राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, September 3, 2024

दमदार पावसाने भोकर, खोकर* *परीसरातील बळीराजा समाधानी


- श्रीरामपू + प्रतिनिधी वार्ता 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने परीसरातील ओढे नाले वाहते झाले, परीसरातील छोटे, मोठे सर्वच बंधारे भरल्याने परीसरातील पाणी पातळीची वाढ होण्यास सुरूवात झाल्याने व खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला असला तरी दोन दिवसांपूर्वी पुन्हा सलग दोन दिवस चाललेल्या पावसाने मात्र खरीपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने सोयाबीन व कपाशी सारख्या खरीपाच्या पिकांना मोठा धोका निर्माण झाल्याने काही शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे.
भोकर व खोकर परीसरात जून महिण्यापासून सुरू झालेल्या या वर्षीच्या पावसाळ्यात अगदी सुरूवातीपासूनच तसा जेमतेम पाऊस झाला व त्यावर खरीपाची पिके उभी राहीली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या स्थीतीत असतानाच पावसाने ताणून धरल्याने अनेक शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळू लागले होते. पण गेल्या आठवड्यात सलग दोन दिवसरात्र दमदार पाऊस झाला अन् बळीराजा सुखावला. या पावसाने एका रात्रीत सर्वत्र पाणीच पाणी केले. परीसरातील ओढे व नाले वाहते झाले. त्याच बरोबर एकाच रात्रीतल्या पावसाने परीसरातील डॅमाच्या नाल्यासह त्यावर असलेले अनेक छोटे छोटे बंधारे, अशोक बंधारे ही तुडूंब भरूण ओसंडून वाहु लागल्याने परीसरातील बळीराजाच्या जीवात जीव आला कारण या दोन दिवसांच्या पावसाने भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाल्याने रब्बीच्या पिकांची ही खात्री वाटू लागली आहे.
पण गेल्या दोन दिवसांपुर्वी पुन्हा जोरदार पाऊस आला अन् पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे व नाले आज ही वाहत आहेत. त्यात भोकर परीसरात श्रीरामपूर - नेवासा राज्यमार्गालगत माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली येथील जगदंबा युवा प्रतिष्ठाणचे गणेश छल्लारे यांचे प्रयत्नातून ‘शिरपुर पॅटर्न’ च्या माध्यमातून साकारलेला परीसरातील मोठा असलेला डॅमाच्या नाल्यावरील बंधारा ओसंडून वाहु लागल्याने परीसरातील बळीराजा समाधानी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार आहे परंतू आता अनेक टीकाणी सखल भागात पाणी साठल्याने या परीसरातील सोयाबीन व कपाशी सारखी खरीपाची पिकं मात्र धोक्यात आल्याचे दिसत आहेत. 
त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी चिंंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे. भोकर येथील भामाठाण रोडलगत असलेल्या दमदार जमीनीत सखल भागात पाणी साठल्याचे दिसत आहेत. त्यात पठाणवस्ती परीसर अतिशय प्रभावित झाल्याचे दिसत असल्याने परीसरातील अनेक शेतकर्‍यांची चिंता वाढताना दिसत आहे. 
भोकर परीसरातील भामाठाण रोडलगत असलेल्या पठाणवस्ती परीसरात सोयाबीन व कपाशीचे पिकात साठलेले पाणी एका छायाचित्रात दिसत आहे तर भोकर परीसरातीलच श्रीरामपूर - नेवासा राज्यमार्गावरील माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे मार्गदर्शनाखालील डॅमाच्या नाल्यावरील बंधारा ओसंडून वाहत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. 


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳....
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - खोकर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

सर्वांच्या सहकार्याने हरिगांव मतमाउली यात्रा आनंदाने संपन्न होणार - तहसीलदार वाघ


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथील ७६ वा मतमाउली यात्रा महोत्सव सर्वांच्या सहकार्याने आनंदात संपन्न होईल असे प्रतिपादन तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ यांनी केले.ते येत्या १४ व १५ सप्टे.रोजी होणाऱ्या मतमाउली यात्रेच्या तयारीचा आढावा व समस्या तसेच यात्रा शांतता कमिटीप्रसंगी घ्यावयाची दक्षता नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.व म्हणाले की सर्व ठिकाणचे सिसिटीव्ही चेक करावेत, पार्किंग घेणाऱ्याने सर्व जबाबदारी स्वीकारली पाहिजे,अन्यथा कारवाई होईल.वीजपुरवठा सुरळीत राहील.महसूलचे सर्वांचे सहकार्य राहील असे ते म्हणाले.
यावेळी चर्च परिसरात तहसीलदार वाघ,,पोलीस निरीक्षक,चौधरी,जमावबंदीचे देशमाने,चौरे,महसूल विभाग अरुण रणनवरे, मंडळ अधिकारी गवारे, तलाठी डहाळे,गटविकास अधिकारी रमजान शेख आदींनी चर्च परिसरात पाहणी केली.श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सूचना केल्या की परिसरात जेथे अंधार आहे त्या ठिकाणी अजून सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत म्हणजे गैरप्रकार होणार नाहीत. ब्राम्हणगाव फाटा येथे वाहन तळ पार्किंग व्यवस्था असल्याने तेथे लाईट नसतात तेथे वीजपुरवठा उपलब्ध करावा तसेच चर्च ते खैरी रोडवर जेथे वाहतूक प्रवेश बंद ठेवल्या जाईल तेथपर्यंत विजेचे खांब टाकून लाईट व्यवस्था करावी.दुकानासाठी जागा दिल्यावर वाद होता कामा नये,पाळणे आदी लावताना विजेची दक्षता घ्यावी असे ग्रामपंचायत हरिगाव, उंदीरगाव यांना सांगितले. आवश्यक ती व्यवस्था यात्रेपूर्वी करण्यात येईल तसेच भाविकांसाठी पिण्याचे पाणी पुरवठा मुबलक राहील.सर्वत्र सीसीटीव्ही चालू आहेत असे संचालक वीरेश गलांडे व ग्रामसेवक डौले यांनी सांगितले. हरिगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रदीप आसने यांनीही आवश्यक समस्या सोडविल्या जातील. सीसीटीव्ही वाढविणार असल्याचे सांगितले.चर्च परिसरात हॉटेल,दुकाने थाटली जातात व चर्चकडे जाणारा रस्ता गर्दीसाठी मोठा ठेवला जातो.परंतु रात्रीतून दुकाने पुढे सरकून रस्ता अपुरा करतात त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत येईल. भाविकांसाठी पोस्ट ऑफिस जवळ बस स्थानक राहील असे एसटीचे अमोल पटारे यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे मतमाउली यात्रेनिमित्त परिसरात फ्लेक्स बोर्ड लावण्यात ग्रामपंचायत उन्दिरगाव यांनी मनाई केली आहे.असे डौले यांनी सांगितले.या शांतता कमिटीवेळी तहसीलदार मिलीन्द्कुमार वाघ,पोलीस निरीक्षक चौधरी,देशमाने, चौरेप्रमुख धर्मगुरु फा.डॉमनिक रोझारिओ, महावितरण गमे,दिलीप त्रिभुवन,प्रिन्सिपल सि.ज्योती, हरिगाव, उन्दिरगाव ग्रामसेवक, संचालक वीरेश गलांडे, जितेंद्र गोलवड, विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे,उप अभियंता पिसे,अनिल भनगडे, मोहन खरात,डी. एस . गायकवाड,ज्यो दिवे, भीमराज बागुल,सुभाष बोधक,मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक बी.जी. पारधे यांनी, तर सूत्र संचालन फिलीप पंडित यांनी व आभार प्रदर्शन फा.फ्रान्सिस ओहोळ यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

रस्ता दुरुस्तीचे कामे न झाल्यास उप अभियंता गुजरे यांना घेराओ - मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील ओव्हरब्रीज पासून अशोकनगर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीन ते चार महिन्यापूर्वी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दुरुस्तीनंतर केवळ चार महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याची येत्या पंधरा दिवसांत दुरुस्ती न झाल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता नितीन गुजरे यांना घेराओ घालण्याचा इशारा माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिला आहे.
              याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात श्री.मुरकुटे यांनी म्हटले आहे की, सदर रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्या दुरुस्तीचे काम तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आले. सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीयोग्य राहिलेला नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम न झाल्यास श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता नितीन गुजरे यांना घेराओ घालण्यात येईल असा इशारा माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिला आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातसखी सावित्रीची स्थापना


