*"माणुसकीला नसे जात आणि धर्म !**माणसाचे केवळ चांगले असावे कर्म !!*
वेळ सांयकाळची,शेवटची बस निघुन गेलेली. शिरुर एसटी स्टॅण्डवर श्रीगोंद्यास येणारी बस नाही. विचारपुस करुन एक चार चाकी जीप प्रवाशांची वाट पहात उभी होती. ती श्रीगोंद्यास जाणारी होती. मग एक वयाची ३५ वर्षात असणारी महिला एका दिड ते दोन वर्षाच्या मुलाला ओढत जीपकडे धावली. एक तांबड्या रंगाची बॅगेचे ओझे हातात, पोटात पाच सहा महिन्यांच्या बाळाचे ओझे झेलत जीप जवळ आली. ड्रायव्हरला विचारले....त्याने सांगितले श्रीगोंद्यापर्यंत गाडी जाईल...बसा.
गाडी निघाली. एक एक गावात थांबत अखेर उशीरा श्रीगोंदा स्टॅण्डवर पोहोचली. सर्वजण उतरुन पटापट निघुन गेले. ती माऊली कावऱ्या बावऱ्या नजरेने उतरली. जीपचे पैसे दिले. परंतु त्या जीप ड्रायव्हरने माणुसकीने विचारले ताई तुम्हाला कुठे जायचे आहे ? तिने सांगितले...करमाळ्याजवळचे मेंढापुर गावाला जायचे आहे. ड्रायव्हरला माहित होते..आता कुठेही जायला एसटी नाही. मग आता काय करायचे ? तिने निरागसपणे उत्तर दिले..भाऊ स्टॅण्डवरच झोपते मी लेकराला घेऊन. सकाळी एसटीने पुढे जाईल. इथे माझे कोणीही नाही. कोणाकडे जाऊ ?
ड्रायव्हर मध्ये माणुसकी ठासुन भरलेली होती. तो म्हणाला ताई, येथे स्टॅण्डवर झोपण्याइतके सुरक्षित नाही. काही तरी व्यवस्था होते का पहातो. असे म्हणत त्या महिलेला व लहान मुलाला पुन्हा जीपमध्ये बसवत ती जीप परत त्याच रस्त्याने श्रीगोंदा शहरातील जोतपूर मारुती चौकात गाडी थांबवली. तेथे असंख्य सेवानिवृत्त वयोवृध्द गप्पा मारत बसलेले होते. त्यांचे कोणाचेही लक्ष या घटनेकडे नसलेले लक्षात येत होते. मारुतीच्या उघड्या ओट्यावर मी रात्रभर झोपू शकेल असे ती महिला सांगत होती. त्या निष्पाप लहान लेकराला सर्व काही नवीनच होते. ती महिला ही भिरभिरत्या नजरेने आधार शोधत होती. ड्रायव्हरला हे योग्य वाटत नव्हते, अशा उघड्या चौकातील ओट्यावर एकट्या महिलेला झोपू देणे सुरक्षित वाटत नव्हते. त्याने तरी सुध्दा तेथील काही जणांशी चर्चा केली. सर्वच जण बघ्याची भूमिका घेत होते. त्यातील एक सदगृहस्थ सेवानिवृत्त शिक्षक श्री.सुर्यवंशी सर यांनी धीर देत सांगितले येथे उघड्यावर झोपू देणे अयोग्य आहे. आपण श्रीगोंदा शहराचे रहिवासी आहोत. येथे श्री संत शेख महंमद महाराजांची पंढरी आहे. आपण काही तरी करु आणि या भगिनीला सुरक्षित ठिकाणी आश्रय देऊ.
त्यावेळेस त्यांना दक्ष ची आठवण झाली. त्यांनी तात्काळ मला फोन केला व म्हणाले, दक्ष कुठे आहे ? काय करताय ? मी सांगितले श्रीगोंद्यामध्येच आहे. काय हूकूम आहे ? सुर्यवंशी सरांना आम्ही प्रेमाने बाबा म्हणतो. मी म्हटले, बाबा बोला ना. त्यांनी थोडक्यात कथा मला सांगितली. काय मदत या महिलेस करता येईल का ? मी म्हटले, बाबा...काळजी करु नका मी आलोच. काय मदत व कशी करता येईल ते चर्चेने ठरवु. मी तात्काळ हातातील काम बाजूला ठेवुन जोतपूर मारुती चौकात पोहोचलो. त्या भगिनीचा परिचय करुन घेतला. तिने माहेर व सासर कुठले ते सांगितले.
तिने पुढे सांगितले की, तिची एक बहिण कर्जत येथे रहात असल्याने तिथे जाऊन राहण्याची इच्छा तिने प्रगट केली. आमच्याकडे चार चाकी गाडी नसल्याने वहातुक शाखेचे पोलीस प्रदिप देवकाते यांचेशी संवाद झाला. त्यांनी सांगितले की, मी गाडीची व्यवस्था करतो परंतु रात्रीची वेळ आहे, एका महिलेला रात्रीचे घेऊन जाणे योग्य होणार नाही. त्यापेक्षा त्यांची निवासाची सोय करतो. सकाळी पहिल्या एसटीने जाऊ शकेल. मलाही त्यांचे बोलण पटले. मग यश हॉटेलचे मालक व नगरसेवक अशोकभाऊ खेंडके यांचे बरोबर फोनवरुन चर्चा केली. त्यांनी ही होकार भरल्याने मी सुर्यवंशी सर व ड्रायव्हर आणि तिचे लहान बाळ व त्या भगिनी सोबत गाडीत बसुन लॉजवर गेलो. लॉजचे सर्व सोपस्कर पूर्ण केले. त्या भगिनीस रुम दिली. जेवणाचे ताट आणुन दिले. तिचे लहान बाळ झोपले होते. ती जेवण करुन झोपी गेली. अशोकभाऊ व विनोदभाऊ खेंडके यांचे आभार मानले व तेथुन निघालो.
मी गाडी जवळ आलो. गाडीचे ड्रायव्हर रफिक शेख हे पारगाव सुद्रिक ता.श्रीगोंदा येथील सदगृहस्थ होते. एका सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबात जन्मात आले. कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी शिरुर ते श्रीगोंदा क्रुझर गाडी चालवतात. रफिकभाई मुळे एका भगिनीस मदत करता आली. मुस्लीम असुन सुध्दा हिंदू धर्मातील महिलेस मदत करण्यासाठी पुढे आले. तिला एकटे सोडले नाही. खरे तर गाडीमध्ये बसलेले प्रवासी स्टॉप आल्यावर उतरवुन देणे हेच काम असुन ही एका गरजवंत अबलेस मदत केली.
या घटनेवरुन लक्षात येते की, माणुसकीला जात धर्म काही ही नसतो. फक्त इच्छा शक्ती असावी लागते. आम्ही तर दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक भावनेने गरजुंना मदत करत असतो. परंतु रफिक शेख सारखे व सुर्यवंशी सरांसारखे सदगृहस्थांमुळे मदत करण्याची सुवर्ण संधी मिळत असते.असे काम केल्यानंतर मनस्वी आनंद आणि समाधान लाभते.
रात्रभर निवांत आराम करुन ती महिला (मनिषा शिंदे) ही सकाळी कर्जत गाडीने आपल्या सासरी मेंढापूर, पंढरपूर येथे पोहोचली.आपण ही एखाद्या गरजवंतास मदत करत रहा ही विनंती.
===================================
---------------------------------------------------
...शब्दांकन- *दत्ताजी जगताप*
दक्ष नागरिक फाऊंडेशन,श्रीगोंदा
मो.9422235707
--------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================