*आनंद होई भाविक जना - येता माळेचा महिना*
दरवर्षी कॅथोलिक भाविक ऑक्टोबर महिन्यामध्ये मारिया मातेची विशेष प्रार्थना करून पवित्र माळेची भक्ती करतात म्हणून या महिन्याला "पवित्र माळेचा महिना" असे संबोधले जाते. याबद्दल अधिक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने केलेला हा लेखन प्रपंच...
मानवी आयुष्य स्वर्गीय पिता तारणाने प्रकाशमय करणार हे निश्चित होते. त्यासाठी परमेश्वर त्याचा एकुलता एक पुत्र मानवी रूपाने या भूतलावावर पाठविणार होता. ही योजना पवित्र आत्म्याद्वारे पूर्ण होणार होती परंतु ; गरज होती ती माध्यमाची. एका पवित्र कुमारीकेची. निष्कलंक, पाप विरहित, धार्मिक आणि देवाच्या सानिध्यात रमणाऱ्या स्त्रीची.
पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती राहून विश्वाच्या तारकाला जन्म देणारी अशी सर्व गुण संपन्न कुमारीका पवित्र मारिया हिची या कामी निवड करण्यात आली म्हणून तारण कार्यात ती सतत सहभगी असते असा भाविक विश्र्वास धरतात. तीच्या ठायी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा सहवास असतो. तीच्या ठायी पवित्र आत्मा असल्यामुळेच ती सामान्य असूनही असामान्य ठरली यामुळेच ती सन्मानास पात्र आहे.
दावीद कुळातील संत अन्ना व जोकीम या अत्यंत धार्मिक दांपत्याच्या पोटी पवित्र मारियेचा जन्म झाला. खरंतर अन्ना व जोकीम यांच्या वृद्धपकाळात देवाने दिलेले कन्यारत्न म्हणजे पवित्र मरिया होय.
देवाच्या योजने करवी ती प्रभुची माता व प्रभूने योहानाच्या खांद्यावर दिलेल्या जबाबदारीमुळे ती संपूर्ण विश्वाची माता झाली.
आज जगभर पवित्र मरियेची मध्यस्थी लाभावी म्हणून कॅथोलिक ख्रिस्ती भाविक मनोभावे तिच्याकडे प्रार्थना करतात. भाविकांना तिची मध्यस्थी लाभतेच याचे उत्तम उदाहरण म्हणजे काना गावचे लग्न होय. वधु पित्याची निंदा नालस्ती होऊ नये म्हणून द्राक्षरस संपलेला आहे, ही बाब लक्ष्यात येताच तिने त्याच लग्नात उपस्थित असलेल्या आपल्या पुत्राकडे (प्रभू ख्रिस्ताकडे) मध्यस्थी केली आणि ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला, वधू पित्याची होणारी निंदा टळली. तारण कार्यातील तिची सहभागीता, दैवी योजनेच्या पूर्णत्वासाठी तिची झालेली निवड, सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडची वाटचाल, पवित्रात्म्यसह तिचा एकूण प्रवास तिला सन्मानास पात्र ठरवतो.
तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा सोहळा म्हणजे माळेचा महिना होय.
ऑक्टोबर महिना जवळ येताच चाहूल लागते ती माऊलीच्या आगमनाची. ऐरवी पवित्र मारियेच्या भेटीसाठी चेन्नई, बांद्रा किंवा हरेगांव या व अशा अनेक भक्तिस्थळी भाविक धाव घेत असतात. तिची पवित्र मध्यस्थी मिळवून कृपाशीर्वादास पात्र ठरतात. प्रसंगी शेकडो किलोमीटरचा प्रवास, अलोट गर्दीचा सामना, वेळेचे व पैशाचे नियोजन या सर्व दिव्यातून जाऊन भाविक तिच्या मातृप्रेमाच्या अनुभूतीसाठी जात असतात परंतू ; हीच माता धन्यकुमारी पवित्र मारिया जेव्हा स्वतः भाविकाच्या दारी येते तेव्हा भाविकांना आभाळ ठेंगणे झाल्याशिवाय राहत नाही. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेला मुख्य चर्च पासून निघालेली पवित्र मारियेची प्रतिमा धर्मग्रामातील वेगवेगळे विभाग, लहान ख्रिस्ती समूह व कुटुंबात माळेची उपासना करण्यासाठी नेली जाते.
यावेळी लहान ख्रिस्ती समूहासह ती आपल्या कुटुंबात अवर्णनीय आनंद घेऊन येते असा विश्वास भाविक धरतात.
घराची स्वच्छता, सडा-रांगोळी, दारावरचे तोरण, तिला स्थानापन्न करावयाच्या जागेची सजावट, आलेल्या धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रवचनकार व भाविकांचा यथोचित सन्मान या सर्व बाबींची पूर्तता करून माऊली भक्त तिच्या स्वागताची तयारी करतात.
दरम्यान ०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर अर्थात संपूर्ण महिनाभर चालणारा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.
लुककृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे "सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील" हे शब्द वदलेल्या पवित्र मरियेची वैशिष्ट्यपूर्ण उपासना करण्याचा हा काळ होय.