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात प्राचार्य अंगद काकडे व डॉ. स्नेहलताई म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सखी सावित्री समिती व शालेय विद्यार्थी समितीची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंगद काकडे व डॉ. स्नेहलताई म्हस्के यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य अलका आहेर यांनी केले. सखी सावित्री समितीच्या सचिव दीप्ती रुपवते यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. डॉ. स्नेहलताई म्हस्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या स्त्रीने समाजात जागृत राहण्याची गरज असून अन्याय आणि शोषणाविरुद्ध प्रखर आवाज उठविणे तसेच स्वसुरक्षा आणि समतोल आहार घेऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्राचार्य अंगद काकडे यांनी महिला आणि शालेय विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी कमल चेचरे, महेश वाकचौरे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले तर सचिव देवेश आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

राज्यात युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील १२ वी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.

कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहणार असून या कालावधीत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ९५९ रिक्तपदे अधिसूचीत करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ९३४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण ३ हजर ७५५ उमेदवार नियुक्ती दिलेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यापैकी महसूल १६४, जिल्हा परिषदेचे विविध विभाग ३ हजार ४६, महानगरपालिका ६७, जिल्हा रुग्णालय १८, महावितरण ६३, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ८, इतर शासकीय विभाग ५९ आणि खाजगी आस्थापनांमध्ये उत्पादन, सेवा आणि बँकींग क्षेत्रात ३३० उमेदवारांना रोजगार मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील विभागात सर्वाधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातून एकूण १० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागापूर येथील कार्यालयात औद्योगिक आस्थापनांसाठी सुविधा केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही युवकांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

*सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी-* युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे जिल्ह्यात १० हजार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. युवकांना रोजगारासोबत विविध आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ त्यांना भविष्यातदेखील होणार आहे. अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

*निशांत सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास*- युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी होण्याकरिता https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा https://forms.gle/6L3Agu9CEfG6A4Uh9 या लिंकवर अर्ज करावा. कौशल्य विकास व रोजगार कार्यालयात किंवा तालुकास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधादेखील आहे. 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
 *जिल्हा माहिती कार्यालय,अहमदनगर*
----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*प्रसिद्धी:*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, September 2, 2024

