेच्या वतीने आयोजित प्रशांत सूर्यवंशी यांच्या ' रिप्लेसमेंट ' या नाट्य कलाकृतीच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई चे कोषाध्यक्ष सतीश लोटके, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, ज्येष्ठ कवी सुभाष सोनवणे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, शाहीर अरुण आहेर, पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ओहोळ, प्रशांत सूर्यवंशी यांच्या मातोश्री श्रीमती सिंधुबाई सूर्यवंशी, भागीरथी बाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुनील गोसावी म्हणाले की, नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शब्दगंध ची सुरुवात झालेली असून साहित्याच्या प्रांगणामध्ये प्रशांत सूर्यवंशी यांचे नाट्य कलाकृतीच्या निमित्ताने आगमन झालेले आहे. शब्दगंधने नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहे. ही चळवळ अशाच नवोदित लेखकांच्या लेखणीतून अधिक व्यापक होणार आहे. शब्दगंध चे कार्यक्रम, साहित्य संमेलन आणि विविध उपक्रम अशांना व्यासपीठ उपलब्ध करून देत देईल आणि साहित्य निर्मितीचा हा प्रवाह अधिक प्रवाहित होईल.
कवी सुभाष सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले की, साहित्य, संवाद आणि संवेदना यापासून प्रेरणा घ्यावी लागेल पण आपल्यावर झालेले संस्कार आणि साहित्या बद्दल असलेली रुची यातून माणूस समृध्द बनतो.
नाट्यकर्मी सतीश लोटके यांनी प्रशांत सूर्यवंशी यांना शुभेच्छा देऊन रिप्लेसमेंट पुस्तकातील एका उताऱ्याचे अभिवाचन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातही अस्सल कलावंत असून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी मुंबईत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जेजुरकर यांनी केले. शेवटी प्राचार्य शुभांगी उंडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास प्रमोद सूर्यवंशी, बी के राऊत, माजी प्राचार्य मीना पाटील, शर्मिला रणधीर, संतोष निकम सर, अविनाश ओहोळ, प्रसाद भणगे , शैलेश देशमुख, संजय वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक , अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, मित्र ,पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांना पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध संस्था, संघटनाच्या वतीने प्रशांत सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कला अध्यापक संघाचेही सहकार्य या कार्यक्रमास लागले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment