राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 8, 2024

राहुरी - रिप्लेसमेंट या नाट्य कलाकृतीचे प्रकाशन करताना माजी खासदार प्रसाद तनपुरे, समवेत सुभाष सोनवणे, सुनील गोसावी, प्राचार्य चंद्रकांत भोसले, अरुण आहेर,प्रशांत सूर्यवंशी आदी.


भाषा समृद्धीच्या प्रवाहात राहुरी तालुका अग्रभागी - माजी खासदार प्रसाद तनपुरे

 रिप्लेसमेंट "' नाट्य कलाकृतीचे प्रकाशन

- राहुरी - प्रतिनिधी -/ वार्ता -
साहित्य माणसाचे जीवन समृद्ध करते आणि साहित्य निर्मितीतून भाषा समृद्ध होते,साहित्य समृद्धीच्या या प्रवासात राहुरी तालुका अग्रभागी असून अनेक थोर संत, महंत, विचारवंत, साहित्यिक, कलावंत या भूमीने घडवलेले आहेत, या प्रवासात प्रशांत सूर्यवंशी यांनी लिहिलेले रिप्लेसमेंट हे नाट्य कलाकृतीचे पुस्तक निश्चितच या प्रवाहाचा मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले. 
      शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका शाखेच्या वतीने आयोजित प्रशांत सूर्यवंशी यांच्या ' रिप्लेसमेंट ' या नाट्य कलाकृतीच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई चे कोषाध्यक्ष सतीश लोटके, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, ज्येष्ठ कवी सुभाष सोनवणे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, शाहीर अरुण आहेर, पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ओहोळ, प्रशांत सूर्यवंशी यांच्या मातोश्री श्रीमती सिंधुबाई सूर्यवंशी, भागीरथी बाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुनील गोसावी म्हणाले की, नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शब्दगंध ची सुरुवात झालेली असून साहित्याच्या प्रांगणामध्ये प्रशांत सूर्यवंशी यांचे नाट्य कलाकृतीच्या निमित्ताने आगमन झालेले आहे. शब्दगंधने नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहे. ही चळवळ अशाच नवोदित लेखकांच्या लेखणीतून अधिक व्यापक होणार आहे. शब्दगंध चे कार्यक्रम, साहित्य संमेलन आणि विविध उपक्रम अशांना व्यासपीठ उपलब्ध करून देत देईल आणि साहित्य निर्मितीचा हा प्रवाह अधिक प्रवाहित होईल.
कवी सुभाष सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले की, साहित्य, संवाद आणि संवेदना यापासून प्रेरणा घ्यावी लागेल पण आपल्यावर झालेले संस्कार आणि साहित्या बद्दल असलेली रुची यातून माणूस समृध्द बनतो.
नाट्यकर्मी सतीश लोटके यांनी प्रशांत सूर्यवंशी यांना शुभेच्छा देऊन रिप्लेसमेंट पुस्तकातील एका उताऱ्याचे अभिवाचन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातही अस्सल कलावंत असून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी मुंबईत आहे. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जेजुरकर यांनी केले. शेवटी प्राचार्य शुभांगी उंडे यांनी आभार मानले. 
या कार्यक्रमास प्रमोद सूर्यवंशी, बी के राऊत, माजी प्राचार्य मीना पाटील, शर्मिला रणधीर, संतोष निकम सर, अविनाश ओहोळ, प्रसाद भणगे , शैलेश देशमुख, संजय वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक , अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, मित्र ,पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांना पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध संस्था, संघटनाच्या वतीने प्रशांत सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कला अध्यापक संघाचेही सहकार्य या कार्यक्रमास लागले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================




नगरपालिकेच्या बेलगाम कारभाराला शिस्त लावण्याचे नव्या मुख्याधिकाऱ्यांपुढे आव्हान नागरिक त्रस्त, कर्मचारी मस्त, प्रशासन सुस्त

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
कधीकाळी आपल्या उत्कृष्ट प्रशासनाने राज्यात नावाजलेली श्रीरामपूर नगरपालिकेची आज खूपच दैयनिय अवस्था झाली आहे, प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचारी बेलगाम सुटले आहेत त्यामुळे ज्याला जे वाटेल त्या पद्धतीने काम सुरू आहे कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे एका कर्मचाऱ्यांचा मानसिक धक्क्यांनी मृत्यू झाल्याची ही चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे पालिकेचे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांची प्रशासकी कारणास्तव बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी आलेले नूतन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यापुढे पालिकेच्या या विस्कटलेल्या घडीला बसविण्याचे मोठ्या आव्हान आहे .एक अभ्यासपूर्ण अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून आता ते पालिकेचा विस्कटलेला हा कारभार कसा सावरतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधी कार्यरत असताना पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून चार वर्षांपूर्वी गणेश शिंदे यांनी कारभार स्वीकारला त्यांच्या पूर्वी चार वर्षात सात मुख्याधिकारी पालिकेला लाभले होते, त्यामुळे मोठे अनागोंदी होती परंतु शिंदे यांनी आपल्या कार्य कौशल्याने सर्वांना सांभाळून घेत कारभार केला, एकीकडे पालिकेचे पदाधिकारी नगरसेवक विरोधी गटाचे सदस्य या सर्वांशी सामुच्चाराने घेतानाच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे शिस्तही लावली त्यांचे आदेशानुसार व्यवस्थित कारभार सुरू होता त्यांची बदली झाल्यानंतर सोमनाथ जाधव यांनी मुख्याधिकारी म्हणून कारभार सुरू केला मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या गटबाजीला ते बळी पडले, काही ठराविक कर्मचाऱ्यांनी आपले जाळे त्यांच्यावर टाकले आणि मग त्यांच्या इशाऱ्यानुसार जाधव कारभार करू लागले त्यामुळे नगरपालिकेमध्ये ठराविक कर्मचारी म्हणतील त्याच पद्धतीने कामकाज सुरू झाले. नागरिकांचे प्रश्न मात्र प्रलंबितच राहिले . नागरिकांच्या तक्रारीची कोणतीही दखल त्यावेळी घेतली जात नव्हती आणि आजही फार घेतली जात नाही ठराविक दोन-तीन कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आपल्या ताब्यात घेतल्याने ते सांगतील तसेच घडू लागले आणी इना मीना डिका हे त्रिकूट खूपच चर्चेत आले तोंडी आदेशावर कामे होऊ लागली धडाधड बिले निघू लागली सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र जागेवरच राहिले . आरोग्य, बांधकाम, शिक्षण आदी विभागात अनागोंदीचा कारभार सुरू झाला. शहरांमध्ये अनेक रस्ते खड्डेमय झाले असताना त्यावर साधे मुरूम टाकण्याचे कामही कर्मचारी करीत नव्हते नागरिकांची हाडे मात्र त्यामुळे खिळखळी झाली आरोग्य विभागाचे कामकाज तर संशोधनाचा विषय झाला आहे विविध भागातील गटारी सफाई अभावी तुंबल्या आहेत मिल्लतनगर भागामध्ये दोन महिन्यापासून अंडरग्राउंड गटारीचे पाणी रस्त्यावरून लोकांच्या घरात जात आहे. तर गटारीकडेने पिण्याच्या पाण्याची जुणी पाईपलाईन गेली असल्याने नेहरुनगर मधील काही नळांना चक्क गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.याबाबत नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्याने याविषयी नागरिकांनी तक्रारी करून देखील फारशी दखल घेतली जात नाही,कायमस्वरूपी हा प्रश्न सुटत नसल्याने आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ही भुयारी गटारच बुजून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
पालिकेत कर्मचाऱ्यांचे दोन गट आहेत आणि हे सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करीत असतात एकमेकाला त्रास देण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाही त्यातून कर्मचाऱ्यांबद्दल खोट्या तक्रारी करणे, कामे न करणे असे प्रकार सुरू झाले आहे. लेखा विभागातील काही कर्मचारी आपल्याच कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीची किंवा इतर बिल्ले काढण्यासाठी पैसे मागत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत हे सर्व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांनी सोयीस्कररित्या याकडे दुर्लक्ष केले .त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.याबाबत काही कर्मचाऱ्यांनी पालिकेचे प्रशासक प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी कर्मऱ्यांना लेखी अर्ज दिल्यावर मला ते रेकॉर्डवर घेता येईल असे सांगून कर्मचाऱ्यांना तक्रार देण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता तक्रारी लेखी सुरू झाल्या आहेत.शहरात कोणती विकास कामे होत आहेत याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लहू कानडे यांनी देखील नगरपालिकेचे कामकाजामध्ये मला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार मागे पालिकेत घेतलेल्या मीटिंगमध्ये केली होती. त्याबाबतही मोठी चर्चाही झाली होती.
जाधव बदलून गेले आणि त्यांच्या जागी आता मुख्याधिकारी घोलप आले आहेत. आल्या आल्या त्यांना या सर्व परिस्थितीची कल्पना आली आहे. त्यामुळे ते आता कोणत्या पद्धतीने काम करतात.अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागात चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या बदल्या दुरुस्त झाल्या पाहिजे. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रशासकांच्या केबिनमध्ये मुख्याधिकारी बसतात आणि मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये उपमुख्य अधिकारी बसतात. म्हणजे कोणाच्या खुर्च्यावर कोण बसलय याचे सुद्धा भान या कर्मचाऱ्यांना राहिलेले नाही. 
प्रशासक म्हणून प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील हे पालिकेत फारसे लक्ष घालत नसल्याचे चित्र आहे. प्रांत अधिकारी पदाचा कारभाराचा वाढता व्याप तसेच विधानसभेची निवडणुकीची तयारी त्यामुळे त्यांना पालिकेत लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.परिणामी सर्व कारभार मुख्याधिकाऱ्यांच्या भरोशावर चालू आहे. माजी मुख्याधिकारी जाधव यांच्या काळातील झालेल्या सर्व प्रकारच्या खर्चाची आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी शहरातील काही जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरामध्ये अतिक्रमणे प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमण अधिकारी म्हणून पालिकेमध्ये एक रोजंदारीवरील कर्मचारी काम पाहतो आणि तो सर्रासपणे अतिक्रमण धारकांकडून हप्ते उकळत असल्याची उघड चर्चा शहरात असताना या अतिक्रमणांकडे पालिका फारसे लक्ष देत नाही.उलट एखाद्या अतिक्रमणाबद्दल कोणी तक्रार केल्यास संबंधित तक्रारदाराचे नाव त्या अतिक्रमण धारकांना कळविण्यात येते आणि त्याच्याकडून चिरीमिरी घेऊन प्रकरण मार्गी लावले जाते अशाही चर्चा शहरात आहे.
आरोग्य विभागाचा अतिशय मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. रोजंदारीचे कामगार किती ? त्यांचा रोजचा पगार किती निघतो ? प्रत्यक्षात किती जण काम करतात ? हे सर्व प्रश्न आता संशोधनाचे विषय झाले आहेत. त्यामुळे नुतन मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप हे आता नगरपालिकेची घडी  कशा पद्धतीने बसवतात व नागरिकांना दिलासा कसा देतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







अभिजात मराठी भाषेची कलश घटस्थापना निवडक मराठी भाषिकांनी नोंदवलेल्या बोलक्या प्रतिक्रिया


 केंद्रसरकारने मराठीचा हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्य ठेवा मान्य करूनच ३ ऑक्टोबर २०२४ ला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन सर्वच मराठी भाषिकांना उपकृत केले आहे. महाराष्ट्र सरकार, साहित्यिक आणि मराठी भाषिकांनी केलेल्या प्रयत्नांना हे गोड यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने ३ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्ष  'अभिजात मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. 
अभिजात मराठीला मिळालेल्या या सन्मानामुळे सर्वच मराठी भाषकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. यावर काही निवडक प्रतिक्रिया खूपच बोलक्या आणि मराठीविषयी अस्मिता जागवणाऱ्या आहेत. 


मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि सर्व मराठी भाषिकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! *साहित्यिक, आ. लहू कानडे,* श्रीरामपूर विधानसभा 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी भाषकांचे हार्दिक अभिनंदन! 
*प्राचार्य, डॉ. शिरीष लांडगे* (अहिल्यानगर)

केंद्रिय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मराठी भाषेचा गौरव केला, त्याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन थांबता कामा नये. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी राज्यशासनाने काही कठोर शासननिर्णय पारित करणे अपेक्षित आहेत. १३ सप्टेंबर २०२४ च्या शासनादेशानुसार राज्यसरकारने इयत्ता १२ वी पर्यंत सर्व शाखांसाठी मराठी विषय अनिवार्य केला आहेच. पुढील वर्षापासूनच त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. घेतलेले निर्णय केवळ कागदावरच राहणार नाहीत एवढीच माफक अपेक्षा.
*प्रा. सुनील डिसले (पुणे)*                       
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ

माय मराठीचा उचित गौरव-
 ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रिय मंत्रिमंडळ समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला, हे युगाच्या भाषा चळवळीचे अमृतफळ आहे. श्रीचक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर आदी माहात्म्यांनी आणि अर्वाचीन साहित्यिक, भाषाप्रेमींनी केलेल्या योगदानाला मिळालेली प्रतिष्ठा आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर आदी सर्वांचेच याबद्दल धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. आता माय मराठी प्रतिष्ठित झाली आहे, माय मराठीच्या लोकप्रियतेला राजकीय सन्मान मोहोर लाभली, याबद्दल अतिशय आनंद आहे. तिचा हा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण बनवू या ! धन्यवाद
*साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,* (अहिल्यानगर)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे बोली भाषेच्या संशोधनाला गती मिळेल. मराठी भाषा ही स्वतंत्र व स्वंयभू भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाला गती मिळणार आहे.
*डॉ. नानासाहेब सूर्यवंशी,* (लातूर) संपादक, अक्षर वाङ्मय मासिक.

संस्कारक्षम अभिजात मराठीला शासनाची सुवर्ण मोहर लागली. सुवर्णदिनी, सुवर्णक्षणी मराठीच्या इतिहासात सुवर्ण पान लिहिलं गेलं. मराठीला मिळालेले हे अभिजात भाषेचे वैभव हीच मराठी भाषेच्या अस्मितेची खरी ओळख आहे.  मराठी भाषा हीच संस्कृतीची प्रमुख वाहक आहे. तिच्या जाज्वल इतिहासाचे आपण सर्वजण पाईक आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो. मराठी भाषेच्या प्रसार व प्रचाराचे कार्य करताना, दुसरीकडे मराठी शाळांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. ही गंभीर बाब विसरता कामा नये. मराठी शाळा वाचवणे व इयत्ता १२ वी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे हे शासनापुढे आव्हान आहे. असं झाल्यास खऱ्याअर्थाने मराठी भाषेला सोनियाचे दिवस येतील व तिच्या देखण्या रूपड्याला सौंदर्याची झालर येईल एवढे मात्र निश्चित!                 
*डॉ. मनीषा रिठे, (वर्धा)*
कार्याध्यक्ष,                      
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयावर शिक्षक महासंघ

अमृताहूनही रसाळ असणारी मराठी भाषा, ही मूळातच अभिजात भाषा आहे. आता केवळ शासकीय दृष्ट्या तिच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. संस्कृती, साहित्य, इतिहासात भाषेचे अभिजातत्त्व असतेच. या अभिजात दर्जामुळे फक्त भाषिक विकासाला आर्थिक पाठबळ मिळेल. मराठी भाषेचे अभिजातत्व, जर खरच टिकून ठेवायचे असेल तर, भाषा संस्कृतीवर जे पाश्चात्य संक्रमन झाले आहे, ते पुसून काढावे लागेल आणि असे झाले तर भाषेचे अभिजात होणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी लाभकारी असेल.
*डाॅ. रमेश पांडुरंग पोळ* 
प्रमुख, मराठी विभाग, 
प्रमुख सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (सातारा)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा  सुवर्णक्षण आहे.
सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भाषेला तिच्या समृद्धीसाठी खऱ्या अर्थाने राजमार्ग प्राप्त झाला. मराठी विषय शिक्षक महासंघाने प्रामुख्याने इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सर्व विद्याशाखा अनिवार्य व्हावी तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रामुख्याने लढा दिला. स्वयंभू असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने ती जगमय होईल यात शंका नाही..
 *प्रा. बाळासाहेब माने, (मुंबई)*
सचिव, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जणांना अभिमान वाटावा अशी बातमी घटस्थापनेच्या दिवशी आली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी जणांचा ऊर अभिमानाने भरून आला. ही बातमी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होण्यासाठी काही दशकांची वाट पहावी लागली मात्र उशिरा का होईना हे स्वप्न साकार झाले. यासाठी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानावे लागेल. त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात व्यक्तींनाही सलाम करावा लागेल.
*पत्रकार गोरे साहेब,*
 दैनिक केसरी, (संभाजीनगर)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ही खूपच अभिमानास्पद बाब.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला अधिक प्रोत्साहन मिळेल. मराठी साहित्याचं शास्त्रशुद्ध संशोधन होईल, त्यावर आधारित नवी पुस्तके, लेख, आणि तांत्रिक साधनं निर्माण केली जातील. मराठी भाषेच्या अभ्यासकांना नव्या शक्यता आणि संशोधनाच्या संधी मिळतील. 
अशा प्रकारे, अभिजात दर्जा केवळ एका भाषेचं महत्त्व अधोरेखित करत नाही, तर तिच्या संवर्धनासाठीही अनेक दारं उघडतो. मराठी भाषा जरी या निर्णयामुळे जागतिक पटलावर आली असली, तरी तिचं स्थान अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. विशेषतः नव्या पिढीमध्ये या भाषेचं महत्त्व वाढवणं, तिचा अभ्यास करायला प्रोत्साहित करणं, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेला नवीन पिढीत रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यामुळे मराठी भाषेचं सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक महत्त्व अधिक ठळक होईल. अभिजात भाषेचा दर्जा ही एका प्रकारची मान्यता आहे की, मराठी भाषा फक्त संवादाचं साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचं मूळ आहे. मराठी भाषेचा हा गौरव तिच्या जतनासाठी, संवर्धनासाठी, आणि प्रसारासाठी नक्कीच एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. -
*पत्रकार शौकतभाई शेख*
 संस्थापक: समता फाऊंडेशन,श्रीरामपूर (अहिल्यानगर)

मराठी अभिजात भाषा 
अभिजात मराठी निश्चितच 
उच्च दर्जाची, कुलीन, खानदानी, घरंदाज भाषा आहे. स्पष्ट रोखडी, व्याकरण शुद्ध व विविध बोलीभाषांनी नटलेली अशी भाषा आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
खरे तर संस्कृत कुलोत्पन्न व प्राकृत भाषा प्रणालीतील मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे. सर्व भाषांची जननी म्हणून देवभाषा किंवा गिर्वाणवाणी म्हणून संस्कृतकडे बघितलं जाते त्याच भाषापरिवारातून मराठी निर्माण झाली आहे. असे असताना मराठी भाषा केवळ किचकट निकषात अडकवून ठेवण्याचा प्रकार झाल्याने तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विलंब झाला. मराठी भाषेचा  इतिहास हा दोन हजार वर्षे प्राचीन आहे . प्राचीन साहित्याचा समृद्ध व मौल्यवान वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषासंवर्धन होण्यास मदत होईल.
मराठीच्या भाषेतील अनेक बोलींचा भाषांचा अभ्यास, संशोधन, साहित्य व लोकसाहित्य संग्रहित करण्यासाठी मदत होईल.
मराठी भारतीय विद्यापीठीय भाषा म्हणून शिकता येईल. संशोधन वाढेल. मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ अन्य भाषेत अनुवादित करणे शक्य होईल. मराठी ग्रंथालये साहित्य संपन्न होतील. मराठी भाषेसाठी संशोधन अनुवाद व अन्य काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव शासकीय मदत मिळेल. नोकरी व्यवसायाच्या संधीत वाढ होईल. सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजीटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजीटल माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
*प्रा. काकासाहेब वाळुंजकर,* माजी सहाय्यक विभागीय अधिकारी, (अहिल्यानगर)

दोन हजार वर्षांपूर्वीपासून भारतातील एका मोठ्या भूभागावरील माणसांमध्ये मराठी भाषेतून भावभावनांचे आदानप्रदान होत आलेले आहे. शिवाय ही केवळ लोकभाषा नसून ज्ञानभाषाही होती हे तत्कालिन 'बृहत्कथा', 'दीपवंश', 'महावंश', 'गाथा सप्तशती', 'विनयपिटक' अशा अनेक उपलब्ध ग्रंथावरून सिद्ध झालेले आहे. अशा प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे तिला राजमान्यता मिळाली असे म्हणता येईल. यामुळे मराठी भाषिकांचा ऊर भरून येणे आणि हा आपल्या मातेचा सन्मान वाटणे साहजिक असले तरी आता तिचे जतन, संवर्धन आणि तिचा विकास करण्याची जबाबदारीही मराठी भाषिकांचीच आहे. अन्यथा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंदोत्सव साजरा करायला आणि त्या भाषेचा वारसा चालवणाऱ्या आपल्या मुलांना इंग्रजी शाळांतून शिकवायचे, ही भूमिका दुटप्पीपणाची ठरू शकते .
*डॉ. शिवाजी काळे,* श्रीरामपूर, (अहिल्यानगर)

अभिजात मराठी आमुची-
भाषा कोणतीही असो, प्रत्येक भाषिकांसाठी आपली मातृभाषा आणि संस्कृती टिकवण्याची मौलिक जबाबदारी असते. तरीही, शासनाकडून मान्यता प्राप्त भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे आजच्या युगातील उन्नतीकडे उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आज ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची आहे. परंतु, आपली मराठी भाषा इतकी प्राचीन असूनही, संतांची वाणी, क्रांतीवीरांची भूमी आणि साहित्यिकांचा वारसा असतानाही तिला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता, ही खरोखरच आश्चर्याची बाब होती.
"माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेहि पैजासी जिंके," संत ज्ञानेश्वरांच्या या सुंदर ओळी आठवतात.
मराठी बांधवांनी आपापल्या परीने मातृभाषा आणि मराठी संस्कृती जपली, आणि पुढील पिढ्यांना घडवले. तसेच, अनेक मराठी बांधवांनी मराठी सेवेसाठी आपले तन, मन, धन अर्पण केले. अग्रेसर कार्यकर्ते, मराठी शिक्षक, साहित्यिक आणि रसिक यांनी मराठी सेवेसाठी केलेले परिश्रम आज खऱ्या अर्थाने फळास आले आहेत, असे अंतःकरणातून वाटते. बाहेरच्या जगात इंग्रजीचा प्रभाव वाढत असताना, महाराष्ट्रात काही मराठी शाळा बंद होऊ लागल्या. अलीकडे सरकारकडून अनुदान न मिळाल्याने बृहन्महाराष्ट्रातल्या ज्या एखाद दुसऱ्या मराठी शाळा होत्या त्या शाळांना सुद्धा कुलूप लागले. अशा बातम्या वाचून प्रत्येकालाच वाटले की, मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृतीवर याचे विपरीत परिणाम होतील. मराठी बांधवांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे जितके अभिमानाचे आहे, तितकेच मराठीला अधिक प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकालयांमध्ये मराठी पुस्तके आणि वृत्तपत्रांचा समावेश होईल. तेव्हा आपल्याकडून दर्जेदार लेखन व्हायला पाहिजे. मराठी शुद्धलेखन कार्यशाळा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी शब्द न वापरता प्राचीन मराठी शब्दांचा अभ्यास ताकदीने झाला पाहिजे. मराठी पुस्तके इतर भाषांमध्ये अनुवादित झाली पाहिजेत. मराठीचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे, याबद्दल आता कोणतीही शंका नाही.
सदैव अजरामर आपल्या मराठीसाठी मी लिहिलेल्या काही ओळी.. 
वृत्त : देवप्रिया
तीच माझ्या लेखणीची धार असली पाहिजे 
याच गर्वाने मराठी आज शिकली पाहिजे.. 
संस्कृतीचे बोट धरुनी लागले चालायला
संगतीला जोडणारी माळ जपली पाहिजे..
वीर गेले धीर गेले राहिले नेते इथे
राष्ट्र उद्धारक म्हणूनी वाट धरली पाहिजे..
फ्रेंच, जर्मन शिकत जाता अन् मराठी विसरता
माय बापांच्या उराची जाण असली पाहिजे..
लांब परदेशात रमती हीच लोक आपली
मातृभाषा संस्कृतीशी गाठ जुळली पाहिजे..