दहशती भीतीच्या छायेत....धैर्य हवे


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
गेल्या काही दिवसात आपल्या देशात अतिशय दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर, कोल्हापूर आणि अनेक ठिकाणी मुलीवर झालेल्या अत्याचाराने प्रत्येक महिलेच्या मनात एक विचित्र प्रकारची भीती निर्माण झाली आहे.खरंच आपण आपल्याच घरात आपल्या परिसरात सुरक्षित आहोत का ? आपली घरातून बाहेर गेलेली मुलगी,पत्नी ,बहीण, आई घरी सुखरूप परत येईल का ? ही भीती आता प्रत्येक व्यक्तीच्या काळजात व्याकुळता निर्माण करीत आहे.
          मैत्रिणींनो ! मी पण एका मुलीची आई आहे रोज एक नवीन घटना ऐकून बघून माझ्याही मनावर एक खूप मोठा आघात झाला आहे. स्त्रियांच्या मनात भीती निर्माण करणारी ही परिस्थिती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वीर जवानांच्या पावन भूमीत निर्माण व्हावी यापेक्षा लांच्छनास्पद अजून काय आहे?
शौर्य आणि धैर्य असलेले निर्भय नीतिमान महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान केला. नीतिमान राजाच्या या महाराष्ट्रात या वाईट घटना घडलेल्या आपण पाहिल्या. स्त्रियांचे हक्क आणि अधिकार ,स्त्रियांचे शिक्षण, या विषयी ज्यांनी निर्धाराने सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे बुध्दिमान धाडसी नेतृत्व या भूमीतून निर्माण झाले. जिथे जिजाऊ माऊलीनी शिवराय घडवले आणि महात्मा ज्योतिबा फुले नी आपल्या पत्नीला माणूस म्हणून सर्व हक्क दिले,तिला साक्षर केले .ज्या राज्यात शूर वीर जन्मले ..आणि ज्या भूमीत. परस्त्री ही मातेसमान अशी शिकवण संतानी दिली ती हीच पावन भूमी मानली जाते तो महाराष्ट्र. हाच तो देश जो स्त्रियांचे रक्षण करत होता..त्याच भूमीत वासनांध मुले कशी निपजली ? असे प्रश्न पडतच चालले आहेत. 
स्वप्नातही असे दिवस येतील असे वाटले नाही.भीतीच्या छायेत काळजीने पोखरलेली स्त्री मने इथे दिसतात.मग एवढ्या सुंदरतेने नटलेल्या आणि कौटुंबिक ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या पावन पवित्र देशाला कुणाची नजर लागली का? आज भारत देश प्रगतीच्या दिशेने प्रवास करतोय पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली स्त्री २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आता कुठे वेग घेऊ लागली..आता कुठे तिच्या पंखात शिक्षणाची शक्ती येऊन ती देश प्रदेश परदेश मुक्त बुद्धिमत्तेने अनेक अवकाशात उड्डाण घेऊ लागली . प्रत्येक कामात तेवढ्याच धडाडीने ताकतीने पुढे जात आहे मग एवढं सगळं असून आज ही वेळ का ?नक्की या समाजात ही अस्वस्थता का पसरली आहे ?आज आपल भविष्य कुठेतरी भीतीच्या खाईत तर संपुष्टात येत नाही ना ..जे पक्षी आता कुठेतरी आपल्या घरट्यातून बाहेर उंच झेप घेण्याचा प्रयत्न करतात त्याचे पंख जर कोण कापून टाकत असतील तर आयुष्य भराची जखम कधी भरून निघेल का ? हा सगळा विचार आज माझ्यासारखे अनेक पालक स्त्री.पुरुष करीत आहेत..ही अस्वस्थता दूर करण्याची आणि धीराने पुढे जाण्याची गरज आहे
        यासाठी आपण आपल्या स्वतः पासूनच बदलाची सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. एक पालक म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण घर आपलं कुटुंब जोपासायला आणि सांभाळून ठेवायला शिकणं खूप गरजेचं आहे. मान,पैसा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपण कमवतच राहणार आहोत, पण या सगळ्यामध्ये जिथे आपली सगळ्यात पहिली आणि महत्वाची जबाबदारी आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत ती म्हणजे आपली घडणारी पुढची पिढी...आपली मुलं .