आपल्या कुटुंबातील तिची अनमोल उपस्थिती व हर्षभरे होणारे तीचे भावपूर्ण स्वागत या अद्वितीय सोहळ्याचा आनंद भाविकांना नवचेतना देणारा असतो. माऊली भक्तांच्या श्रद्धेत वाढ करणारा असतो. प्रत्येक धर्मग्राम स्तरावर या संपूर्ण महिन्याचे नियोजन केले जाते. यावेळी धर्मगुरू, धर्मभगिनी व माऊली भक्तांच्या उपस्थितीत विविध विषयांवर प्रापंचिकांना प्रवचन करण्याची संधी दिली जाते. प्रापंचिक लोक विविध धार्मिक विषयांवरती अभ्यासपूर्ण प्रवचने सादर करतात.
पवित्र मारियेवरती निस्सीम श्रद्धा ठेवून भाविक तिची प्रेमळ मध्यस्थी मिळवीत असतात. कारण ती कृपादाने पावलेली धन्यकुमारी असून तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताची माता आहे. जर पवित्र शास्त्र सांगते की, "तू तुझ्या आई वडिलांचा मान राख" तर तारणाऱ्याच्या मातेचा मान राखणे व तिला सन्मान देणे अगत्याचे ठरते असे कॅथोलिक भाविक मानतात.
भाविकांच्या मनातील पवित्र मरियेच्या आगमनाचा आनंद वर्णन करताना मला अलिशिबा व मारियाच्या भेटीचा उल्लेख करावासा वाटतो. त्या दिवसात मारिया डोंगराळ प्रदेशातील यहुदा प्रांतातील एका गावात घाईघाईने गेली. यावेळी या दोघींची भेट झाली. भेट झाली त्यावेळी त्या दोघीही ईश्वर कृपेने मातृत्वाकडे वाटचाल करीत होत्या, गरोदर होत्या.
माऊली भक्तांच्या हृदयात भक्तीचा हा दीप तेवत ठेवण्या कामी व देव मातेच्या आगमनाच्या आनंदाची अनुभूती मिळविणे कामी अलिशिबाची भेट दिशादर्शक ठरते.
आपली मावस बहीण असलेल्या आलिशिबेकडे जेव्हा पवित्र मारिया जाते तेव्हा अलिशिबा भावुक होऊन म्हणते, "माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?" तिचे घरी येणे ही जर तिच्यासाठी मानाची गोष्ट आहे तर आपल्यासाठी सुद्धा ही आनंदाची व मानाचीच गोष्ट आहे यात शंका नाही. तिची सुवर्ण पावले ही चमत्काराची द्योतक आहे. एकमेकींना अभिवादन केल्यानंतर अलिशिबा म्हणते, "तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडतात माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली आहे. ( लुक- १:४४)
कारण मारियेची ही भेट प्रभूसह होती. इतकेच काय तिच्या उदरातील बाळाने मारलेली उडी किंवा हालचाल साधारण हालचाल नव्हती तर प्रभू भेटीच्या आनंदाने मारलेली उडी होती.
उडी मारणारे बालक सुद्धा साधारण नव्हते. देवाच्या पवित्र मंदिरात धूप जाळणाऱ्या, विश्वासू राहून परमेश्वराकडे आपत्य प्राप्तीसाठी रडणाऱ्या, जखऱ्या व अलिशिबेचा पुत्र तो योहान होता.
तीन महिन्यांनी मोठा असणारा, तो ख्रिस्ताचा मावस भाऊ ख्रिस्ताचा मार्ग नीट करून, त्याला बाप्तिस्मा देणारा संदेष्टा योहान होता.
प्रभूच्या मातेने व पोटातील लहानग्या प्रभूच्या येण्याने जो आनंद अलिशिबा व योहानाला झाला होता त्याचं आनंदाचा अनुभव प्रत्येकाला यावा म्हणून भाविक पवित्र मारियाकडे विशेष कृपा मागतात.
संकट समयी आपल्या लेकरांसाठी सदैव धावून येणारी, सैरभर झालेल्या लेकरांसाठी प्रेमळ मध्यस्थी करून कृपा पुरविणारी, कुमारी असूनही पवित्र आत्म्याद्वारे देऊ केलेले मातृत्व कुरकुर न करता आनंदाने स्वीकारणारी, उदरातील बाळासह आपल्या नियोजित पती समवेत बेथलेमचा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास कष्टाने करणारी, बाळ येशूचे उत्तम संगोपन करून प्रेमळ आई ठरलेली, क्रुसावरील मरणापर्यंत बरोबर राहून आपल्या पुत्राचे वेदनादायी मरण उघड्या डोळ्यांनी पाहणारी, धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाणारी, शिष्यांसमवेत पुनरूत्थित येशूला पाहण्याचे भाग्य लाभलेली, अंतिमतः येशूच्या तारण कार्यात सहभागी असणारी धन्यकुमारी पवित्र मारिया होय.
प्रेमळ, संयमी, धाडसी, संवेदनशील, कष्टाळू, विश्वासू, धार्मिक अशा पवित्र मरीयेला भाविक आपल्या घरीचं नव्हे तर आपल्या अंत:करणात निमंत्रित करतात.
पवित्र मारियेची भक्ती करण्यासाठी ख्रिस्त महासभेने ठरवून दिलेला हा पवित्र माळेचा महिना सर्व माऊली भक्तांना आनंदाचा,मरीयेच्या पवित्र मध्यस्थीचा व विशेष ईश्वरी कृपेचा जावो हीच सदिच्छा.
"या पुढती जन सकल पिढ्यांतील म्हणतील मजला धन्य अती, कारण केली अद्भुत कृत्ये प्रभुरायाने मजसाठी !!"
=================================
-----------------------------------------------
*लेखन:*
रवि त्रिभुवन,श्रीरामपूर +९१९६२३२८०९७८
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================