*सौ. दिपाली महेश वझे, (बेंगळूरू)*
'माझी मराठी' मासिक- कर्नाटक

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 
*संतोष मते, निवेदक,* अहमदनगर आकाशवाणी केंद्र 

मराठी भाषेचा परीघ खूप मोठा आहे.मराठ्यांच्या काळात तर या भाषेने जवळपास संपूर्ण भारताला व्यापून टाकले होते. आजही दिल्लीपासून तंजावूर पर्यंत मराठी बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांना कवेत घेऊन मराठी भाषा व संस्कृतीचा विस्तार करणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच आपली मातृभाषा आईप्रमाणे प्रिय असते, त्यामुळे मराठीवर प्रेम करून ती कुटुंबात क्षणोक्षणी वापरायला हवी. त्यातून भाषिक प्रतिष्ठा आपोआपच वाढीस लागेल. मराठीला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे, तो निश्चितच मोलाचा आहे. आता अखिल भारतीय स्तरावर मराठी सन्मानाने उभी राहील आणि केंद्र राज्य सरकारांतर्फे या भाषेच्या विकासासाठी या भाषेच्या संवर्धन व विकासासाठी अनेक प्रयत्न केले जातील, त्यातून मराठी अधिक समृद्धशाली होत जाईल असा विश्वास आहे. खरे म्हणजे मराठी आता ज्ञानभाषा व्हायला हवी. इतर भाषातील सर्वोच्च ज्ञान मराठी जर उपलब्ध झाले तर आपल्याला दुसऱ्या भाषांचा आधार घ्यावा लागणार नाही. 

*डॉ. श्रीकृष्ण काकडे, (आकोला)*
भाषा व लोकसंस्कृती अभ्यासक

 केंद्र शासनाकडून मराठीला आज अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी साहित्यातील ज्ञानेश्वरी नाथ भागवत, दासबोध, श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा हे मराठी ग्रंथ यातून मराठी प्रसवली, यामुळे मराठी भाषा अजरामर ठरली. आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक व दैदीप्यमान आहे. आज सोन्याचा दिनू उजाडला म्हणता येईल. 
कारण दुर्गा देवीची घटस्थापना आणि मराठी भाषेला मिळणारा अभिजात दर्जा या दोन्ही गोष्टीचा योगायोग आला आहे. या अगोदर केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिसा या भाषेला देण्यात आला आणि आता आपली मायबोली आपला जीव की प्राण, आपली अस्मिता म्हणजेच  मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. 
शेकडो वर्षापासूनची मागणी आज पूर्णत्वाला गेली.
मराठी साहित्य परिषदेने अनेक ठिकाणी केलेले आंदोलनाला यश आले. मराठी भाषेबरोबर बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या ही भाषांना अभिजात दर्जा केंद्र सरकारने देऊन मराठी भाषेचे वैभव त्यांनी स्वीकारले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ३ आक्टोंबर हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केले आहे तसेच आज बरोबर ७५० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली व ती सच्चिदानंदानी लिहून काढली या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरीच्या माझा मराठीची बोलू कौतुके। या ओळीचा दाखलाही दिला आहे. ज्ञानेश्वरी जयंती दिनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. 
*साहित्यिक, प्रा. विठ्ठल बरसमवाड,* (अहिल्यानगर).
                                    अभिजात दर्जामध्ये श्रीरामपूरचा सहभाग - मराठी भाषा तेराव्या शतकात  माहीम भटांनी लिहिलेले  'लीळाचरित्र', मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करताना ज्या सप्तशती ग्रंथांचा पुरावा ग्राह्य धरला गेला. त्यात श्रीरामपूर तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा उल्लेख आढळतो. याच गोदावरीच्या काठावर सराला गाव आहे. येथे तेरावे शतकात माहीम भटांनी प्रथमच प्राकृत भाषेत लिहिलेल्या 'लीळाचरित्र' ग्रंथाचे पुरावे आढळतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याआधी श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.                 *पत्रकार रवी भागवत* (अहिल्यानगर) 
                                         मराठी भाषेला मिळालेला अभिजात मराठी भाषेचा सन्मान ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा ही मराठी मनाची अस्मिता, संस्कार आणि विचार आहे. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' खरोखरच मराठी माणसांच्या नसानसातून, श्वासाश्वासातून मराठी आणि मराठीच आहे. या भाषेचा गौरव ही महाराष्ट्राची शान आहे. तिचे जतन, संवर्धन आणि समृद्धी टिकविणे आणि वाढविणे हे मराठी भाषकांचे आद्य कर्तव्य आहे.