कामाच्या विविध प्रकारच्या व्यापामध्ये आपण वेगवेगळ्या ताणात आपण एवढे बुडून गेलोय आपली मुले आपल्या पासून खूप लांब चालली आहेत हे आपल्या लक्षात पण येत नाही. आणि जेंव्हा या गोष्टीची जाणीव होते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. अनेक प्रलोभनाने भरलेल्या या दुनियेत आपण आपल्याला हरवून जाणे योग्य नाही. आपली मुले या संसार चक्रात मनाने शरीराने बदलत चालली आहेत.. भोवताल गढूळ होत आहे.. निर्मळ आदर्श असण्यापेक्षा आज मुलांच्या पुढे कितीतरी नवनवी आकर्षणे त्यांची मने खेचून घेत आहेत. या भुलभुलय्याची ,समाजात येणाऱ्या अनुभवाची,चर्चा घरात मुक्तपणे होऊन त्यातून अलिप्त कसे राहायचे, स्व संरक्षण कसे करायचे या बाबी सांगण्याची नितांत गरज वाटत असे. कधी कधी विविध जंजाळात अडकलेली आपली मने जवळ असलेल्या आपल्या मुलाच्या मनात नक्की काय चालू आहे हे देखील पाहत नाहीत. ती लहान असली तरी त्याच्या पण मनात भावना आहेत ..आणि त्यात सतत बदल होत आहेत..त्यांना मन आहे,मत आहे हे आपण कधी लक्षातच घेत नाही आणि त्यामुळे आज समाजात जे काही घडते आहे त्याची बळी निष्पाप मुली ठरत आहेत. मुलगा असो वा मुलगी त्यांच्या मनावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे.. त्यांचे मित्र ,मैत्रिणी कोण आहेत त्यांचे विषय काय आहेत ते विषय असेच का आहेत..याचा अप्रत्यक्ष शोध घेऊन आपण मुलांना विश्वासात घेऊन जागरूक करीत गेले पाहिजे. म्हणूनच मला मुलासोबतचा सहवास आणि संवाद अतिशय महत्वाचा वाटतो..प्रत्येकाला खाजगी जीवन असले तरी आपले घरटे सुरक्षित राहायचे असेल तर घरातील प्रत्येक जीवाला सुरक्षित राहण्याचे शिकवले पाहिजे तसेच संकटे काय येऊ शकतील व त्या पासून कसे सुरक्षित राहायचे हे घरात,शालेय जीवनात शिकवले गेले पाहिजे.घरात मोकळीक तेने चर्चा करून विषय समजून घेतले पाहिजेत. 
सध्याची परिस्थिती बघता आपण आपल्या मुलींना घाबरून घरात बसवून ठेवू शकत नाही . 
यावर घाबरून न जाता आपल्या मुलींना बळ देणं त्यांना उभ करणं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.सतत सावधान मन असणारी मुले ,चिकित्सक मुले शोधक मुले,निर्भय मुले,सतर्क राहणारी मुले घडवण्यासाठी आपल्याला संवाद करण्याची खूप गरज आहे. 
सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे आपली मुलं आपल्या सोबत किती मोकळे पणाने बोलतात? मुलांचा इतर कोणाही पेक्षा आपल्या आई वडिलांवर विश्वास आहे का ? असे आरोग्यदायी वातावरण आपण तयार केले आहे का ? माझी मम्मी मला योग्य मार्गदर्शन करेल ,माझे वडील माझ्या भविष्याची योग्य दिशा ठरवतील हे जोपर्यंत मुलांना समजणार नाही तो पर्यंत या समाजात अशा घटना घडत राहणार.म्हणूनच 
आई ही मुलीची मैत्रीण असलीच पाहिजे. मुलगी शाळेतून घरी आल्यावर आपल्या आई सोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगते का हे बघा आणि सांगत नसेल तर आपण कुठे तरी कमी पडतोय आपण त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे हे समजून घ्या.
वडील हे मित्र पाहिजेत.पप्पा मला आज फिरायला जायचं आहे .चला आपण जाऊया हे जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांना हक्काने बोलते तेव्हा ती मुलगी खूप सुरक्षित आणि सुखरूप आयुष्य जगत असते कारण वडीलांसारखा सगळ्यात काळजी आणि निस्वार्थी प्रेम करणारा माणूस या जगात दुसरा कोणीच असू शकतं नाही हे जेव्हा आपल्या लाडक्या मुलीला समजेल तेव्हा तिची पावले चुकीच्या वाईट मार्गाला जाणारच नाही . घरात जर मुलांना पोषक आणि सुसंस्कारित वातावरण मिळाले तर त्याबरोबर त्याच्या सोबत मोकळे पणाने समाजात होणाऱ्या घटनेबद्दल बोलता येते. त्याच्या मनात भीती न पसरवता त्यातून कसे बाहेर पडता येईल या बद्दल बोलणं गरजेचं आहे. घरा घरातून असा संवाद वाढत नाही तोपर्यंत आपली मुले ही कुठेतरी भरकटत जाणार. त्यामुळे माझ्या माता पालक मैत्रिणीना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही बोलते व्हा. आणि आपल्या मुलांना मुलींना समजून घ्या. रागावून चिडून ओरडून काहीही होणार नाही. कधी मन भटकण्याने चूक झाली म्हणून ओरडत बसण्यापेक्षा बाहेर कसे पडायचे यासाठी त्यांना मदत करा. मुलांना कोणतीही चुकीची गोष्ट घडली की ती पालकांना सांगण्याची भीती वाटते आणि या भीती पोटी ते आणखी चार गोष्टी चुकीच्या करून बसतात. म्हणून आपण पालकांनी आपल्या मुलांना एवढं प्रेम दिलं पाहिजेत की त्यांना आपल्या पासून कोणतीच गोष्ट लपवायची वेळ येऊ नये... संस्कार आणि शिस्त लावण्याचा नादात आपल्यापासून ती दुरावली तर हीच मुले उद्या व्यसनाच्या,हिंसक प्रवूत्तीच्या आहारी जातात. हे थांबणं खूप गरजेचं आहे.