=================================
-----------------------------------------------

*संकलन*✍️✅🇮🇳...
 डॉ. शरद दुधाट 
जिल्हाध्यक्ष,
 मराठी विषय शिक्षक महासंघ (अहिल्यानगर)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

*प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर
 +91९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, October 7, 2024

स्व.दत्ताजी दाजीबा काचोळे यांची जयंती काचोळे विद्यालयात साजरी

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालयामध्ये स्व.दत्ताजी दाजीबा काचोळे यांची शंभरावी जयंती सोहळा विद्यालयात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे सर तसेच माजी शिक्षक श्री पोपटराव शेळके सर यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाच्या सेमी विभागांमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बाळासाहेब रासकर, ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष सोनवणे, सौ मनीषा घावटे, सौ स्नेहा निंबाळकर, उपस्थित होते.
      काचोळे भाऊसाहेब यांनी वकिली व्यवसाय श्रीरामपूर मध्ये सुरू केल्यानंतर बहुजन समाजासाठी साक्षरता कार्य हाती घेऊन १९५३ साली जनता माध्यमिक विद्यालयची स्थापना केली. विद्यालयासाठी लागणारी आर्थिक मदत, निधी उभी करण्यासाठी त्यांनी आपल्या कलेचा उपयोग करून समाजामध्ये विविध विषयांवर ५२ नाटके  सादर केली व मिळणारी रक्कम विद्यालयाच्या प्रगतीसाठी वापरली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एका शब्दावर शहरातील जनता विद्यालय, इमारत प्रांगणासहित विनाअट संस्थेस दान केली. यातून त्यांचा थोर दानशूरपणा लक्षात येतो. 
        याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र निकम यांनी काचोळे भाऊसाहेब यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल  मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर कु.प्रतीक्षा भागडे, पुष्कर मोरे, ओंकार काटे व प्रतिक लांडगे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Sunday, October 6, 2024

आपला भारत देश हा माऊलीच्या दृष्टीने या विश्वाचे देवघर आहे - सुप्रीयाताई साठे महाराज

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
स्त्री शक्ती जागरूक असली तरच मुलांवर योग्य संस्कार करू शकते, आपल्या मुलांना योग्य वळण लावू शकते, ज्या घरातील स्त्री कडक आहे त्या घरात छत्रपतींचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही, त्या साठी प्रत्येक स्त्रीने जीजाऊ होण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे. या जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर, संत निळोबा, महंत रामगीरीजी महाराज, गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज असे थोर साधु संतांचा हा जिल्हा आहे. याच जिल्ह्यातून हे विश्वची माझे घर म्हणत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लीहीला. ज्ञानोबा परदेशाला समजले पण अद्यापपर्यंत आपल्या घराघरात पोहचले नाही पण तरीही आपला भारत देश हा माऊलीच्या दृष्टीने या विश्वाचे देवघर असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सुप्रीयाताई साठे महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान प्रांगणात शारदीय नवरात्रौत्सवानिमीत्त आयोजीत गाथा पारायण, दुर्गासप्तशदी पाठ व जाहीर हरीकिर्तन महोत्सवप्रसंगी कीर्तन सेवेत उपस्थीतांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगीतले. यावेळी निवृत्ती महाराज विधाटे, प्रसाद महाराज गायकवाड, किरण महाराज हराळे, ऋषीकेश महाराज शेटे, आण्णासाहेब चौधरी तसेच सोहळ्याचे कार्यवाहक ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
इतर धर्मात ज्याप्रमाणे बालवयापासून धर्माची बंधनं घालत संस्कार केले जातात त्याप्रमाणे आपल्या घरात नियमीत सुख व शां:ती मिळविण्यासाठी आपल्या मुलांना योग्य वयात अध्यात्मीक शिक्षण द्या, योग्य वेळीच योग्य वळण लावा, हि जबाबदारी पार पाडताना त्या कुटूंबातील, घरातील स्त्री हि जागरूक व संस्कारशिल असावी लागते. देवाजवळ जाण्यासाठी संतांजवळ जावे लागते, कारण संत हे आपल्याला अध्यात्माच्या मार्गाने देवाजवळ जाण्याचा मार्ग दाखवितात. त्याच बरोबर आपल्याला अध्यात्मीक उर्जा देण्याचे कार्य करत असतात. भगवंत आपल्या कडून जेव्हा एखादी गोष्ट काढून घेत असतो त्या वेळी त्याच्या लाखपटीची गोष्ट आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही, त्यासाठी आपली दृष्टी व कर्म तशी असावी लागतात.
परमार्थ करताना आपल्याकडे उर्जा व शक्ती असावी लागते, त्यासाठी प्रथम शक्तीची उपासना करावी लागते. अध्यात्मीक शक्तीला जवळ केले तर आपले पुण्य वाढते, याच पुण्याच्या जोरावर आपण त्या पांडूरंग परमात्म्याशी एकरूप झाले तरच आपल्याला सुख प्राप्त होत असते. जीवंतपणी सुख मिळावे अन् मृत्यूनंतर मुक्ती मिळविण्यासाठी श्रीहरीचे पाय धरा. आज आपल्या मुलांकडे जन्मत:च मोबाईल आला आहे, त्यातून तो नेहमीच मोबाईलच्या संपर्कात जातो अन् नको त्या गोष्टीत अडकतो, इतकेच नाही तर तो कधी ही अध्यात्माकडे वळत नाही पर्यायाने त्यावर योग्य वयात, योग्य संस्कार होत नाही, याचे दुष्परीणाम कुटुंबातील सर्वांनाच भोगावे लागतात. त्यासाठी आपल्या मुलांना बालवयापासून आपला धर्म, संस्कार व अध्यात्म शिकवा म्हणजे त्याला आपल्या धर्माबद्दल आसक्ती निर्माण होवून तो भविष्यात आपले संस्कार व संस्कृती जपल्याशिवाय राहणार नाही असे हि यावेळी सुप्रीयाताई साठे यांनी सांगीतले.
यावेळी गयाबाई शेळके, कल्पना आसावा, सुशिलाबाई काळे, शेवंताबाई बेरड, संगीता लोखंडे, जयश्री छल्लारे, अनिता पाचपिंड, लक्ष्मीबाई मते, मच्छींद्र काळे, पोपट वाकडे, दिपक पटारे, सखाराम दिवटे, प्रकाश आहेर, माजी सरपंच दत्तात्रय आहेर, जितेंद्र छल्लारे, सिताराम शिंदे, अशोक शिंदे, भानुदास अभंग, भास्कर विधाटे, विठ्ठल शेळके आदिंसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते. किर्तन सेवेनंतर येथील संदिप अमोलीक, मुन्वर सय्यद, भाऊसाहेब काळे, गोरख अमोलीक यांनी खिचडी फराळ महाप्रसादाचे अन्नदान केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



भोकरची सुकन्या डॉ.राजश्री कांबळे यांची प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगलाताई कांबळे यांची सुकन्या डॉ. राजश्री भाऊसाहेब कांबळे यांची नुकतीच महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेच्या गट -अ या संवर्गातील गट - अ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नुकतेच महाराष्ट्र सरकार कडून घोषीत करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील 
भोकर या खेडेगावात जन्म झालेल्या डॉ.राजश्री भाऊसाहेब कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण भोकर शिवारातील खानापूर रोडलगत असलेल्या हनुमाणवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालय येथे, उच्च माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील रावबहादुर नारायणरारव बोरावके महाविद्यालयात झाले, उच्च शिक्षण संगमनेर येथील सिद्धकला आयुर्वेदीक महाविद्यालय येथे झाले व त्यानंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम डी ही पदवी प्राप्त केलेली आहे. 
शिर्डी येथील साई संस्थानचे माजी अध्यक्ष व माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे निकटवर्तीय असलेले धडाडीचे सामाजीक कार्यकर्ते स्व. भाऊसाहेब सिताराम कांबळे यांच्या व भोकर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगलाताई भाऊसाहेब कांबळे यांच्या त्या कन्या आहेत, तसेच येथील सामाजीक कार्यकर्ते व आमदार लहु कानडे यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे सामाजीक कार्यकर्ते गणेश कांबळे यांच्या त्या पुतणी आहे.
डॉ.राजश्री कांबळे यांना त्यांचे पती छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल जेलचे मेडीकल ऑफीसर डॉ. मंगेश घोडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याच्या या नियुक्तीचे आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचीन गुजर, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे व मंदाताई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, अशोकचे माजी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे आदिंनी अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच श्रीरामपूर तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
=================================
-----------------------------------------------

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यात परदेशी दांपत्यांचे मोठे योगदान - सचिन गुजर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी परदेशी दाम्पत्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार योजना नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी गुजर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशी दांपत्यांनी सुरू केलेल्या बांधकाम कामगार नोंदणी अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही गुजर यांनी केले.
 यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की,गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधींनी विकासाचा फक्त दिखावा करून श्रीरामपूरची वाट लावली. कोणतीही विकासात्मक कामे न करता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा सपाटा लावला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना श्रीरामपूरची जनता कधीही माफ करणार नाही. परंतु येणाऱ्या काळात स्व. जयंतराव ससाणे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध योजनांच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याचा कायापालट करू असे ते म्हणाले.
यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा दिपालीताई ससाणे म्हणाल्या की, स्व. जयंतराव ससाणे यांनी विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनसामान्यांना आधार दिला. श्रीरामपूर तालुक्याला कधीही निधी कमी न पडू देता तालुक्याच्या विकासाला नवी चालना दिली असल्याच्या ते म्हणल्या.
 यावेळी माता-भगिनींना शक्ती अभियान व इंदिरा फेलोशिप या अभियानाची देखील माहिती देण्यात आली. यानंतर सौ आशाताई परदेशी म्हणाल्या की, आमचे नेते करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत व यापुढे देखील जनसामान्यांच्या मुलभूत गरजा आणी प्रश्नासाठी सातत्याने आपले कार्य असेच अविरतपणे सुरु राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
 यावेळी त्यांनी बांधकाम कामगार योजनेच्या संबंधी आवश्यक कागदपत्रे व योजनेच्या लाभा विषयीची सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली. या प्रसंगी माजी नगरसेवक अरुण मंडलिक, रियाजखान पठाण, अशोक जगधने, रावसाहेब आल्हाट, सुनील साबळे, सुरेश ठुबे, रणजीत जामकर, रितेश चव्हाणके, संतोष परदेशी, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, सरबजीत सिंग चूग, योगेश गायकवाड, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी आदी मान्यवर व शेकडो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================