       आज माझी मुलगी जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये शाळेत शिकते .ही शाळा म्हणजे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे . शाळेबद्दल आदर असणं.शिक्षकाविषयी प्रेम असणं हे मुलांना त्यांच्या अंतर्मनातून जाणवलं पाहिजेत. हे त्या शाळेच्या वातावरणातून निर्माण होते. आणि माझ्या मुलीच्या शाळेतील सर्व शिक्षक हे खरंच खूपच चांगले आहेत.
खूप काळजपूर्वक आणि स्वतःची मुले आहेत हेच समजून ते मुलांना घडवतात ,शिकवतात .आणि माझ्या मुलीचं भाग्य चांगले म्हणून या शाळेत ती शिकत आहे .मुख्याध्यापिका सौ. सुनिता वाघमारे मॅडम म्हणजे या शाळेतील माई आहेत. त्यांच्या छत्र छायेखाली ही मोठी झालेली मुले कधीच वाया जाणार नाहीत. हे मी खात्रीशीर सांगू शकते. 
पालकांनो खरंच जागरूक व्हा .आपल भविष्य हे आपल्याच हातात आहे त्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षक हे जिवाच्या आकांताने मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतच असतात पण त्याला पालकांची पण तेवढीच साथ पाहिजे. तेव्हा कुठे याची सांगड लागून आपली मुले एक स्वच्छंदी आणि सुसंस्कारी नागरिक म्हणून आत्मसन्मानाने उभी राहतील. कर्मवीर भाऊराव अण्णा याना हेच अपेक्षित होते..
मुलामुलींनो! आपले आई वडील आणि आपले शिक्षक हे कायम आपल्या हिताचा विचार करत असतात .तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या आई वडिलांचे मत विचारात घेऊन करा. कोण तुम्हाला काही त्रास देत असेल तर सगळ्यात आधी आपल्या पालकांशी मोकळे पणाने बोला. आम्ही कायम तुमच्या साठी तत्पर आहोत. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याला मार्ग च नाही. Good टच bad टच ओळखायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसं ओळखायला शिका. मुलगा फिरायला नेतो , खाऊ देतो ,गिफ्ट देतो ,तू खूप छान दिसते म्हणतो म्हणून त्याला भुरळून जाऊ नका.आपण आपलीच दिशाभूल करून घेतो.पुन्हा पश्चाताप शिवाय दुसरं हातात काही राहत नाही. आत्ता आपले शिकण्याचे वय आहे. एकदा वेळ निघून गेली तर आयुष्यभर रडत बसावे लागेल म्हणून वेळीच जागे व्हा. आयुष्य खूप सुंदर आहे.त्याचा आनंद घ्या हे जीवन पुन्हा नाही. पालकांनी पण आपल्या मुलांना वेळ द्या. त्यांना डोळसपणे आणि उघडपणे सगळ्या गोष्टींची माहिती करून द्या. कसे सांगू कसे बोलू हे करत बसलात तर उद्या मुले बाहेर भरकटत राहतील .म्हणून सजग आणि सावध व्हा.दहशत कितीही असू दे धैर्य हवे,सोबत हवी,निर्भयता हवी,ज्ञान हवे, ताकद हवी,पालकांची साथ हवी.मग भीती पळून जाईल, स्वयंप्रकाशित सूर्य उगवून वर येईल.


=================================
-----------------------------------------------
*लेखन*
सौ.आरती दळवी ✍️✅🇮🇳...
रामनगर,वर्य - सातारा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे विलासराव घाणे यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले विलासराव घाणे यांची पोलीस दला अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली, श्री. घाणे यांनी अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची जिद्द जोपासली,त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच लोणी पोलीस स्टेशन, श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशन अशा विविध ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.
श्रीरामपूर न्यायालयात अनेक वर्षापासून सेवा बजावत असताना श्री.घाणे दादा म्हणुन ते सर्वांना सुपरीचित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलबुर्गे,उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुंजे,पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, प्रा मंगेश शिरसाठ तसेच श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.उपस्थित सर्वांचे श्री.घाणे यांनी आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर  +91९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================